माइंड स्प्रिंग- २०२६’चे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते जळगावात भव्य उद्घाटन
विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना उद्योजकतेची दिशा; ३शाळांचा सहभाग, १४० स्टॉल्सचे आकर्षण
जळगाव, दि. ०६ ऑक्टोबर २०२६ : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सेंटर आणि हायर अँड टेक्निकल एज्युकेशन करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माइंड स्प्रिंग-२०२६ एक्झिबिशन-कम-सेल’ चे उद्घाटन आज एम. जे. कॉलेजच्या बास्केटबॉल कोर्टवर उत्साहपूर्ण वातावरणात झाले. ‘Turn Your Innovation Into Enterprise!’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, प्रकल्प आणि उद्योजकीय दृष्टिकोनाला व्यासपीठ मिळाले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहनजी घुगे आणि करियर कट्टाचे अध्यक्ष श्री यशवंत शितोळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष तथा KCE सोसायटीचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य श्री. भालचंद्र पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून करिअर कट्ट्याचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे, जळगावचे जिल्हाधिकारी आदरणीय रोहनजी घुगे, KCE सोसायटीचे सचिव प्रमोद पाटील, अॅड. प्रवीणचंद्र जंगले, डॉ. डी. टी. पाटील, कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर यांच्यासह KCE सोसायटीच्या विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक KCE सोसायटीच्या शैक्षणिक संचालक प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व्यावसायिक रूप देत त्यांना रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देणे, हा ‘माइंड स्प्रिंग’चा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पांचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यासोबतच बाजारपेठेची दिशा मिळावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘खानदेशच्या मातीतून गगनभरारी घेणारे उद्योजक घडतील’
खान्देशच्या मातीतून गगनभरारी घेणारे उद्योजक या उपक्रमाच्या माध्यमातून घडतील, असा विश्वास श्री.यशवंत शितोळे त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुभवातून काहीतरी शिकवण्यासाठी आणि देण्यासाठी आलेली असते. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना योग्य दिशा आणि संधी मिळाल्यास भविष्यातील उद्योजक निश्चितपणे घडतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी यशस्वी उद्योजकतेच्या उदाहरणांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी केवळ कल्पना करण्यापुरते मर्यादित न राहता त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. KCE सोसायटीची ही उपक्रमशील वाटचाल निश्चितच व्यापक ओळख निर्माण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ज्ञानाचा वापर कौशल्यासाठी, कौशल्याचा वापर व्यवसायासाठी
जळगावचे जिल्हाधिकारी रोहनजी घुगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना ज्ञानाचा वापर कौशल्यासाठी आणि कौशल्याचा वापर व्यवसाय व उद्योजकतेसाठी केला, तर यश निश्चित मिळते,” असा संदेश दिला.विद्यार्थ्यांना आपल्या प्रकल्पांचे Project Showcase करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळत आहे. या संधीमुळे त्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढेल आणि भविष्यात या संधीचे सोने करून ते यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना विशेष भेट देत, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, नवोन्मेषाला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, तसेच त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे हा या भेटीमागील मुख्य हेतू असल्याचे स्पष्ट केले.”
‘मनातील कल्पना कागदावर आणि कागदावरील कल्पना वास्तवात’
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. भालचंद्र पाटील यांनी ‘Mind Spring’ या नावाचा अर्थ स्पष्ट केला. ‘Mind म्हणजे मन आणि Spring म्हणजे झरा; मनातून निर्माण होणाऱ्या कल्पनांचा हा झरा म्हणजे Mind Spring’, असे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना केंद्रस्थानी ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला असून विद्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. “मनात कोणतीही कल्पना आली की ती प्रथम कागदावर उतरते आणि त्यानंतर ती प्रत्यक्ष वास्तवात आणता येते,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना कल्पनांवर काम करण्याचे आवाहन केले. उद्योजकतेसाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत व सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी आपण सकारात्मक राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पाच विषय-थीमवर आधारित विद्यार्थी-केंद्रित उपक्रम
‘माइंड स्प्रिंग-२०२६’ हा पूर्णपणे विद्यार्थी-केंद्रित उपक्रम असून विविध ज्ञानशाखांमधील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ देण्यात आले आहे. विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, मानवविद्या, वाणिज्य व व्यवस्थापन आदी विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण प्रकल्प येथे सादर करण्यात आले आहेत.
३ शाळांचे २१ स्टॉल्स,के. सी. ई. च्या अंतर्गत येणारे मू. जे. महाविद्यालय, आयएमआर कॉलेज, इंजिनिअरिंग, बी एड कॉलेज, विधी महाविद्यालय यांचे एकूण १४० संघ यांनी सहभाग नोंदवला. तसेच ३२ रेडी-टू-फ्लोट स्टार्टअप्स यामुळे हे प्रदर्शन विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. शिक्षण केवळ ज्ञानप्राप्तीपुरते मर्यादित न राहता त्यातून कौशल्य, कौशल्यातून व्यवसाय आणि व्यवसायातून रोजगारनिर्मिती व्हावी, या व्यापक उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या पाटील व आभार प्रदर्शन डॉ. नूतन राठोड यांनी केले. प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनांना योग्य व्यासपीठ मिळून त्यांच्यातील उद्योजक घडण्यास निश्चितच चालना मिळेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. ६ व ७ ऑक्टोबर रोजी एम. जे. कॉलेजच्या बास्केटबॉल कोर्टवर हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.












