भाजप वाढविण्यापासून महाराष्ट्र घडविण्यापर्यंत खडसेंचे मोठे योगदान; चंद्रकांत पाटलांची मुक्ताईनगरात सदिच्छा भेट
अमृत महोत्सवानिमित्त खडसेंना दिल्या शुभेच्छा; म्हणाले, “एकनाथ खडसे हे झुंजार नेते”
मुक्ताईनगर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे झुंजार नेते असून, महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे मजबूत करण्यासोबतच सामाजिक कार्य आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांची मुक्ताईनगर येथे सदिच्छा भेट घेत चंद्रकांत पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
एकनाथ खडसे यांचा अमृत महोत्सव सोहळा ३० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. मात्र, त्याच दिवशी पुण्यात आपल्या मतदारसंघातील पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने या सोहळ्याला उपस्थित राहता येणार नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे खडसे यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी आपण आज मुक्ताईनगर येथे आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“एकनाथ खडसे हे झुंजार नेते आहेत. महाराष्ट्रात भाजप वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. सामाजिक क्षेत्रासह महाराष्ट्र घडविण्याच्या प्रक्रियेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावे तसेच पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा,” असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
अमृत महोत्सवाला दिग्गज नेत्यांची उपस्थिती
एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध पक्षांतील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
दरम्यान, विविध राजकीय पक्षांतील नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असले तरी हा सोहळा कोणत्याही राजकीय हेतूने आयोजित करण्यात आलेला नाही, असे अमृत महोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी स्पष्ट केले आहे.
राजकारणात सत्ताधारी पक्षात असो अथवा विरोधी पक्षात, आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा अमृत महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
गिरीश महाजनांनाही निमंत्रण; उपस्थितीबाबत उत्सुकता
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनाही देण्यात आले आहे. खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते आणि सुनील नेवे यांनी जामनेर येथील गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निमंत्रण पत्रिका दिली.
यावेळी हात जोडून गिरीश महाजन यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात आली. मात्र, यावर “सगळ्यांचा विषय वेगळा, माझा विषय वेगळा,” अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
“सर्व नेते येत आहेत, तुम्हीही यावे. समितीमध्ये तुमचे नाव घेतो,” असे त्यांना सांगण्यात आले असता, “माझे नाव नको, तुम्हाला माहिती आहे,” असे उत्तर महाजन यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर महाजन यांनी निमंत्रण पत्रिकेतील मजकूर पाहिला आणि तोंडी प्रतिक्रिया न देता मान डोलावत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत संकेत दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याला गिरीश महाजन प्रत्यक्ष उपस्थित राहणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











