काकांच्या तेराव्याला जायची तयारी , पण लेकीचीच निघाली अंत्ययात्रा ; इलेक्ट्रिक हिटर ठरला जीवघेणा
छत्रपती संभाजीनगर : आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी वापरले जाणाऱ्या इलेक्ट्रिक हिटरमधून अचानक बसलेल्या तीव्र विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला.
जयभवानीनगर भागात मंगळवारी पहाटे ५.४० वाजेच्या सुमारास मन हेलावून टाकणारी ही घटना घडली आहे. यज्ञा प्रकाश देवरे असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
अभ्यासात हुशार असलेली यज्ञा सध्या नववीच्या वर्गात शिकत होती. तिची आई राजश्री देवरे या कृषी सेवक असून कांचनवाडीतील शासकीय कार्यालयात कार्यरत आहेत. तर मोठा २२ वर्षीय भाऊ रितेश एका प्रयोगशाळेत नोकरीला आहे.
काही दिवसांपूर्वी बुलढाण्यात राहणाऱ्या यज्ञाच्या काकांचे निधन झाले होते, त्यामुळे त्यांच्या धार्मिक विधी व तेराव्याच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण कुटुंबाला मंगळवारी सकाळीच बुलढाण्यासाठी जाण्याचे नियोजन ठरले होते.
बुधवारी सर्वजण पहाटे लवकर जागे झाले. आंघोळीसाठी पाणी गरम करण्याकरिता इलेक्ट्रिक हिटर चालू केला होता. मात्र, हिटर आधीपासून सुरू असल्याचे लक्षात न आल्याने यज्ञाने बादलीत थेट हात घातला.
तेव्हा हिटरमधील विद्युत प्रवाह पाण्यात उतरलेल्या असल्याने तिला झटका बसला. यात ती तडफडल्याने आई, भावाला आवाज आला. मात्र दरवाजा आतून बंद होता.
दरवाजा तोडून रुग्णालयात दाखल, पण… घटना कळताच शेजारीच तिच्या मामाने धाव घेतली. सर्वांनी मिळून दरवाजा तोडला. तोपर्यंत यज्ञा विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली होती.
यज्ञाला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी घाटीत जाण्याचा सल्ला दिला. मुकुंदवाडीचे पोलिस अंमलदार प्रकाश धात्रक यांनी धाव घेतली. त्यानंतर तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी यज्ञाला मृत घोषित करताच आई,
मामा, भावाने हंबरडा फोडला. तेव्हा डॉक्टरांचे हृदय पिळवटून निघाले. मंगळवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात यज्ञावर अंत्यसंस्कार झाले.
इलेक्ट्रिक वॉटर हिटर वापरताना काळजी घ्या -हिटर सुरू असताना किंवा नुकताच बंद केल्यावर पाण्यात हात घालून तापमान तपासू नका. पाण्यात हात घालण्यापूर्वी मुख्य स्विच बोर्डवरून हिटरचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद केल्याची खात्री करा. -नेहमी आयएसआय प्रमाणित, ऑटोमॅटिक कट-ऑफ फिचर्स असलेले आणि चांगल्या दर्जेदार ब्रँडचे इलेक्ट्रिक हिटर वापरा. जुने, खराब कॉइल किंवा वायर उघडे असलेले हिटर घातक असते. घरामध्ये इलेक्ट्रिक शॉकपासून बचावासाठी इएलसीबी, एमसीबी बसवलेले असावे. – ओपन इमर्शन रॉडपेक्षा घराच्या बाथरूममध्ये भिंतीवर फिट केलेले ऑटोमॅटिक गीझर, इन्स्टंट वॉटर हिटर अधिक सुरक्षित ठरते. यात पाण्याचा थेट उघड्या प्रवाहाशी संपर्क येत नाही.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










