महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक ‘डिव्हाइस क्लोजर’ शस्त्रक्रिया यशस्वी
मुंबईतील बालहृदयरोग तज्ज्ञांच्या सहकार्याने कॅथलॅबमध्ये चिरफाडविरहित उपचार; दोन बालकांना मिळाले नवजीवन
जळगाव | प्रतिनिधी : जळगावातील महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्र (Congenital Heart Disease) असलेल्या दोन बालकांवर अत्याधुनिक डिव्हाइस क्लोजर पद्धतीने यशस्वी उपचार करण्यात आले. अत्याधुनिक कॅथलॅबमध्ये कोणतीही मोठी चिरफाड न करता रक्तवाहिनीद्वारे विशेष डिव्हाइस बसवून हृदयातील छिद्र बंद करण्यात आले. या यशस्वी उपचारामुळे उत्तर महाराष्ट्रातील बालहृदयरुग्णांसाठी आधुनिक उपचारांची नवी आशा निर्माण झाली आहे.
ही प्रक्रिया महादेव हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजी) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यासाठी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. भूषण चौहान आणि डॉ. धवल खडके यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच डॉ. झीशान सय्यद (कार्डिओलॉजी निवासी वैद्यकीय अधिकारी) यांनीही या शस्त्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कॅथलॅब टेक्निशियन मोहम्मद सिद्दिकी यांनी संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तांत्रिक जबाबदारी उत्कृष्टरीत्या सांभाळली.
डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले की, जन्मजात हृदयातील छिद्राची वेळेत तपासणी आणि योग्य उपचार झाल्यास मुलांचे आयुष्य पूर्णपणे निरोगी राहू शकते. आधुनिक डिव्हाइस क्लोजर तंत्रज्ञानामुळे छाती उघडण्याची गरज लागत नाही. त्यामुळे रक्तस्राव अत्यल्प होतो, संसर्गाचा धोका कमी राहतो, रुग्ण लवकर बरा होतो आणि अल्पावधीत घरी परतू शकतो.
या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रातील बालहृदयरुग्णांना अशा प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांसाठी मुंबईसारख्या महानगरात जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. महादेव हॉस्पिटलमध्येच आता उच्च दर्जाची बालहृदयरोग (पेडियाट्रिक कार्डिओलॉजी) सेवा उपलब्ध असल्याचे या यशस्वी उपचारातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










