महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन,वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; क्रिकेट जगताला मोठा धक्का

क्रिकेट जगतातून एक अत्यंत दुःखाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट इतिहासातील महानतम ऑलराउंडर आणि वेस्टइंडीजचे दिग्गज खेळाडू सर गारफील्ड सोबर्स यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. येत्या 28 जुलै रोजी त्यांचा 90 वा वाढदिवस होता, परंतु त्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट वेस्टइंडीजने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोबर्स यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. सर गारफील्ड सोबर्स यांना जगभरात ‘सर गॅरी सोबर्स’ या नावानेही ओळखले जात असे.

सर गॅरी सोबर्स यांना क्रिकेट इतिहासातील सर्वात ‘संपूर्ण खेळाडू’ (Complete Cricketer) मानले जाते. त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर असा स्तर प्रस्थापित केला, ज्याचा आदर्श आजही दिला जातो. सोबर्स यांनी अशा काळात क्रिकेट खेळले जेव्हा वेस्टइंडीजची टीम जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात मजबूत आणि आक्रमक मानली जात होती. त्यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांचे नाव खेळाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरले गेले आहे.
टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास
सर गारफील्ड सोबर्स यांनी सोबर्स यांनी 1954 ते 1974 या वीस वर्षांच्या प्रदीर्घ काळात विंडीजचं कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं. वेस्टइंडीजसाठी 93 कसोटी (Test) सामने खेळले. या दरम्यान त्यांनी 160 डावांमध्ये 57.78 च्या उत्कृष्ट सरासरीने 8,032 धावा केल्या. त्यांच्या काळाचा विचार करता ही सरासरी अत्यंत असाधारण मानली जाते. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 26 शतके, 30 अर्धशतके, दोन द्विशतके आणि एक त्रिशतक झळकावले. त्यांची नाबाद 365 धावांची सर्वोत्तम खेळी तत्कालीन कसोटी क्रिकेटमधील जागतिक विक्रम होती, जी अनेक वर्षे कोणीही मोडू शकले नव्हते.

गोलंदाजीतही दाखवला मोठा करिष्मा
सोबर्स हे केवळ एक महान फलंदाज नव्हते, तर ते तितकेच घातक गोलंदाजही होते. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 235 विकेट्स घेतल्या. यात 6 वेळा डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी त्यांनी केली. सर गॅरी सोबर्स हे डाव्या हाताने अत्यंत वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत असत. टीमच्या गरजेनुसार ते ‘लेफ्ट आर्म फास्ट-मीडियम’, ‘लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिन’ किंवा ‘लेफ्ट आर्म अनऑर्थोडॉक्स स्पिन’ (चाइनामॅन) अशा सर्व प्रकारची गोलंदाजी सहज करायचे. हीच अद्भुत प्रतिभा त्यांना जगातील सर्वोत्तम ऑलराउंडर बनवते.
वेस्टइंडीजचे नेतृत्व आणि ‘नाइटहुड’ सन्मान
सर गॅरी सोबर्स यांनी केवळ खेळाडू म्हणूनच नाही, तर वेस्टइंडीज टीमचे कर्णधार म्हणूनही मोठी भूमिका बजावली. क्रिकेटमधील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना ‘नाइटहुड’ या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय, विजडनच्या ‘क्रिकेटर्स ऑफ द सेंचुरी’ आणि ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्येही त्यांना मानाचे स्थान मिळाले. सोबर्स यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ एकच वन-डे (ODI) सामना खेळला, ज्यामध्ये त्यांनी 1 विकेट घेतली होती.

क्रिकेट जगताची कधीही न भरून निघणारी हानी
सर गारफील्ड सोबर्स हे क्रिकेट विश्वातील पहिले आधुनिक ऑलराउंडर मानले जातात. त्यांची फलंदाजीची क्लासिक शैली, गोलंदाजीतील विविधता आणि मैदानातील चपळाई यामुळे त्यांनी कित्येक पिढ्यांना प्रेरित केले. आजच्या काळातील कोणत्याही ऑलराउंडरची तुलना करताना आजही सर गॅरी सोबर्स यांचीच कसौटी लावली जाते. त्यांच्या जाण्याने क्रिकेट जगताने एक खरा महानायक गमावला असून, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










