जळगाव | प्रतिनिधी :
जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वारंवार घडणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पिंप्राळा परिसरातील गणपती नगर येथे रविवारी रात्री घडलेल्या आणखी एका घटनेने या समस्येची तीव्रता पुन्हा अधोरेखित केली आहे.
गणपती नगरातील रहिवासी नरेंद्र मांडगे यांचा पाच वर्षीय मुलगा अनुज मांडगे हा रविवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घराजवळ खेळत असताना मोकाट कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला करून चावा घेतला. जखमी अनुजला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत महानगरपालिका प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, पिंप्राळा येथील गट क्रमांक ३०३ मधील महादेव मंदिर परिसरात गेल्या दोन महिन्यांत मोकाट कुत्र्यांच्या चाव्याच्या किमान चार घटना घडल्या आहेत. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून धोकादायक कुत्र्यांना पकडणे किंवा परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील विविध भागांमध्येही अशाच प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या मुलावरही मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. त्याआधी नागेश्वर कॉलनी परिसरात कुत्र्याच्या चाव्यामुळे एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहर हादरले होते. मात्र, या गंभीर घटनांनंतरही प्रशासनाकडून अपेक्षित गतीने उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
महानगरपालिकेच्या महासभेत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आणि निर्बिजीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीचा मुद्दा अनेकदा चर्चिला गेला आहे. संबंधित मक्तेदाराकडून समाधानकारक काम होत नसल्याचा आरोप करत काही लोकप्रतिनिधींनी त्याचा ठेका रद्द करून काळ्या यादीत टाकण्याची मागणीही केली होती. मात्र प्रशासनाने सुधारित कामगिरीसाठी अतिरिक्त मुदत दिली. तरीही शहरातील परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे वास्तव समोर येत आहे.
दरम्यान, नागरिकांनी महानगरपालिकेकडे धोकादायक मोकाट कुत्र्यांना तातडीने पकडणे, निर्बिजीकरण मोहिमेला गती देणे, नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यान्वित करणे आणि संवेदनशील भागांमध्ये विशेष मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.
शहरातील वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा केवळ प्राणी नियंत्रणाचा विषय राहिलेला नसून तो थेट नागरिकांच्या जीवित आणि सुरक्षिततेशी संबंधित गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे केवळ बैठका आणि आश्वासनांवर न थांबता ठोस कृती आराखडा राबवून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून तीव्रतेने व्यक्त केली जात आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











