ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ यांचे निधन; पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा
पुणे : गेली चाळीस वर्षाहून अधिक हृदयविकारांवर उपचारांचा प्रदीर्घ अनुभव असणारे, कार्डिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष व पुण्यातील ज्येष्ठ व प्रथितयश हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष (एम. एस.) हिरेमठ (वय, ७५, रा.सोपान बाग) यांचे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. हृदयविकार उपचारांचा गाढा वैद्यकीय अनुभव असलेला हृदयरोगतज्ञ हरपल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
डॉ. हिरेमठ यांना काही वर्षांपूर्वी ब्रेन ट्युमर चे निदान झाले होते व दोनेक वर्षांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे सहकारी डॉ. राहुल नागदा यांनी दिली. इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. हिरेमठ यांनी चार दशकांहून अधिक काळ हृदयरोग निदान आणि उपचार केले. अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीमधील त्यांचा अनुभव, तसेच हृदयविकारांबाबत जनजागृती करण्यासाठी केलेले प्रयत्न यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांची एक ओळख आहे.
डॉ. हिरेमठ यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस, एमडी आणि कार्डिऑलॉजीमधील डीएम ही पदव्युत्तर पात्रता प्राप्त केली. १९८२ मध्ये पुण्यातील जोशी हॉस्पिटलमधून त्यांच्या हृदयरोग उपचार क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे त्यांनी रुबी हॉल क्लिनिकसह पुण्यातील विविध वैद्यकीय संस्थांमध्ये काम केले. रुबी हॉल क्लिनिकच्या कार्डिअॅक कॅथलॅबचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
त्यांनी ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी आणि एक लाखांहून अधिक अँजिओग्राफी केल्या होत्या. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवरील उपचार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि हृदयविकारांचे लवकर निदान या क्षेत्रांतही त्यांनी काम केले.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











