पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमात खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदुकधारी बॉडीगार्ड ताब्यात
मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमादरम्यान सुरक्षेचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या दोन व्यक्तींना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका तरुणाकडे बनावट PMO ओळखपत्र आढळले, तर त्याच्यासोबत असलेल्या खासगी बॉडीगार्डकडे बंदूक असल्याचे समोर आले आहे.
बनावट PMO अधिकारी असल्याचा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन पारेख (24) नावाचा तरुण NMACC परिसरात वावरत होता. तो स्वतःला पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगत होता. मात्र, सुरक्षेवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची चौकशी करण्यात आली.
तपासणीदरम्यान त्याने दाखवलेले PMOचे ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
बॉडीगार्डकडे बंदूक
या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे रोहन पारेख एकटाच कार्यक्रमस्थळी आला नव्हता. त्याच्यासोबत एक खासगी बॉडीगार्ड होता आणि त्या बॉडीगार्डकडे बंदूक आढळून आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असताना बनावट ओळखपत्र असलेली व्यक्ती आणि शस्त्रधारी खासगी सुरक्षारक्षक परिसरात पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
क्राईम ब्रांचकडून चौकशी
दोन्ही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
रोहन पारेखने बनावट PMO कार्ड का तयार केले, ते त्याला कोणी उपलब्ध करून दिले, तो पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी नेमका कशासाठी आला होता आणि त्याच्यासोबत असलेल्या बॉडीगार्डकडे बंदुकीचा परवाना होता का, या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील प्रकरण असल्याने तपास यंत्रणा या घटनेकडे गांभीर्याने पाहत आहेत.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











