जळगावच्या भैय्यासाहेब गंधे हॉलमध्ये ‘राजवंश भारती’ पुस्तकाचे प्रकाशन
प्राचीन भारतीय राजघराण्यांच्या इतिहासाचा सचित्र मागोवा घेणाऱ्या पुस्तकाला मान्यवरांची उपस्थिती

जळगाव, दि. २८ सप्टेंबर : गुरुवर्य एडवोकेट अ. वा. अत्रे तसेच शिक्षण प्रसारक मंडळ सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एडवोकेट सुशील अत्रे लिखित ‘राजवंश भारती’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव येथील भैय्यासाहेब गंधे हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या प्रकाशन सोहळ्यास जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, राजेंद्र प्रकाशनच्या श्रीमती नीलिमा कुलकर्णी तसेच श्रीराम मंदिर संस्थान, जळगावचे विद्यमान गादीपती श्री. मंगेश महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘राजवंश भारती’ या पुस्तकामध्ये भारतात होऊन गेलेल्या विविध प्राचीन राजघराण्यांच्या इतिहासाचा सचित्र मागोवा घेण्यात आला आहे. भारतीय इतिहासातील विविध राजवंश, त्यांची परंपरा, तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि ऐतिहासिक संदर्भ यांचा अभ्यासपूर्ण वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
नवीन पिढीला प्राचीन इतिहास समजणे ही काळाची गरज : अशोकभाऊ जैन

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अशोकभाऊ जैन यांनी नवीन पिढीला भारताचा प्राचीन इतिहास योग्य आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने समजणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
इतिहास हा केवळ परीक्षेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेची ओळख करून देणारा असावा, असे त्यांनी सांगितले. याच अनुषंगाने अनुभूती विद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘राजवंश भारती’ हे पुस्तक देऊन त्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
जैन इरिगेशन तर्फे “राजवंश भारती” या पुस्तकाचा प्रातिनिधिक स्वीकार श्री.अनिल जोशी यांनी केला.
लेखनप्रक्रियेतील संदर्भ व अनुभवांचा नीलिमा कुलकर्णी यांनी घेतला आढावा
श्रीमती नीलिमा कुलकर्णी यांनी पुस्तकाच्या लेखन व प्रकाशन प्रक्रियेतील अनुभव कथन केले. लेखक सुशील अत्रे यांनी पुस्तक लिहिताना केलेले संशोधन, विविध ऐतिहासिक संदर्भांची जुळवाजुळव आणि माहिती संकलनासाठी घेतलेले परिश्रम यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
इतिहासासारख्या विषयावर पुस्तक तयार करताना संदर्भांची अचूकता आणि त्यांची योग्य मांडणी महत्त्वाची असते. या दृष्टीने लेखकाने केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी गौरव केला.
भारताचा इतिहास विक्रमादित्यांपासूनच दर्शविला जातो : एडवोकेट सुशील अत्रे

पुस्तकाचे लेखक एडवोकेट सुशील अत्रे यांनी आपल्या मनोगतात भारतीय प्राचीन राजवंशांची परंपरा आणि त्या काळातील सामाजिक परिस्थिती याविषयी विवेचन केले. भारताचा इतिहास हा केवळ विक्रमादित्यांपासून सुरू होत नाही, तर त्यापूर्वीच्या प्रदीर्घ कालखंडातही भारताची समृद्ध ऐतिहासिक परंपरा असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
प्राचीन भारतातील महिला शिक्षणाची परंपराही अधोरेखित करणारे विविध प्राचीन शिलालेख व ऐतिहासिक पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय इतिहासाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असून, उपलब्ध संदर्भ आणि पुराव्यांच्या आधारे इतिहास समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
झरोका ग्राफिक्सचे अनिल शिंपी यांचा सपत्नीक सत्कार
‘राजवंश भारती’ या पुस्तकाची मांडणी, छायाचित्रांची निवड आणि पुस्तकाचे दृश्यरूप अतिशय सुबक व कल्पक पद्धतीने साकारण्यात झरोका ग्राफिक्सचे श्री. अनिल शिंपी यांचे योगदान राहिले. त्यांच्या या कार्याबद्दल लेखक एडवोकेट सुशील अत्रे यांच्या हस्ते अनिल शिंपी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी दैनिक सकाळ, जळगावचे ब्युरो चीफ सचिन जोशी यांचाही सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एडवोकेट निशांत अत्रे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. सोनिका आनंद मुजुमदार (सारस्वत) यांनी केले, संपदा छापेकर यांनी पसायदान म्हटले तर सौ. प्रिया देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या प्रकाशन सोहळ्यास गुरुवर्य एडवोकेट अ.वा.अत्रे प्रतिष्ठान यांच्याशी संबंधित एडवोकेट आनंद मुजुमदार, एडवोकेट पद्मनाभ देशपांडे, वेव्हज् क्लासेसचे संचालक श्री. अभय कुलकर्णी व विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षण प्रसारक मंडळ सांस्कृतिक विभागाशी निगडित व्यक्ती तसेच जळगाव शहरातील मोठ्या संख्येने पुस्तकप्रेमी उपस्थित होते.
भारतीय इतिहासातील प्राचीन राजवंशांचा सचित्र आणि अभ्यासपूर्ण मागोवा घेणाऱ्या ‘राजवंश भारती’ या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे जळगावच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण भर पडल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










