पाचोरा : कर्तव्य बजावताना अनेक अधिकारी आपली जबाबदारी पार पाडतात; मात्र संकटाच्या क्षणी स्वतःचा विचार न करता अनोळखी व्यक्तींच्या मदतीसाठी धावून जाणारे अधिकारी समाजाच्या मनात कायमचे स्थान निर्माण करतात. अशीच एक हृदयस्पर्शी आणि माणुसकीला सलाम करायला लावणारी घटना पाचोरा शहराबाहेर घडली.
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. विजय पवार तसेच पिंपळगाव (हरे) केंद्राचे विशेष शिक्षक श्री. घनःश्याम चौधरी हे वरखेडी येथे वस्तीगृह तपासणीसाठी गेले होते. तपासणीचे काम पूर्ण करून ते पाचोऱ्याकडे परतत असताना साइमोक्ष लॉन्स परिसराच्या जवळ एक भीषण अपघात झालेला त्यांच्या निदर्शनास आला.
मोटरसायकलसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून अपघात झाला होता. अपघातात कोकडी तांडा येथील रहिवासी असलेले वृद्ध दाम्पत्य आणि त्यांची मुलगी गंभीर जखमी झाले होते. वृद्ध आई-वडिलांची शुद्ध हरपली होती, तर मुलगीही जखमी अवस्थेत विव्हळत मदतीची वाट पाहत होती.
हा प्रसंग पाहताच विजय पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली गाडी थांबवली. आजूबाजूला गर्दी जमण्याची किंवा इतर कोणीतरी मदतीला येण्याची वाट न पाहता त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. श्री. घनःश्याम चौधरी यांच्या मदतीने तिघांनाही आपल्या वाहनात बसवून तातडीने पाचोरा येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
या मदतीदरम्यान जखमींच्या अंगावरील रक्तामुळे साहेबांचे कपडे रक्ताने माखले आणि वाहनातही रक्त सांडले. मात्र त्या क्षणी कपडे खराब होतील, गाडी खराब होईल, याचा विचार न करता एका माणसाचा जीव वाचवणे हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर जखमींना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. वेळीच मिळालेल्या मदतीमुळे उपचार सुरू होण्यास महत्त्वाचा वेळ वाचला आणि जखमींचे प्राण वाचवण्यात मदत झाली.
ही घटना केवळ एका अपघाताची नाही, तर ‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’ याची जिवंत साक्ष आहे.
पद मोठे असणे महत्त्वाचे नाही; संकटात एखाद्याच्या मदतीला धावून जाणारे मन मोठे असणे महत्त्वाचे असते. विजय पवार आणि घनःश्याम चौधरी यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता केलेली ही मदत समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
रक्ताने माखलेले कपडे धुवून स्वच्छ होतील… गाडीही स्वच्छ होईल… पण त्या क्षणी वाचवलेल्या जीवांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनातील कृतज्ञतेचे ऋण कधीही धुतले जाणार नाही.
कर्तव्य संपवून घरी परतताना माणुसकीचे कर्तव्य बजावणाऱ्या विजय पवार आणि घनःश्याम चौधरी यांना मनापासून सलाम!
हीच खरी माणुसकी… हीच खरी संवेदनशीलता!‘अधिकारी’ म्हणून नव्हे, तर ‘माणूस’ म्हणून त्यांनी जिंकली मने!
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










