चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

बिजिंग : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात अमेरिकेला मागे टाकून जगाचा बादशाह बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चीनला मोठा झटका बसला आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत नफ्याचे मशीन मानले जाणारे चीनचे एआय क्षेत्र आता देशाच्या बाजारपेठेसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे.
चीनमधील एआय कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी तोट्याचा सौदा ठरत आहेत. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार जून महिन्याच्या अखेरपासून आतापर्यंत चीनच्या तीन प्रमुख टेक्नॉलॉजी इंडेक्समध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 1.7 ट्रिलियन डॉलर म्हणजेच 158.10 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
ज्या गुंतवणूकदारांनी ‘डीपसीक मोमेंट’ (DeepSeek Moment) च्या चमकदार यशामुळे प्रभावित होऊन चीनच्या शेअर बाजारात पैसे गुंतवले होते, त्यांच्यासाठी ही घसरण एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. अलीबाबा आणि टेनसेंटसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश असलेला हँग सेंग टेक इंडेक्स दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे.
हार्डवेअर कंपन्यांवर लक्ष केंद्रित करणारा ChiNext इंडेक्स उन्हाळ्यात विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. मात्र, आता या वर्षात त्यात तब्बल 31 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. चिप कंपन्यांचा समावेश असलेला Star 50 इंडेक्सही मोठ्या प्रमाणात कोसळला आहे. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत Z.AI Co. आणि Zhongji Innolight Co. यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली विक्रमी वाढ आता पूर्णपणे नाहीशी झाली आहे.
चीनच्या एआय शेअर्सची अशी अवस्था का झाली?
जगभरातील एआय क्षेत्राचा वेग मंदावण्याचा सर्वाधिक परिणाम चीनवर झाल्याचे दिसत आहे. यामागील मोठे कारण म्हणजे चिनी कंपन्यांचे मूल्यांकन आधीच प्रचंड वाढले होते. या कंपन्या सरकारी मदतीवर अवलंबून होत्या. आता अमेरिकेने घातलेल्या कठोर निर्बंधांमुळे चीनच्या स्वस्त एआय मॉडेल्सचे आणि चिप निर्मितीमध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दाव्यांचे वास्तव समोर येऊ लागले आहे. अमेरिकन बाजारपेठेत एआय शेअर्सची विक्री सुरू झाल्यानंतर चीनच्या Star 50 इंडेक्सशी संबंधित KraneShares ETF मध्येही 4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. बाजारातील जाणकार याला आगामी काळात मोठी उलथापालथ होण्याचा संकेत मानत आहेत.
अमेरिकेच्या एका निर्णयाने चीनचे कंबरडे मोडले
डीपसीक आणि Huawei यांच्या सुरुवातीच्या यशामुळे चीन कमी खर्चात अमेरिकेला टक्कर देणारी एआय मॉडेल्स तयार करू शकेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र याच महिन्यात अमेरिकेने जारी केलेल्या नव्या मसुदा नियमांमुळे चीनच्या या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या नियमांनुसार चिनी कंपन्यांना परदेशातील डेटा सेंटरच्या माध्यमातून Nvidia आणि इतर कंपन्यांचे अत्याधुनिक प्रोसेसर भाड्याने घेण्यावर जवळपास बंदी येणार आहे. त्यामुळे एआय मॉडेल्सच्या पुढील पिढीला प्रशिक्षण देण्यासाठी उपलब्ध असलेला एक महत्त्वाचा पर्यायी मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.
याचे परिणाम आतापासूनच दिसू लागले आहेत. Artificial Analysis Intelligence Index च्या सध्याच्या टॉप 10 सर्वाधिक प्रगत एआय मॉडेल्सच्या यादीतून चीन पूर्णपणे बाहेर पडला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या चार महिन्यांपूर्वी चीनचे Kimi K3 मॉडेल OpenAI आणि Anthropic यांना टक्कर देत होते. चिप्सच्या कमतरतेमुळे टेनसेंटने आपल्या HY4 मॉडेलची पुढील आवृत्ती आणण्यास विलंब होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. तर अलीबाबानेही पुढील वर्षी आपल्या क्लाउड व्यवसायाचा विकास दर 30 ते 45 टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
Vantage Point Asset Management चे मुख्य गुंतवणूक अधिकारी निक फेरिस यांच्या मते, एआयमधून कमाई करण्याची मर्यादित क्षमता, कम्प्युटिंग संसाधनांची कमतरता, वाढती स्पर्धा आणि नफ्यावर येणारा दबाव यामुळे चीनमधील एआय कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत. अमेरिकेकडून तंत्रज्ञान आणि कम्प्युटिंग संसाधनांवरील निर्बंध वाढवण्यात आल्यामुळे एआय शेअर्समधील घसरण आणखी तीव्र झाली आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











