
जळगाव : जळगाव शहरालगतच्या पिंप्राळा येथे आषाढी एकादशीनिमित्त तब्बल 151 वर्षांची अखंड परंपरा लाभलेला श्री विठ्ठल-रुक्मिणीचा ऐतिहासिक रथोत्सव शनिवारी (दि. 25) लाखो भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत, भक्तिमय वातावरणात आणि अभूतपूर्व उत्साहात पार पडला. श्री विठ्ठल मंदिर संस्थान आणि वाणी पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याने संपूर्ण पिंप्राळा नगरीला अक्षरशः प्रति पंढरपूर’ चे स्वरूप प्राप्त करून दिले.
पहाटेपासूनच विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. पारंपरिक धार्मिक विधी, महापूजा आणि आरतीनंतर श्री विठ्ठल-रुक्मिणींच्या मूर्तींची भव्य रथात प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या अखंड नामघोषात रथोत्सवाला सुरुवात झाली. टाळ-मृदुंगाच्या गजरात, भगव्या पताकांच्या साक्षीने आणि भक्तांच्या जल्लोषात रथ मार्गस्थ होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

रथ ओढण्यासाठी भाविकांमध्ये उत्साह
रथाला दोर लावून ओढण्याचा मान मिळावा यासाठी हजारो भाविकांमध्ये अक्षरशः चढाओढ पाहायला मिळाली. खान्देशासह जळगाव जिल्ह्याच्या विविध भागांतून तसेच आसपासच्या जिल्ह्यांतून आलेल्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने रथ ओढत विठुरायाच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली. रथाच्या दर्शनासाठी आणि विठ्ठल-रुक्मिणींच्या कृपाशीर्वादासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी रथावर पुष्पवृष्टी करत दर्शनाचा लाभ घेतला.
‘पंजरी प्रसादा’ची अनोखी परंपरा आजही कायम
पिंप्राळा रथोत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आजही जपली गेलेली ‘पंजरी प्रसादा’ची परंपरा. धने, गूळ, खोबरं, सुंठ आणि वेलची या पाच घटकांपासून तयार करण्यात आलेला पारंपरिक पंजरी प्रसाद हजारो भाविकांना वितरित करण्यात आला. याशिवाय, या दिवशी पिंप्राळ्यातील माहेरवाशीण महिला खास सासरहून माहेरी येऊन रथोत्सवात सहभागी होतात, ही अनेक वर्षांपासूनची परंपरा यंदाही कायम राहिली.

दिंड्या, पालख्या आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात परिसर दुमदुमला
रथोत्सव मार्गावर विविध वारकरी दिंड्या, पालख्या, भजनी मंडळे, टाळ-मृदुंगाचा गजर, गुरव मंगल वाद्य, लेझीम पथके तसेच भवानी देवीच्या पारंपरिक सोंगांनी धार्मिक वातावरण अधिकच भारावून गेले. विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांनीही दिंड्यांद्वारे या सोहळ्यात सहभाग घेतला. भगव्या ध्वजांनी सजलेले रस्ते आणि विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन झालेला जनसमुदाय यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
भाविकांसाठी विविध सेवांची व्यवस्था
रथोत्सव मार्गावर अनेक सामाजिक संस्था, मंडळे आणि स्थानिक नागरिकांनी भाविकांसाठी चहा, सरबत, थंड पिण्याचे पाणी, फराळ आणि इतर अल्पोपहाराची मोफत व्यवस्था केली होती. स्वयंसेवक, पोलीस प्रशासन आणि आयोजकांनी गर्दीचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करत भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेतली. रथोत्सव सुमारे सात ते आठ तास सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
खान्देशाच्या सांस्कृतिक वैभवाची पुन्हा प्रचिती
भक्ती, परंपरा, सामाजिक एकात्मता आणि वारकरी संस्कृतीचा सुंदर संगम असलेल्या 151 व्या ऐतिहासिक पिंप्राळा रथोत्सवाने पुन्हा एकदा खान्देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाची प्रचिती दिली. लाखो भाविकांच्या उपस्थितीने पिंप्राळा नगरी भक्तीच्या महासागरात न्हाऊन निघाली आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











