महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. अशातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एका पत्रकार परिषदेत “जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतील,” असे अत्यंत सूचक वक्तव्य केले आहे.
त्यांच्या या गुढ वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहे. या विधानामुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरत असतानाच अनेक राजकीय घडामोडी समोर येत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. यामुळे राजकीय वर्तुळात नव्या भूकंपाच्या चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादीचे हे आमदार शरद पवारांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र, शरद पवार हे सध्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी आराम करत असून, ते पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नाहीत, अशी माहिती पवार कुटुंबीयांनी दिली आहे. दरम्यान, नुकताच पंकज भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती.
या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया देताना अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी स्पष्ट केले की, आमचे आमदार शरद पवारांना भेटायला जाणार नाहीत आणि विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा सध्या सुरू नाही. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गेल्याच आठवड्यात मोठा गौप्यस्फोट केला होता की, अजित पवार असते तर 12 तारखेलाच राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते. यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले.
पार्थ पवार आणि शरद पवारांच्या भेटीगाठी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, गेल्या शनिवार आणि रविवारी सलग दोन दिवस पार्थ पवार यांनी ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. शनिवारच्या भेटीदरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते, आणि त्यांची तब्बल दीड तास चर्चा चालली. या सततच्या भेटींमुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचाली वेगात असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.दुसरीकडे, माजी मंत्री राजेश टोपे यांनीही आज शरद पवारांची भेट घेतली. ही केवळ कौटुंबिक भेट असून तब्येतीची विचारपूस करण्यासाठी असल्याचे सांगत राजेश टोपे म्हणाले की, या बैठकीत मराठवाड्याच्या दुष्काळ परिस्थितीवर चर्चा झाली आणि शरद पवारांनी आमच्याकडून दुष्काळाची माहिती घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पुढे जोडले की, अजित दादा असताना आम्ही एकत्र येणार होतो हे आम्ही तेव्हाही मान्य केले होते, मात्र त्यांनी ती गोष्ट तेव्हा नाकारली होती.
महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण?
चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या “जशी वेळ येईल तसे कळेल,” या वक्तव्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काय नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










