चंदू अण्णा नगर-खोटेनगर रस्ता दुरुस्त करा; प्रभाग ९ मधील नागरिकांची पालकमंत्र्यांकडे साकडे
हजारो नागरिकांचा दररोजचा प्रवास; पावसाळ्यात रस्त्याची दुरवस्था, तातडीने दुरुस्तीची मागणी
जळगाव : प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून प्रा. डॉ. संदिप पाटील यांनी चंदू अण्णा नगर ते खोटेनगर या दुरवस्था झालेल्या रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी पालकमंत्री महोदयांना निवेदन सादर केले. पालकमंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील हे पद्मालय येथील शासकीय विश्रामगृहावर उपस्थित असताना त्यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ९ चे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदू अण्णा नगर ते खोटेनगर या मार्गाची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिकांची ये-जा होत असून, खड्डे, चिखल आणि खराब रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे या मार्गावर तालुका पोलीस स्टेशन, तलाठी व महसूल कार्यालय, कचरा फॅक्टरी तसेच मुख्य रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा संपर्कमार्ग आहे. त्यामुळे नागरिकांसह शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांचीही या मार्गावर मोठी वर्दळ असते.

यावेळी प्रा. डॉ. संदिप पाटील यांनी नवलसिंग राजे पाटील यांच्याशी संवाद साधून प्रभागातील नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना होत असलेल्या अडचणींची माहिती दिली. रस्त्याच्या सद्यस्थितीचे फोटो व व्हिडिओही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
पालकमंत्री महोदयांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन महानगरपालिका आयुक्तांना निर्देश द्यावेत आणि चंदू अण्णा नगर ते खोटेनगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रहाची मागणी प्रा. डॉ. संदिप पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिक बिकट होत असून, प्रशासनाने विलंब न करता या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











