जळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेचे बनावट लेटरहेड; विजय पाटीलसह इतरांविरुद्ध पोलिसांत गुन्हा!
जळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेचे बनावट लेटरहेड तयार करून स्वतःला अध्यक्ष भासवल्याप्रकरणी विजय पाटील यांच्यासह इतरांवर जिल्हापेठ पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित, या संस्थेचे बनावट लेटरहेड तयार करून स्वतःला संस्थेचा अध्यक्ष असल्याचे भासवत विविध शासकीय कार्यालयांना पत्रव्यवहार केल्याप्रकरणी काही संशयितांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. संस्थेच्या नावाचा आणि लेटरहेडचा कथित गैरवापर करून शासकीय कार्यालयांची दिशाभूल केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, जिल्हा पेठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
या प्रकरणी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेचे मानद सचिव निलेश रणजित भोईटे (४६, रा. भोईटे नगर, जळगाव) यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संशयित विजय भास्कर पाटील (रा. दीक्षित वाडी, जळगाव) यांनी स्वतःला संस्थेचा अध्यक्ष म्हणून दर्शवत संस्थेच्या नावाचे बनावट लेटरहेड तयार केले. त्यानंतर ८ एप्रिल २०२६ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सहाय्यक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) तसेच सहसंचालक कार्यालय, जळगाव येथे या बनावट लेटरहेडवर पत्रव्यवहार करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
नाशिक कार्यालयालाही पत्र
याचप्रमाणे ४ मे २०२६ रोजी नाशिक येथील सहाय्यक आयुक्त, मागासवर्ग कक्ष यांच्या कार्यालयातही त्याच स्वरूपाचा पत्रव्यवहार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित पत्रांवर संस्थेचे अधिकृत लेटरहेड असल्याचा भास निर्माण करून त्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे संस्थेची प्रतिमा मलीन होण्याबरोबरच शासकीय कार्यालयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सोमवारी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४० आणि ३१८(४) अंतर्गत विजय भास्कर पाटील व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.
संशयितांविरुद्ध यापूर्वीही गुन्हा दाखल
दरम्यान, विजय भास्कर पाटील यांच्याविरुद्ध यापूर्वीही जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन विजय पाटील व अन्य आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. संस्थेच्या नावाचा वापर करून शासकीय कार्यालयांकडे पाठविण्यात आलेल्या पत्रव्यवहारामागील उद्देश काय होता, त्यातून कोणता लाभ मिळविण्याचा प्रयत्न झाला का, तसेच या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा जिल्हापेठ पोलीस सखोल तपास करीत आहेत. तपासानंतर या प्रकरणात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











