पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ…! हजारो लोक इस्लामाबादकडे कूच करू लागले, संसद परिसराला कंटेनर्सचे कुंपण
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीवरून पाकिस्तानातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा अत्यंत स्फोटक बनले आहे. इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’ पक्षाच्या हजारो संतप्त कार्यकर्त्यांनी खैबर पख्तूनख्वामधील लक्की मारवत येथून राजधानी इस्लामाबादच्या दिशेने भव्य ‘लाँग मार्च’ (महामोर्चा) सुरू केला आहे.
सुमारे २७५ किलोमीटर अंतराचा प्रवास करून हा मोर्चा इस्लामाबादला धडकणार असून, मोर्चेकऱ्यांना रोखण्यासाठी शाहबाज शरीफ सरकार आणि पाकिस्तानी लष्कराने राजधानीकडे जाणारे महामार्ग आणि संसद परिसराचे रस्ते मोठे कंटेनर्स लावून पूर्णपणे सील केले आहेत.
फ्रंटियर फोर्सशी जोरदार चकमक; तुफान दगडफेक आणि लाठीमार लाँग मार्च सुरू झाल्यानंतर अवघ्या ३ किलोमीटर अंतरावरच पोलीस, निमलष्करी दल (फ्रंटियर फोर्स) आणि इम्रान समर्थक समोरासमोर आले. आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी बळाचा वापर करत लाठीमार केला, तर प्रत्युत्तरात कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक केली. सुमारे तासभर चाललेल्या या हिंसक संघर्षांनंतर आंदोलकांनी मोर्चा पुढे नेला.
दोन हजार कार्यकर्त्यांची धरपकड मोर्चा रोखण्यासाठी पंजाब प्रांतात शनिवारी रात्रीपासूनच पीटीआय कार्यकर्त्यांचे व्यापक अटकसत्र सुरू झाले असून, आतापर्यंत दोन हजारांहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा दावा पीटीआयने केला आहे.
आर्मी चीफ आणि पीटीआय खासदाराची गुप्त बैठक वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पीटीआयचे खासदार शहजाद शहबाज यांनी रविवारी रात्री उशिरा पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची भेट घेऊन चर्चा केली; मात्र या बैठकीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.
अडियाला जेलमध्ये इम्रान खान; पत्नी आणि बहिणीही अटकेत ७३ वर्षीय इम्रान खान हे ऑगस्ट २०२३ पासून रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात कैद आहेत. त्यांच्यावर १०० हून अधिक गुन्हे दाखल असून तोशाखाना, गुप्त कागदपत्रे लीक (सायफर केस) आणि अल-कादीर ट्रस्ट प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांची पत्नी बुशरा बीबी या देखील तुरुंगात असून, सप्टेंबर महिन्यात त्यांच्या अलीमा, उजमा आणि नूरीन या तिन्ही बहिणींनाही प्रतिबंधात्मक कारवाईखाली ताब्यात घेण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १८ ऑगस्ट रोजी इम्रान खान यांना वैद्यकीय उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले होते, तरीही प्रशासनाने त्यांना तात्पुरते पिम्स रुग्णालयात नेऊन तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात डांबले.
चर्चा निष्फळ; “जीव गेला तरी मागे हटणार नाही” सरकार आणि पीटीआयच्या नेत्यांमध्ये दोन फेऱ्यांची चर्चा झाली, मात्र ती पूर्णपणे निष्फळ ठरली. सरकारने मोर्चा रद्द करण्याची अट घातली होती, तर पीटीआयने इम्रान खान यांच्यावर त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांकडून तातडीने उपचार करण्याची मागणी लावून धरली होती. यावर मोर्चात सहभागी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “शाहबाज सरकार आणि लष्करप्रमुख मुनीर यांनी कितीही अत्याचार केले तरी आता आम्हाला जीवाची पर्वा नाही; आम्ही इस्लामाबादमध्ये घुसणारच,” असा इशारा आंदोलक तरुणांनी दिला आहे.
खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी मोर्चा पुढे सुरूच ठेवण्याची घोषणा केली असून, ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान विविध भागांतील लाखो नागरिक या मार्चमध्ये सामील होणार आहेत.
शाहबाज सरकार आणि मुनीर यांच्यासमोरील मोठे आव्हान माजी भारतीय राजनैतिक अधिकारी अविनाश मोहनानी यांच्या मते, हा मोर्चा जसजसा पंजाब प्रांतात प्रवेश करेल, तसतसा पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या खुर्चीवर मोठा दबाव निर्माण होईल. लष्कराने कितीही दडपशाही केली तरी इम्रान खान यांची लोकप्रियता आजही पाकिस्तानात कायम आहे आणि त्यांच्या सुटकेची खरी सूत्रे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या हातात आहेत. जर हा जनप्रवाह रोखता आला नाही, तर पाकिस्तानात पुन्हा लष्करी हुकूमशाही किंवा सत्तांतराची शक्यता नाकारता येत नाही.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











