RPF श्वान ‘वीरू’ने शोधला १९.९५९ किलो गांजा; कानपूरचा २५ वर्षीय आरोपी भुसावळ स्थानकावर जेरबंद
भुसावळ : रेल्वे मार्गाने होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी भुसावळ विभाग रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) ‘ऑपरेशन नारकोस’अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. भुसावळ रेल्वे स्थानकावर ‘गीतांजली एक्सप्रेस’मधून उतरलेल्या एका प्रवाशाकडून तब्बल १९.९५९ किलो गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ९ लाख ९७ हजार ९५० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई १६ ऑगस्ट रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर करण्यात आली. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी भुसावळ जीआरपीच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
संशयास्पद हालचालींमुळे RPFला संशय
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक १२८६० गीतांजली एक्सप्रेस भुसावळ स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आली होती. त्यावेळी ड्युटीवर तैनात असलेले सुरक्षा आरक्षक लोकेश्वर यादव यांना एका डब्यातून खांद्यावर पांढरी गोणी घेऊन संशयास्पदरीत्या उतरणारा एक युवक दिसला.
RPF कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत गोणीबाबत चौकशी केली. प्राथमिक चौकशीत त्याने गोणीमध्ये गांजा असल्याचे सांगितल्याची माहिती आहे.
श्वान ‘वीरू’ने केली गांजाची खात्री
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन RPFने तत्काळ शोधक श्वान ‘वीरू’ याला घटनास्थळी पाचारण केले. वीरूने गोणीमध्ये अंमली पदार्थ असल्याचे संकेत दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोणीची झडती घेण्यात आली.
झडती दरम्यान गोणीमध्ये गांजाची १० बंडले आढळून आली. त्यांचे वजन केल्यानंतर एकूण १९.९५९ किलो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत ९ लाख ९७ हजार ९५० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आरोपी जीआरपीच्या स्वाधीन
या प्रकरणातील आरोपीचे नाव अरुण कुमार उर्फ सोनू लालू प्रसाद (वय २५, रा. चरतीपुर, जि. कानपूर, उत्तर प्रदेश) असे आहे.
ही कारवाई सहाय्यक सुरक्षा आयुक्त जितेंद्र सिंहा, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक महिलाल सिंह, CIBचे कॉन्स्टेबल कपिल कुमार तसेच जीआरपीच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.
यानंतर आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ जीआरपीच्या स्वाधीन करण्यात आला. जीआरपीने १७ ऑगस्ट रोजी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून, या गांजा तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, गांजा कुठून आणण्यात आला आणि तो कुठे पोहोचवला जाणार होता, याचा तपास सुरू आहे.
रेल्वे मार्गावरील तस्करीवर RPFची नजर
‘ऑपरेशन नारकोस’अंतर्गत झालेल्या या कारवाईमुळे रेल्वे मार्गाचा वापर करून अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांवर RPFची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने कारवाई करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










