जळगावकरांना पाणी जपून वापरा शहरात आजपासूनच दहा टक्के पाणी कपात लागू
यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वाघूर धरणातील पाणीसाठा आणि संभव्य पाणीटंचाई लक्षात घेता, जळगाव महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. मनपा प्रशासनाने शहरात 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार आज म्हणजेच शनिवार, 17 ऑक्टोंबरपासून शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यात 15 मिनिटांची घट करण्यात आली असून, आता नागरिकांना 1 तास 30 मिनिटांऐवजी 1 तास 15 मिनिटेच पाणी मिळणार आहे.
शुक्रवारी पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत धरणातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. कमी पर्जन्यमान लक्षात घेता पुढील वर्षी ऑगस्ट 2027 पर्यंत पाणीटंचाईचे संकेत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारीचे उपाय म्हणून पाणीकपातचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दिवाळीनंतर शहरात 3 दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची शक्यताही प्रशासनाने वर्तवली आहे.
समाधानकारक पावसाअभावी धरणातील पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात सध्या एकूण क्षमतेच्या 69.59 टक्के म्हणजेच 173.179 दशलक्ष घनमीटर (दलघमी) जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाची शक्यता कमी असल्याने आणि उपलब्ध पाण्याचा वापर सातत्याने सुरू असल्याने पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. ही बाबा लक्षात घेत मनपा प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
त्यानुसार, पिण्याच्या पाण्याचा वापर करून वाहने धुणे, रस्त्यांवर पाणी मारणे अशा अनावश्यक कारणांसाठी पाणी वाया घालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी मनपाकडून विशेष पथक नियुक्त केले जाणार आहे. तसेच ज्या नळांना तोट्या नाहीत, त्यांचे सर्वेक्षण करून तोट्या बसवण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










