समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले
जळगावमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला असून आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांच्यातील वादात मंत्री गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी करून दोघांची समजूत काढण्याची भूमिका मांडली होती.

मात्र, यावर आमदार किशोर पाटील यांनी थेट प्रतिक्रिया देत, समजाविण्याचा प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, असे म्हणत पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर पलटवार केला आहे.
जळगावमध्ये महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यातील राजकीय वाद चव्हाट्यावर आला आहे. महायुतीच्या मेळाव्यात मंगेश चव्हाण यांनी शिंदेसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा मुलगा सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज आपणच अवैध केला आणि नंतर वैध करण्यासाठीही आपणच प्रयत्न केल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर सुमित पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. आता आमदार किशोर पाटील यांनी मुलगा सुमित यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. या सगळ्या विषयावर दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप सुरू असताना गुलाबराव पाटलांनी मध्यस्थाची भूमिका निभावणार असल्याचे म्हटले होते.
गुलाबरावांनी आम्हाला समजावण्याच्या भानगडीत पडू नये
त्यावर गुलाबराव पाटील किंवा अन्य कुणीही आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करू नये, आम्ही काय करायचे हे आमचे आम्हाला समजते, असा पलटवार किशोर पाटलांनी केला आहे. आम्हाला तेवढी अक्कल, बुद्धी आणि क्षमता आमच्यात आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांनाच ठणकावले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून महायुतीमध्ये मोठा वादंग
दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून सुरू झालेल्या या वादामुळे महायुतीमध्ये मोठा वादंग निर्माण शक्यता आहे.तर शिवसेनेतील अंतर्गत कलह देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










