अमेरिकेतील हजारो भारतीयांच्या नोकर्या धोक्यात? वर्क परमिटची 540 दिवसांची मुदतवाढ रद्द
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी कामगारांबाबत आणखी एक मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेतील ‘वर्क परमिट’च्या स्वयंचलित मुदतवाढीचा नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे एच-1बी व्हिसाधारक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो भारतीय नोकरदारांच्या नोकर्यांवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वर्क परमिटची मुदत संपल्यानंतर मिळणारी 540 दिवसांची स्वयंचलित मुदतवाढ आता संपुष्टात आली आहे. यापूर्वी, नूतनीकरणाचा अर्ज प्रलंबित असताना स्थलांतरित कामगारांना अमेरिकेत 540 दिवसांपर्यंत काम सुरू ठेवण्याची सवलत मिळत होती. ‘यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस’मधील अर्जांच्या प्रक्रियेत होणार्या विलंबामुळे कामगारांना नोकरी गमवावी लागू नये, या उद्देशाने ही मुदतवाढ दिली जात होती. मात्र, आता हा कालावधी रद्द करण्यात आल्यामुळे, ज्यांचे नवीन वर्क परमिट जुन्या परवान्याची मुदत संपण्यापूर्वी मंजूर होणार नाही, त्यांना काम थांबवावे लागणार आहे.
त्यामुळे हजारो परदेशी कामगारांना कायदेशीर अडचणींचा आणि नोकरी गमावण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हा नवीन नियम आज (14 ऑक्टोबर) ‘फेडरल रजिस्टर’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर लागू होणार आहे.
मागील काही महिन्यांत ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतर, टॅरिफ धोरण आणि ग्रीन कार्ड धोरणांबाबत अनेक कडक पावले उचलली आहेत.
काही दिवसांपूर्वीच एच-1बी व्हिसाची फी मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या धक्क्यातून परदेशी व्यावसायिक सावरत नाहीत तोच वर्क परमिटबाबतचा हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेत काम करणार्या भारतीय आयटी प्रोफेशनल्स आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा निर्णय अत्यंत चिंताजनक मानला जात आहे.
वर्क परमिटचे नूतनीकरण वेळेत न झाल्यास अनेक भारतीयांना आपल्या नोकर्या तात्पुरत्या किंवा कायमच्या गमवाव्या लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











