मृत्यूच्या दारातून विद्यार्थ्यांची सुटका! मुख्याध्यापकांच्या शौर्याने वाचले १,६४३ विद्यार्थ्यांचे प्राण
नैसर्गिक आपत्तींपुढे माणसाला असहाय्य वाटणे सामान्य आहे, पण कधीकधी एका व्यक्तीचे धैर्य आणि जलद, योग्य निर्णय शेकडो जीव वाचवू शकतात. अशीच एक घटना नेपाळच्या त्रिशुली खोऱ्यात घडली, जिथे हिमनदी फुटल्यामुळे (glacier broke) झालेल्या विनाशकारी विध्वंसात, ४७ वर्षीय इंग्रजी विषयाचे शिक्षक आणि प्राचार्य राजेंद्र दवाडी एका सुपरहिरोपेक्षा कमी नव्हते.
त्यांच्या प्रसंगावधानाने, धैर्याने आणि जलद निर्णयांनी त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक शाळेतील १,६४३ मुलांचे प्राण वाचवले.
बुधवारी सकाळी ९:२० वाजता, शाळेतील वातावरण इतर दिवसांप्रमाणेच सामान्य होते. सुमारे ९०० विद्यार्थी शाळेत आपापल्या वर्गात होते. तर ७०० हून अधिक विद्यार्थी बसने किंवा पायी येत होते. त्याच वेळी, प्राचार्य राजेंद्र दावडी यांचा फोन वाजला तो नदीच्या वरच्या बाजूला (बेत्रावती) राहणाऱ्या एका मित्राचा घाबरलेल्या आवाजात फोन होता. मुख्याध्यापक दवाडी यांना सांगण्यात आले होते की, पुरामुळे गाव वाहून गेले आहे आणि सर्वांनी गाव सोडून पळून जावे. सुरुवातीला, प्राचार्यांना वाटले की, ६० मीटर उंचीवर असलेली त्यांची तीन मजली सिमेंटची शाळा सुरक्षित असेल, पण पुढच्याच क्षणी, एक घाबरलेला पालक धावत येऊन त्यांना सांगितले की नदीची पातळी वेगाने वाढत आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच, प्राचार्य दवाडी यांनी तात्काळ शाळेची घंटा वाजवली
एक क्षणही वाया न घालवता, त्यांनी तात्काळ शाळेची घंटा वाजवण्याचा आदेश दिला. सर्व शिक्षकांना तात्काळ सर्व वर्गखोल्या रिकाम्या करून मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्याच वेळी, त्यांनी प्रत्येकी ८० मुलांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसच्या चालकांना फोन करण्यास सुरुवात केली. सुदैवाने, त्यांनी जवळपास सर्व चालकांशी संपर्क साधला आणि त्यांना तात्काळ यू-टर्न घेण्याचे निर्देश दिले.
शेवटची स्कूल बस आणि कोसळणारा पूल
फक्त एकच बस होती, जिच्या चालकाशी संपर्क होऊ शकत नव्हता. राजेंद्र दवाडी शाळेच्या बाहेर आले आणि त्यांनी पाहिले की तीच बस लोखंडी पूल ओलांडून शाळेच्या दिशेने जात होती, तर खाली खवळलेले नदीचे पाणी वेगाने शाळेच्या परीसराकडे येत होते. मुख्याध्यापकांनी मोठ्याने ओरडून आणि हातवारे करून चालकाला इशारा केला. क्षणात, चालकाने बस मागे घेतली आणि सुरक्षित अंतरावर नेली. बस निघून गेल्याबरोबरच, तो पूल पत्त्यांच्या घरासारखा कोसळला आणि नदीत पाण्याबरोबर वाहून गेला.
या अचानक आलेल्या आपत्तीमुळे घाबरलेली निष्पाप मुले डोंगराच्या दिशेने धावली
एका मुलीला पॅनिक अटॅक आला आणि कर्मचाऱ्यांनी तिला तात्काळ सायकलवर बसवून डोंगराच्या दिशेने पाठवले. प्राचार्य दवाडी आणि त्यांच्या शिक्षकांनी मुलांना प्रोत्साहन देत त्यांना वर चढायला प्रवृत्त केले. मुले धावत डोंगराच्या माथ्यावर असलेल्या एका पिंपळाच्या झाडा जवळ पोहोचले. ते डोंगराच्या माथ्यावर पोहोचताच, पाणी, बर्फ, खडक आणि चिखलाच्या ९ मीटर (सुमारे ३० फूट) उंच लाटेने संपूर्ण शाळेवर हल्ला केला. काही मिनिटांतच, ती सुंदर तीन मजली शाळेची इमारत कोसळली अन् फक्त गाळ, चिखल शिल्लक राहिला.
जीव वाचल्याचा आनंद पण…प्राचार्य दवाडी यांनी १,६४३ निष्पाप मुलांना वाचवले, पण शाळेने आपले दोन शूर सहकारी गमावले. संतोष परियार, ३२ वर्षीय सामाजिक इतिहासाचे शिक्षक, वर्गानंतर स्वयंपाक करण्यासाठी आपल्या खोलीत गेले आणि पुराच्या पाण्यात वाहून गेले. सुलतान लामा शाळेचा शिपाई, याने प्राचार्यांना चाव्या दिल्या होत्या, पण शाळेचे दरवाजे बंद करण्यासाठी तो धावत खाली गेला आणि लाटांमध्ये वाहून गेला. जगभरातील माध्यमांनी ‘सुपरहिरो’ म्हणून गौरव केला असला, तरी राजेंद्र दावडी यांच्या डोळ्यांत आपल्या माणसांना गमावल्याचे दुःख स्पष्ट दिसत आहे. ढिगाऱ्याकडे पाहत ते अत्यंत नम्रपणे म्हणतात, “दुसरा पर्यायच काय होता माझ्याकडे? त्या क्षणी माझ्या मुलांच्या जीवापेक्षा मोठं दुसरं काहीच नव्हतं”.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











