आर. एल. चौफुलीवर भरधाव अज्ञात वाहनाचा कहर; एमआयडीसीतील कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
संदीप अलकरी यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत; वाहनचालक फरार, एमआयडीसी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील आर. एल. चौफुली परिसरात रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
या अपघातात संदीप सुपडू अलकरी (वय ४८, रा. अयोध्या नगर, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. ते एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. रविवारी दुपारी काम आटोपल्यानंतर ते नेहमीप्रमाणे दुचाकीवरून घरी परतत होते. सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास आर. एल. चौफुली येथे भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, संदीप अलकरी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्रे फिरवली आहेत. अपघातानंतर वाहनचालक फरार झाल्याने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
संदीप अलकरी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अयोध्या नगर परिसरात तसेच त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा तातडीने शोध घेऊन संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











