
लातूर (प्रतिनिधी) –लातूर येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण लातूर शहर आणि वैद्यकीय क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. राठोड यांनी टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार आधीपासूनच घोळत होते, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. मागील आठ दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक आणि मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी एका मित्राशी बोलताना, “माझ्या मृत्यूनंतर तूच मला खांदा दे…” असा उल्लेख केला होता. मात्र, नंतर त्यांनी हा विषय विनोदावर नेला होता, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

*६ वर्षांच्या शौर्याने दिला मुखाग्नी*
गुरुवारी सकाळी शवविच्छेदनानंतर डॉ. मेहुल राठोड यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर दुपारी मारवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. राठोड यांचा अवघ्या ६ वर्षांचा मुलगा शौर्य याने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले होते. अंत्यसंस्कारासाठी मारवाडी स्मशानभूमीत मोठी गर्दी झाली होती. आज शुक्रवारी सायंकाळी शहरातील दयानंद सभागृहात त्यांच्या शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आज पोलीस त्यांची पत्नी आणि आईसह इतर नातेवाईकांचे जबाब नोंदवणार आहेत.
*मोबाईलला ‘फेस लॉक’; कॉल रेकॉर्डचे गुपित कायम*
डॉ. मेहुल राठोड हे आयफोन वापरत होते आणि या मोबाईलला त्यांचा स्वतःचा ‘फेस लॉक’ पॅटर्न आहे. त्यांच्या मृत्यूनंतर हा फोन अद्याप ओपन होऊ शकलेला नाही. त्यामुळे मोबाईलमध्ये काही मेसेज आहेत का? त्यांनी कोणती सुसाईड नोट लिहून ठेवली आहे का? किंवा त्यांचा शेवटचा कॉल कोणाला झाला होता? याची महत्त्वाची माहिती काढण्याचे मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

*आत्महत्येची ‘ही’ तीन प्रमुख कारणे*
डॉ. मेहुल राठोड यांच्या आत्महत्येमागे ३ कारणं असल्याची माहिती मिळत आहे. यातील पहिलं कारण म्हणजे कॅथलॅबसाठी ३ कोटींचं कर्ज. २०१९ मध्ये वडिलांच्या निधनानंतर डॉ. मेहुल यांनी अहमदाबाद सोडून लातूरमध्ये येत ‘एम. जे. हॉस्पिटल’ची धुरा स्वतःकडे घेतली होती. हॉस्पिटलमध्ये त्यांनी नुकतीच अत्याधुनिक कॅथलॅब उभारली होती आणि त्यासाठी त्यांनी तब्बल ३ कोटी रुपयांचे कर्ज काढले होतं. मात्र, रुग्णालयातील स्टाफ सतत बदलत असल्यामुळे कामावर विपरित परिणाम होत होता. यातून ते तणावग्रस्त झाल्याची माहिती आहे.
दुसरं कारण म्हणजे ते लातूर येथून पुण्यात शिफ्ट होण्याचा विचार करत होते. यावरून कुटुंबात काही दिवसांपासून चर्चा आणि वाद सुरू होते. लातूर येथील रुग्णालयाला मिळणारा प्रतिसाद आणि त्या तुलनेत पुण्यात शिफ्ट झाल्यास होणारा फायदा, यावरून घरातील सदस्यांमध्ये मतमतांतरे होती. या वादातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज आहे.

तिसरं कारण म्हणजे कामकाजाचा येणारा प्रचंड ताण. रुग्णालयातील सतत बदलणारा स्टाफ, त्याचा ओपिडीवर (OPD) होणारा परिणाम आणि रुग्णांचा प्रतिसाद यामुळे डॉ. मेहुल राठोड अलीकडच्या काळात प्रचंड तणावाखाली होते. त्यांना रात्रीची झोप येत नसल्यामुळे ते रात्रभर जागरण करायचे. याच नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज त्यांच्या निकटवर्तीयांनी वर्तवला आहे.
डॉ. मेहुल यांच्या मृत्यूची तीन कारणं सांगितली जात असली तरी अद्याप पोलिसांनी याची पुष्टी केली नाही. त्यांचा मोबाईलमधील डेटा मिळवण्याचा प्रयत्न पोलीसांकडून केला जात आहे. त्यांच्या फोनला फेस लॉक असल्याने डेटा मिळवण्यास विविध अडचणी येत आहे. सध्या पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











