अमळनेर : “आपल्या गावचा विठोबा आणि पंढरपूरचा विठोबा वेगळा असतो काय? नाही रे बाबा… विठोबा एकच असतो!” असा भक्तिभाव व्यक्त करत प्रतापनगर-गळवाडे रोड परिसरातील वारकरी, वैष्णव आणि बालगोपालांनी पायी वारी काढून विठ्ठलभक्तीचा अनोखा संदेश दिला.
खान्देशवासीयांचे अनेक वर्षांपासून श्रद्धास्थान असलेल्या आणि ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर नगरीत विठ्ठलाच्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला. भागवत धर्माची परंपरा जपत प्रतापनगर-गळवाडे रोड वेशीवरील वारकरी वैष्णव मंडळींनी बालगोपालांसह उत्साहात पायी दिंडी काढली.

“ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी”, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” अशा अखंड नामस्मरणात निघालेल्या या वारीत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भगवे झेंडे, टाळ-मृदंगाचा निनाद आणि अभंगांच्या सुरावटींनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला..यात धनश्री राहूल पुकळे हीने विठ्ठलाची तर सानिका सुनिल मराठे हीने रुक्मिणीची वेशभूषा साकारली यासाठी समृद्धी ब्युटी हब च्या सुषमा कासार याचे सहाय्य लाभले .
ही पायी वारी सेवा विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, वाडी चौक येथे पोहोचली. तेथे माऊलींचे दर्शन घेऊन हरिनामाच्या गजरात वारीची सांगता करण्यात आली. विशेष म्हणजे या वारीत महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. पारंपरिक वेशभूषा, डोक्यावर तुळशीवृंदावन, हातात टाळ आणि मुखी विठ्ठलनाम असा भक्तिमय देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
या निमित्ताने वारकरी संप्रदायाने “विठोबा हा सर्वांचा आहे; भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरण जिथे असते तिथेच पंढरपूर अवतरते,” हा संदेश समाजाला दिला. त्यामुळे प्रतापनगर-गळवाडे रोड परिसरात भरलेला हा वैष्णवांचा मेळा उपस्थित भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










