‘देवासारखी माणसं होती, कुटुंब वाचायला पाहिजे होतं’, गावकऱ्यांच्या डोळ्यात तरळले अश्रू, सांगितला धडकी भरवणारा घटनाक्रम!

धाराशिव जिल्ह्याच्या येडशीमध्ये ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दुर्दैवी घटना घडली आहे. मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर हे कुटुंब रात्री जेवण करून घरात झोपलं होतं.
पण लक्ष्मीपूजनाची ही रात्र कुटुंबासाठी काळरात्र ठरली. मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत या संपूर्ण कुटुंबाचा अंत झाला आहे. कुटुंबाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. हे कुटुंब देवासारखं होतं, असं घडायला नको होतं, अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.
उत्तम त्रिंबक करंडे (वय-75), चंद्रकला उत्तम करंडे (वय-70), गोविंद उत्तम करंडे (वय 47), ज्योती गोविंद करंडे (वय-42), गायत्री गोविंद करंडे (वय 16) आणि सिद्धी गोविंद करंडे (वय 15) अशी मृत पावलेल्या सहा जणांची नावं आहे. या दुर्घटनेत एकजण बचावला असल्याची माहिती असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, येडशी येथील एका किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर हे कुटुंब राहत होते. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक घराला आग लागली. किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर घर असल्यामुळे आणि रात्रीची वेळ असल्याने आगीची तीव्रता झपाट्याने वाढली. घरातील सदस्यांना काही कळण्याच्या आतच आग सर्वत्र पसरली. आगीतून बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग न मिळाल्यामुळे घरातील ६ जण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि धुराच्या विळख्यात अडकले. घराबाहेर पडू न शकल्याने गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री लावलेल्या पणतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.
गावकऱ्यांनी काय म्हटलं?
या घटनेची माहिती देताना एका व्यक्तीने सांगितलं की, “आम्ही कुटुंबाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण आम्हाला यश आलं नाही, आम्हाला यश लाभायला पाहिजे होतं. हे सगळं जळाल्याचं दु:ख नाही, फक्त माणसं वाचायला पाहिजे होती. ही माणसं देवासारखी होती, ही माणसं एवढी चांगली होती की विचारूच नका. आम्ही त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. बादलीने पाणी मारलं. सगळ्यांनी बोअरवेल्स सुरू केले. पण काही उपयोग झाला नाही. आग प्रचंड होती, जवळ जाणंही मुश्कील होतं. घरावर चढून आग विझवण्याचा प्रयत्न केला. जीसीबीने भिंत फोडून कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण काहीच फायदा झाला नाही.”
दुसऱ्या एका गावकऱ्याने सांगितलं की, आग लागल्याची घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाला यायला फार उशीर झाला. शिवाय त्यांच्याकडे मास्क देखील नव्हते, त्यामुळे त्यांचीही धुरात जाण्याची हिंमत नाही झाली. वेळेवर मदत न मिळाल्याने कुटुंबाचा प्राण गेला.”
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.









