अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक ; तिघांचंही वय १२ ते १६
अहिल्यानगरमधील नेवासा इथं गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात तीन सख्ख्या भावाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. नुकत्याच घेतलेल्या नव्या बुलेटवरून तीन भाऊ नातेवाईकांकडे निघाले होते.
त्यांच्या दुचाकीला पुनतगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, माळीचिंचोरा येथील अंबादास आहिरे यांनी घरगुती वापरासाठी तीन दिवसांपूर्वीच नवी दुचाकी खरेदी केली होती. घरात नवीन गाडी आल्याने तिघेही भाऊ प्रचंड आनंदात होते. गुरुवारी रात्री हे तिघे भाऊ याच नवीन दुचाकीवर राहाता येथील आपल्या नातेवाइकांकडे जाण्यासाठी निघाले. नेवासा-श्रीरामपूर मार्गाने जात असताना पुनतगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाची त्यांच्या दुचाकीला जोरात धडक बसली.
अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात तिघेही भाऊ गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर शुक्रवारी तिघा भावंडांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.
आदित्य अंबादास अहिरे वय 16 वर्षे, दीपक अंबादास आहिरे वय 14 वर्षे आणि चैतन्य अंबादास आहिरे वय 12 वर्षे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अपघात प्रकरणी दादासाहेब मुरलीधर आहिरे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











