पुणेकरांनो, शहरात येताय? आधी वाहतुकीतील बदल जाणून घ्या; दहीहंडीमुळे ‘या’ मार्गांवर निर्बंध
पुणे : श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे शहरातील विविध भागांत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. नागरिकांची आणि गोविंदा पथकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक शाखेने ४ आणि ५ सप्टेंबर रोजी परिस्थितीनुसार वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात घराबाहेर पडताना नागरिकांनी वाहतुकीच्या नियोजनाची माहिती घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फडके हौद परिसरात वाहतुकीवर निर्बंध
४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत फडके हौद परिसरातील काही मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. जिजामाता चौक, सोन्या मारुती चौक, गणेश रोड तसेच फडके हौद परिसरातून येणाऱ्या वाहनांना परिस्थितीनुसार पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
शिवरकर रोडवरही वाहतूक बंद
५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून शिवरकर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. या कालावधीत संविधान चौक, साळुंखे विहार रोड आणि फ्लॉवर व्हॅली लेन यांसारख्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय लष्कर, वारजे, समर्थ, बंडगार्डन आणि काळेपडळ या वाहतूक विभागांच्या हद्दीतही गर्दीची परिस्थिती पाहून वाहतुकीचे नियमन केले जाणार आहे. काही ठिकाणी वाहतूक एकेरी करण्यात येईल, तर गरज भासल्यास काही मार्ग पूर्णपणे बंद करून वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन
दहीहंडी उत्सवादरम्यान रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, तसेच वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे यांनी केले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशीच दहीहंडी का?
दरम्यान, जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानंतरच्या दिवशी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. ‘गोविंदा आला रे’च्या जयघोषात गोविंदा पथके मानवी मनोरे रचतात आणि उंचावर बांधलेली दहीहंडी फोडतात.
या परंपरेमागे बालकृष्णाच्या खोडकर लीलांची कथा सांगितली जाते. श्रीकृष्णाला दही, लोणी आणि दूध विशेष आवडत असे. गोकुळातील घरांमध्ये ठेवलेले लोणी मिळवण्यासाठी कृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत मानवी मनोरे रचून उंचावर ठेवलेल्या मडक्यांपर्यंत पोहोचत असे, अशी धार्मिक आख्यायिका आहे. याच लीलांचे प्रतीक म्हणून दहीहंडी उत्सवाची परंपरा रूढ झाल्याचे मानले जाते.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











