दिल्लीतील इमारत दुर्घटनेत 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू ! 5 अधिकारी निलंबित, आता मालक हरिराम बन्सलला अटक
दिल्लीतील सत्य निकेतन परिसरातील हॉस्टेलची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी फरार असलेला इमारतीचा मालक हरिराम बन्सल याला पोलिसांनी राजस्थानातील भिवाडी येथून ताब्यात घेतले आहे.
दुर्घटनेनंतर तो फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांनी १० पथके तैनात केली होती. तसेच त्याच्याविरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती.
ही इमारत पेइंग गेस्ट (पीजी) म्हणून वापरली जात होती. तळघरात दुरुस्तीचे काम सुरू असताना इमारत कोसळल्याचा प्राथमिक आरोप आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी साऊथ कॅम्पस पोलीस ठाण्यात हरिराम बन्सलसह अन्य व्यक्तींविरोधात सदोष मनुष्यवध, इमारतीच्या देखभालीतील निष्काळजीपणा आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बन्सलची सध्या चौकशी सुरू आहे.
आतापर्यंत सात विद्यार्थ्यांचा मृत्यू –
या दुर्घटनेत १२ जणांना मलब्यातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. काही विद्यार्थी अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली पोलीस, एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकांकडून बचावकार्य सुरू आहे.
दुरुस्तीच्या कामादरम्यान इमारत कोसळली –
रविवारी (दि. 6) दुपारी सुमारे दीडच्या सुमारास सत्य निकेतन परिसरातील ही इमारत अचानक कोसळली. त्यामुळे अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती देत बचावकार्याला सुरुवात केली. मलब्याखालून मदतीसाठी आवाज येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर दिल्ली पोलीस, एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.
पाच महापालिका अधिकाऱ्यांचे निलंबन –
दरम्यान, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या निर्देशानुसार दिल्ली महापालिकेच्या दक्षिण विभागातील पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये उपायुक्त (डीसी), कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, सहायक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला.
दिल्लीचे मंत्री सतीश खुराना यांनी या कारवाईची माहिती देताना, पीजी सुरू असलेल्या तसेच अनधिकृतपणे अतिरिक्त मजले बांधलेल्या इमारतींची तपासणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात यावेत, असे सांगितले.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











