राजधानी हादरली! दिल्लीत 5 मजली हॉस्टेलची इमारत कोसळली; 50 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीतून रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण दुर्घटना समोर आली आहे. दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरातील सत्य निकेतन भागात ‘हॉस्टेल डेज’ नावाची पाच मजली मुलांची पीजी इमारत अचानक कोसळली. विशेष म्हणजे या इमारतीला लागून असलेली आणखी एक इमारतही त्याचवेळी कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना रविवारी दुपारी सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. दिल्ली विद्यापीठाच्या साउथ कॅम्पसजवळील या परिसरात अनेक विद्यार्थी पीजी आणि हॉस्टेलमध्ये राहत होते. इमारत कोसळली त्यावेळी अनेक विद्यार्थी आपल्या खोल्यांमध्ये असल्याने 50 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बचावकार्य युद्धपातळीवर
घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दल, आपत्कालीन पथके आणि बचाव यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी जेसीबी आणि अन्य अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
सत्य निकेतन परिसरातील अरुंद रस्ते आणि गल्ल्यांमुळे बचाव पथकांना घटनास्थळी मोठी यंत्रसामग्री नेण्यात अडचणी येत आहेत. तरीही उपलब्ध साधनांच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
तीन जणांना बाहेर काढले
प्राथमिक माहितीनुसार, बचाव पथकाने आतापर्यंत तीन जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. काही जण जखमी असल्याचे सांगण्यात येत असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली आणखी किती जण अडकले आहेत, याचा निश्चित आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.
स्थानिक नागरिकही मदतीला
दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांनीही बचावकार्यात मदतीचा हात पुढे केला आहे. हातोडे आणि अन्य साधनांच्या मदतीने नागरिक विटा, सिमेंटचे तुकडे आणि ढिगारा बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने शेजारील इमारतींमधील रहिवाशांनाही बाहेर हलवण्यात आले आहे.
वाहनांवरही कोसळला ढिगारा
इमारत कोसळल्याने आजूबाजूला मोठ्या प्रमाणात ढिगारा पसरला असून त्याखाली काही वाहनेही दबली गेल्याची माहिती आहे. बचाव पथकांकडून ढिगारा हटवताना अत्यंत काळजी घेतली जात आहे. कारण आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता असल्याने प्रत्येक भागाची तपासणी करूनच ढिगारा हटवला जात आहे.
या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. इमारतीची बांधकाम स्थिती, संरचनात्मक कमतरता किंवा अन्य कोणते कारण होते, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जाण्याची शक्यता आहे. सध्या सर्वांचे लक्ष ढिगाऱ्याखाली अडकलेल्या संभाव्य विद्यार्थ्यांच्या सुरक्षित सुटकेकडे लागले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










