राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?

धुळे शहराच्या राजकारणात वैयक्तिक टीकेचा वाद आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. सोशल मीडियावरील कथित मानहानीकारक टीकेच्या मानसिक तणावातून भाजपच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
गेल्या महिनाभरापासून महापौर मायादेवी परदेशी, त्यांचे चिरंजीव विकी परदेशी आणि धुळ्यातील गोरक्षक संजय शर्मा यांच्यात सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. कत्तलखाने आणि गो तस्करीच्या मुद्द्यावरून गोरक्षक संजय शर्मा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये खरं तर सोशल वॉर सुरू होते. याच मुद्द्यावरून महापौर महादेवी परदेशी यांनी शहरातील अवैध धंदे तसेच अवैध कत्तलखान्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी उपोषणाचा इशारा देखील दिला होता.
दरम्यान प्रशासनाने तात्काळ संशयित कत्तलखान्यांवर कारवाई देखील केली. मात्र या सर्व वादादरम्यान गोरक्षक संजय शर्मा यांनी सोशल मीडियावर महापौर मायादेवी परदेशी यांच्या विषयी आक्षेपार्ह वैयक्तिक स्वरूपाची पोस्ट केली होती. याच मानसिक तणावातून मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे.
महापौर परदेशी यांची प्रकृती सध्या स्थिर
महापौर मायादेवी परदेशी यांच्यावर धुळे शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावरील वैयक्तिक टीका आणि मानहानीकारक वक्तव्यांचा वाद आता थेट गंभीर घटनेपर्यंत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक टीका आणि महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्ये टाळण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











