नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू
नागपूर-वर्धा मार्गावरील जामठा परिसरात भीषण अपघात
* एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
* सहा वर्षांचा मुलगा गंभीर
* अपघातानंतर ट्रेलर चालक फरार
नागपूर वर्धा मार्गावर जामठा परिसरात भरधाव ट्रेलरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
या दुर्घटनेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह चार वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचा सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूरच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश नाईक हे पत्नी सुनीता नाईक आणि दोन मुलांसह दुचाकीवरून वर्धा मार्गाने प्रवास करत होते. जामठा परिसरातील गौसी-मानापूरजवळ त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात योगेश नाईक, त्यांची पत्नी सुनीता नाईक आणि चार वर्षांचा मुलगा गुलशन यांचा मृत्यू झाला. तर सहा वर्षांचा तन्मय नाईक गंभीर जखमी झाला आहे. तन्मयला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सध्या एम्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मृत योगेश नाईक हे मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी होते. रोजगारासाठी ते कुटुंबासह नागपूर परिसरात राहत होते आणि बुटीबोरी एमआयडीसीमध्ये काम करत होते.
कामानिमित्त आणि कौटुंबिक कारणाने प्रवास करत असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू आणि सहा वर्षांच्या मुलाची गंभीर अवस्था यामुळे नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या भीषण अपघातामुळे वर्धा मार्गावरील अवजड वाहनांच्या वेगाचा आणि वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











