मगरीच्या जबड्यात अडकली आई; १० वर्षांच्या लेकीने जीवाची पर्वा न करता खेचले मृत्यूच्या दारातून बाहेर!
वाशिष्ठी नदीत कपडे धुताना महिलेवर मगरीचा अचानक हल्ला; आईला पाण्यात ओढताना पाहून स्वर्णीने दाखवले अतुलनीय धाडस
चिपळूण : वाशिष्ठी नदीच्या काठावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईवर अचानक मगरीने हल्ला केला. मगरीने महिलेचा पाय जबड्यात पकडून तिला खोल पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मृत्यू समोर दिसत असताना आईने काठावरील दगड घट्ट पकडून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी सोबत असलेल्या अवघ्या १० वर्षांच्या मुलीने प्रसंगावधान राखत आईला मगरीच्या तावडीतून खेचून बाहेर काढले. या चिमुकलीच्या धाडसामुळे आईचा जीव वाचला असून, स्वर्णीच्या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे गुरुवारी (ता. २०) सायंकाळी ही थरारक घटना घडली. नंदिनी भूपेंद्र पवार (वय ३५) या आपल्या मुलगी स्वर्णी हिच्यासोबत घरामागील वाशिष्ठी नदीघाटावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.
सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास नंदिनी पवार नदीकाठावर कपडे धूत असताना पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक त्यांच्यावर झडप घातली. मगरीने त्यांचा पाय जबड्यात पकडला आणि त्यांना पाण्याच्या दिशेने ओढण्यास सुरुवात केली.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नंदिनी यांनी आरडाओरड करत काठावरील मोठा दगड घट्ट पकडला. मात्र मगर त्यांना पाण्यात खेचण्याचा प्रयत्न करत होती. आईचा जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच अवघ्या दहा वर्षांच्या स्वर्णीने क्षणाचाही विलंब न करता आईच्या मदतीसाठी धाव घेतली.
स्वर्णीने आईचा हात घट्ट पकडला आणि आपल्या संपूर्ण ताकदीने तिला मगरीपासून दूर खेचण्यास सुरुवात केली. आईला पाण्यात ओढले जाण्यापासून रोखण्यासाठी तिने केलेल्या या धाडसी प्रयत्नांना अखेर यश आले. स्वर्णीच्या प्रसंगावधानामुळे नंदिनी पवार यांची मगरीच्या तावडीतून सुटका झाली.
मगरीच्या हल्ल्यात नंदिनी पवार जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वनविभागाची रुग्णालयात धाव
घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी वनविभागाच्या पथकासह कामथे रुग्णालयात धाव घेतली. वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक के. डी. इरमले, वनरक्षक रा. भा. गुंटे, लिपिक एस. ए. कलावंत आणि आरआरटी सदस्य अथर्व घाग यांनी रुग्णालयात जाऊन नंदिनी पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
आईसाठी चिमुकली बनली ‘रक्षक’
आईवर मगरीने हल्ला केल्याचे पाहून घाबरून न जाता स्वर्णीने दाखवलेले धैर्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. अवघ्या दहा वर्षांच्या मुलीने प्रसंगावधान राखून आईला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
स्वतःचा जीव धोक्यात असतानाही आईला वाचवण्यासाठी स्वर्णीने दाखवलेले धाडस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
नदीकाठी जाणाऱ्यांना वनविभागाचा इशारा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिष्ठी नदी परिसरात मगरींचा वावर वाढल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
नदीत पोहणे, कपडे किंवा जनावरे धुण्यासाठी पाण्यात उतरणे टाळावे. तसेच लहान मुलांना नदीकाठावर किंवा पाण्याच्या जवळ एकटे जाऊ देऊ नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी केले आहे.
मगरींचा वावर असलेल्या नदीपात्राजवळ क्षणिक निष्काळजीपणाही जीवघेणा ठरू शकतो, त्यामुळे नागरिकांनी वनविभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










