संपादकीय…….
राजा..तुला आता अनाथ बापाचा हुंदका ऐकायला येतोय का ? ?
जळगावचा फक्त २५ वर्षांचा जयदीप नेमाडे…१२ वर्षांपूर्वीच आई गेली होती. पोरगा जिद्दीने शिकला, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि MBA करून नुकताच पुण्यात एका चांगल्या नोकरीला लागला होता.
म्हाताऱ्या बापाच्या डोळ्यांत नवी स्वप्नं तरळत होती, ‘आपली म्हातारपणाची काठी आता बळकट झालीये’ या आनंदात तो बाप होता.
पण… बाप्पाच्या दर्शनाची ओढ म्हणून हा पोरगा मित्रांसोबत लालबागच्या रांगेत उभा राहिला. रात्रीचे पावणेबारा वाजलेले. तासनतास त्या गुदमरणाऱ्या, जीवघेण्या गर्दीत उपाशीपोटी उभा असताना त्याला अचानक त्रास होऊ लागला. श्वास कोंडला, छातीत असह्य वेदना झाल्या आणि गर्दीच्या त्याच चक्रव्युहात त्या उमद्या पोराने प्राण सोडले!
विचार करा त्या म्हाताऱ्या बापाचा… एका सेकंदात त्याचं सगळं जगच उद्ध्वस्त झालं. आयुष्यभराची कमाई आणि उरलीसुरली स्वप्नं एका झटक्यात संपली. आता आयुष्यभर फक्त आणि फक्त आक्रोश उरलाय. तो बाप आता कुणाकडे बघून जगणार?
ही फक्त एका तरुणाच्या मृत्यूची बातमी नाहीये, तर सणाच्या नावाखाली चाललेल्या धंदेवाईक बाजारावर आणि आपल्या ‘गुलामी मानसिकतेवर’ मारलेली भयंकर चपराक आहे!
रात्री तीन-तीन वाजता रांगेत उभं राहून कार्यकर्त्यांचे धक्के, शिव्या आणि अपमान खायचे… कशासाठी?
देव कधीच वाईट नसतो, पण देवाच्या नावाखाली स्वतःचा इगो आणि रुबाब मिरवणाऱ्या या सिस्टीमने माणसाची किंमत जनावरापेक्षाही कमी करून ठेवलीये. गळ्यात मोठमोठे आयकार्ड अडकवून सामान्य लोकांना जनावरांसारखं ढकलणारे हे कार्यकर्ते आणि बाउन्सर देवाच्या दारात कोणती भक्ती शिकवत आहेत?
खरंच तिथे स्वतःचा स्वाभिमान विकून इतकं लाचार होण्याची गरज आहे का?
गेल्या काही दिवसांतले लालबागचा राजाच्या दर्शनाचे व्हिडिओ बघा. १५-१६ तास उपाशीपोटी, त्या गुदमरणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये जनावरासारखे उभं राहायचं, कार्यकर्त्यांचे फालतू टोमणे आणि शिव्या ऐकायच्या, आणि शेवटी बाप्पासमोर पोहोचल्यावर दोन सेकंद नीट डोळे भरून पाहण्याआधीच एखाद्या गुन्हेगारासारखं मान पकडून बाहेर फेकून दिलं जायचं!
दुसरीकडे तथाकथित VIP, पुढारी आणि सेलिब्रिटी एसी गाड्यांमधून उतरून आरामात फोटोसेशन करतात, रिल्स बनवतात. सामान्य माणसाचा जीव आणि त्याचा स्वाभिमान इतका कवडीमोल झालाय का? असा स्वाभिमान विकून आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून घेतलेलं दर्शन देवाला तरी मान्य असेल का?
देव कधीही माणसाचा जीव किंवा लाचारी मागत नाही. जगातला कुठलाही चमत्कार किंवा नवस आता त्या म्हाताऱ्या बापाचा पोरगा परत आणू शकत नाही. देव तुमच्या घरातल्या देव्हाऱ्यातही तितकाच आहे आणि गल्लीतल्या शांत मंडळातही तितकाच आहे.
लालबागचा राजाला जाऊन तिथल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे धक्के खाण्यापेक्षा आपल्या गल्लीतल्या गणपतीला डोळे भरून पहा तिथल्या उत्सवात आणि आनंदात सामील व्हा नक्कीच देव पावेल…
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











