नेपाळचा मोठा निर्णय! परदेशी रेस्क्यू टीमला नकार; भारत-चीनसह अनेक देशांची मदत नाकारली, मृतांचा आकडा 469 वर
काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवरील भागात आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठ्या प्रमाणावर हाहाकार उडवला आहे. पूर, दरडी आणि ढिगाऱ्यांमुळे अनेक भाग उद्ध्वस्त झाले असून मृतांचा आकडा 469 वर पोहोचला आहे. तर 1,000 हून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या भीषण आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारत, चीन, अमेरिका, जपान, बांगलादेश आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांनी नेपाळला मदतीचा हात पुढे केला. हेलिकॉप्टर, प्रशिक्षित शोध-बचाव पथके आणि विशेष तज्ज्ञांची मदत पाठवण्याची तयारी या देशांनी दर्शवली. मात्र, नेपाळ सरकारने प्रत्यक्ष शोध आणि बचावकार्यासाठी परदेशी पथके स्वीकारण्यास नकार दिला आहे.
नेपाळ सरकारच्या म्हणण्यानुसार, देशातील सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक बचाव यंत्रणा सध्याची परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहेत. त्यामुळे बचावकार्य एका केंद्रीय कमांड सिस्टीमच्या माध्यमातून सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परदेशी मदत नाकारली, मात्र मदत साहित्य स्वीकारणार
नेपाळने परदेशी देशांकडून येणारी मदत सामग्री आणि आर्थिक मदत नाकारलेली नाही. मात्र, प्रत्यक्ष शोध आणि बचाव मोहिमेत सहभागी होण्यासाठी परदेशी पथके पाठवण्याच्या प्रस्तावांना सरकारने नकार दिला आहे.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने द काठमांडू पोस्टला दिलेल्या माहितीनुसार, शोध आणि बचाव पथके पाठवण्याची तयारी दर्शविणाऱ्या देशांना नेपाळने स्पष्ट केले आहे की, देशाची स्वतःची सुरक्षा यंत्रणा सध्या सुरू असलेल्या बचाव मोहिमेचे व्यवस्थापन करण्यास सक्षम आहे.
भारत आणि चीनसह अनेक देशांनी हेलिकॉप्टर तसेच प्रशिक्षित बचाव पथके पाठवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र नेपाळने सध्या ही मदत स्वीकारलेली नाही.
2015च्या भूकंपातून घेतला धडा
परदेशी बचाव पथकांना नकार देण्यामागे नेपाळच्या 2015च्या विनाशकारी भूकंपाचा अनुभव महत्त्वाचा असल्याचे सांगितले जात आहे.
2015च्या भूकंपानंतर जगभरातील अनेक देशांनी नेपाळमध्ये बचाव पथके आणि मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली होती. मात्र एकाच वेळी विविध देशांची पथके दाखल झाल्यामुळे त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करणे, समन्वय साधणे आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करणे यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.
त्यावेळी विमानतळ, रस्ते आणि दळणवळणाची यंत्रणा मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्याने परदेशी पथकांच्या हालचाली आणि मदतकार्याचे व्यवस्थापन आणखी कठीण झाले होते.
याच अनुभवातून धडा घेत नेपाळने यावेळी एकच कमांड सिस्टीम आणि केंद्रीकृत बचावकार्य यावर भर दिला आहे.
हजारो परदेशी नागरिकांबाबत माहिती गोळा करण्यासाठी केंद्रीय यंत्रणा
पूरग्रस्त भागात मोठ्या संख्येने परदेशी नागरिक अडकले असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त होत आहे. काही नागरिक संपर्काबाहेर असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या शोधासाठी आणि माहितीच्या समन्वयासाठी नेपाळ सरकारने केंद्रीय यंत्रणा तयार केली आहे.
या माध्यमातून विविध भागांत अडकलेल्या किंवा बेपत्ता असलेल्या परदेशी नागरिकांची माहिती एकत्रित केली जात आहे. संबंधित देशांच्या प्रशासनाशीही समन्वय साधण्याचे काम सुरू आहे.
मृतांचा आकडा 469; 1,000हून अधिक बेपत्ता
दरम्यान, तिबेट सीमेवरील भागात आलेल्या विनाशकारी फ्लॅश फ्लडमध्ये आतापर्यंत 469 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिखल, दगड, माती आणि ढिगारा साचला आहे.
बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी नेपाळच्या सुरक्षा यंत्रणांकडून मोहीम सुरू आहे. मात्र डोंगराळ आणि दुर्गम भागातील परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक असल्याने बचाव पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
1,000हून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
तिबेटमध्ये पुन्हा तलावातून पाण्याचा मोठा प्रवाह; नेपाळमध्ये अलर्ट
या संकटात आणखी एक धोकादायक घटना समोर आली आहे. तिबेटच्या भागातील एका तलावातून पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडल्याची माहिती मिळाल्यानंतर नेपाळ प्रशासनाने रसुवा जिल्ह्यात अलर्ट जारी केला आहे.
नदी आणि पाण्याच्या प्रवाहाच्या काठावर असलेल्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नेपाळ पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर याबाबत माहिती देत सुरक्षा कर्मचारी, बचाव पथके आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
पाण्याचा लोंढा वाढल्याने बचावकार्याला तात्पुरता ब्रेक
तिबेटच्या दिशेने पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर नेपाळमधील बचाव मोहिमेलाही तात्पुरता ब्रेक लावण्यात आला. बचाव पथकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत धोकादायक भागातून कर्मचाऱ्यांना मागे हटवण्यात आले.
परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आणि संबंधित भाग सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, मृतांचा वाढता आकडा, हजारो बेपत्ता नागरिक आणि पुन्हा वाढत असलेला पुराचा धोका यामुळे नेपाळसमोरील संकट अधिक गंभीर बनले आहे. एका बाजूला ढिगाऱ्यांमध्ये अडकलेल्यांचा शोध सुरू असताना दुसऱ्या बाजूला तिबेटमधून येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे बचाव पथकांसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










