आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गावात त्यांच्या मातोश्री सावित्री देवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आईच्या निधनामुळे मुख्यमंत्री अत्यंत भावुक झाले होते. श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले, त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. मुख्यमंत्री योगी यांनी आपल्या आईच्या पार्थिवाला खांदा दिला. त्यानंतर अंत्ययात्रा हरिद्वारच्या दिशेने रवाना झाली.
सावित्री देवी यांचे शुक्रवारी (२० नोव्हेंबर) वयाच्या ९१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी सुमारे ११:३० वाजता हरिद्वार येथील चंडीघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आईच्या अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा लखनौकडे रवाना होतील.
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री योगी लावणार हजेरी
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी दुपारी २:१५ वाजेपर्यंत उत्तराखंडमध्ये असतील. त्यानंतर ते लखनौसाठी रवाना होतील. लखनौमध्ये संध्याकाळी साडे पाचच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या कौशल दीक्षांत समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत
गोरखपूरच्या कार्यक्रमात मिळाली होती दु:खद बातमी
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शुक्रवारी गोरखपूर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान आईच्या निधनाचे वृत्त कळाले होते. चंपा देवी पार्क येथे आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. भाजप खासदार रवी किशन यांना या घटनेची सर्वात आधी माहिती मिळाली.
त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचे सल्लागार आणि माजी आयएएस अधिकारी अवनीश अवस्थी यांना याबाबत कळवले. ६१ मिनिटांचे भाषण पूर्ण केल्यानंतर योगी आदित्यनाथ व्यासपीठामागे गेले. अवनीश अवस्थी यांनी त्यांना आईच्या निधनाची माहिती दिली. ही बातमी समजल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांच्या चेहऱ्यावरील भाव काही क्षणांसाठी बदलले, मात्र त्यांनी स्वतःला सावरत कार्यक्रम पूर्ण केला.कार्यक्रम संपल्यानंतर ते गोरखनाथ मंदिराकडे रवाना झाले आणि तेथून पुढे उत्तराखंडकडे निघाले.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











