‘गुरुजी परत द्या, नाहीतर आमच्या ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढा’; जाधव गुरुजींच्या बदलीविरोधात मलवडीकर आक्रमक
आज राज्यात एक ठिकाणी विद्यार्थी आपल्या मागण्यांकरिता रस्त्यावर उतरतानाचे चित्र नेत्यांनी आमचे बनलेले असतानाच अगदी ज्युनिअर जेन झी पिढीनेही अशाच प्रकारे आपल्या रास्त मागणी करता पालक वर्गाला रस्त्यावर उतरवले आहे.
मलवडी (ता. माण) : गावातील जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक तसेच भौतिक विकास घडवून आणणाऱ्या शिक्षक प्रशांत जाधव यांच्या बदलीविरोधात मलवडीतील पालक आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जाधव गुरुजींची बदली रद्द करून त्यांना पुन्हा शाळेत कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, या मागणीसाठी पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बदली रद्द न झाल्यास शाळेतील सर्व ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी ११ विद्यार्थ्यांच्या दाखला मागणीचे अर्ज पालकांनी शाळेत जमा केले. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या प्रकरणी दाद मागण्यासाठी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक देणार असून, प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे मलवडीकरांचे लक्ष लागले आहे.
बदलीनंतर प्रतिनियुक्ती, पुन्हा रद्द
शिक्षक प्रशांत जाधव यांची संचमान्यतेच्या नियमांचा आधार घेत बदली करण्यात आली होती. मात्र, जाधव यांनी शाळेच्या विकासासाठी केलेल्या कामामुळे ग्रामस्थ आणि पालक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांच्या बदलीनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करत बदली रद्द करण्याची मागणी केली होती.
ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने जाधव यांना प्रतिनियुक्तीवर पुन्हा मलवडीच्या शाळेत पाठवले. मात्र, ही प्रतिनियुक्ती अवघ्या दोन महिन्यांत रद्द करण्यात आली. त्यामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, त्यांनी आता थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
पालकांनी अधिकाऱ्यांना शाळेत बोलावले
आज सर्व पालक शाळेच्या आवारात एकत्र आले. त्यांनी जाधव गुरुजींच्या बदलीबाबत तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध केला. पालकांनी संबंधित अधिकाऱ्यांना शाळेत बोलावून घेत बदली रद्द करण्याची मागणी केली.
यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी, “माझ्या हातात काहीही नाही. जिल्हा पातळीवरून आदेश आणा, त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल,” अशी भूमिका घेतल्याचे पालकांनी सांगितले.
प्रशासनाकडून ठोस निर्णय न मिळाल्याने संतप्त पालकांनी आपल्या पाल्यांचे दाखले काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्याच दिवशी ११ विद्यार्थ्यांचे दाखला मागणी अर्ज शाळेत सादर करण्यात आले.
‘गुरुजींची बदली रद्द करा’
जाधव गुरुजींनी शाळेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्याशी पालक आणि विद्यार्थ्यांचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांची बदली झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत गेली. आता “गुरुजी परत द्या, अन्यथा ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढू,” असा स्पष्ट इशारा पालकांनी प्रशासनाला दिला आहे.
या आंदोलनात सरपंच दीपाली जगदाळे, रफिक मुलाणी, राजू खरात, अमोल पवार, रोहित जंगम, जितेंद्र जगदाळे, गणेश जगदाळे, वैभव खरात, सिकंदर मुलाणी, माऊली खरात, अनिल कुंभार यांच्यासह मोठ्या संख्येने पालक आणि ग्रामस्थ सहभागी झाले.
आता ग्रामस्थांचे शिष्टमंडळ जिल्हा परिषद प्रशासनाची भेट घेणार असून, जाधव गुरुजींची बदली रद्द करण्याबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.









