जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

जळगाव, २१ नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून, शहरातील किमान तापमान थेट ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. अवघ्या एका रात्रीत तापमानात तब्बल ४ अंशांची घसरण झाल्याने यंदाच्या हिवाळी हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, नोव्हेंबर महिन्यातील गेल्या वर्षीचा तापमानाचा विक्रमही यंदा मोडीत निघाल्याचे वृत्त आहे.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहराचे किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते, तर कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांच्या आसपास नोंदवले जात होते. मात्र, अचानक हवामानात बदल झाल्याने थंडीने जोरदार पुनरागमन केले आहे. यापूर्वी १२.६ अंशांवर असलेले किमान तापमान थेट ८ अंशांपर्यंत खाली आल्याने शहरासह परिसरात थंडीची तीव्रता वाढली आहे.
रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळी बोचऱ्या थंडीचा अधिक अनुभव येत असून, नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. शहरातील विविध भागांत नागरिक शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत. सकाळच्या वेळीदेखील गारठा जाणवत असल्याने दैनंदिन व्यवहारांवर थंडीचा परिणाम होत आहे.
जळगाव सोबतच धुळे जिल्ह्यातही तापमानाचा पारा नीचांकी पातळीवर पोहोचल्याने उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढल्याचे चित्र आहे. आगामी काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










