जळगावच्या पाळधी बायपासवर भीषण दुर्घटना! १०० फूट उंचीवरून क्रेन कोसळली; चालकाचा मृत्यू
पाळधी-तरसोद बायपासवरील पाळधीजवळ शुक्रवारी सायंकाळी भीषण दुर्घटना घडली. सुरत रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलालगत सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामादरम्यान सुमारे १०० फूट उंचीवरून क्रेन खाली कोसळली.
या अपघातात क्रेनचालक मधुकर धनराज पाटील (वय ४४, रा. वंजारी खपाट, ता. धरणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पाळधी येथील रेल्वे उड्डाणपुलावर गेल्या काही दिवसांपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास साईड गर्डरचा मोठा आणि वजनदार भाग क्रेनच्या मदतीने उचलण्याचे काम सुरू होते. याच वेळी अचानक क्रेनचा तोल जाऊन ती उंचीवरून खाली कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
क्रेन थेट पुलावरून खाली आदळल्याने चालक मधुकर पाटील यांना गंभीर अपघातात प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी खळबळ उडाली.
क्रेन कोसळताना झालेल्या जोरदार आघातामुळे उड्डाणपुलाच्या सुरक्षेसाठी उभारलेले कठडे तुटून पडले. तसेच पुलाचा काही भाग आणि भराव खचल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे या अपघातात केवळ जीवितहानीच झाली नाही, तर पुलाच्या संरचनेचेही नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर बायपासवरील उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेचा आणि सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामादरम्यान आवश्यक खबरदारी घेतली जात होती का, याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाळधी-तरसोद बायपासवरील पुलांच्या समस्यांमुळे यापूर्वीही वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे भादली येथील रेल्वे उड्डाणपुलाचा भराव वाहून गेला होता. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद करण्याची वेळ आली होती. भादली पुलाच्या दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याची माहिती आहे.
त्यातच पाळधी येथील उड्डाणपुलाजवळ क्रेन कोसळून नुकसान झाल्याने बायपासवरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण काय, तसेच पुलाच्या नुकसानीचा वाहतुकीवर किती परिणाम होणार, हे पुढील तपास आणि संबंधित यंत्रणांच्या पाहणीनंतर स्पष्ट होईल.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











