Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

ज्येष्ठा – कनिष्ठा महालक्ष्मी गौरी विशेष माहिती

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
September 17, 2026
in india - world
0
ज्येष्ठा – कनिष्ठा महालक्ष्मी गौरी विशेष माहिती
0
SHARES
136
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ज्येष्ठा – कनिष्ठा महालक्ष्मी गौरी विशेष माहिती
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✅ जेष्ठा गौरी मुहूर्त
✅ जेष्ठा गौरी कहाणी
✅ महालक्ष्मी लोककथा
✅ करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी
✅ आरती
✅ जेष्ठा गौरी
✅ गौरी पूजन पुराणातील गोष्ट
✅ श्री महालक्ष्मी व्रत
✅ जेष्ठा गौरी व महालक्ष्मी भाग
1,2,3
✅ गौराई भाग 1,2,3

*ज्येष्ठा गौरी* (महालक्ष्मी) पूजन, आगमन आणि विसर्जनाची सविस्तर माहिती
१. गौरी सोहळ्याचे तीन महत्त्वाचे दिवस आणि मुहूर्त
शास्त्रानुसार अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन, ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते.

* गौरी आगमन / आवाहन: गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६
* शुभ मुहूर्त: संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत गौरीचे आवाहन करणे अत्यंत शुभ आहे. (या वेळेपूर्वी गौरीला घरात प्रवेश देणे व स्थापन करणे उत्तम मानले जाते).
* गौरी पूजन (मुख्य पूजा): शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६
* मुहूर्त: या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र दिवसभर असल्यामुळे, दिवसभरात कधीही सवडीनुसार गौरीची पूजा व नैवेद्य दाखवता येतो.
* गौरी विसर्जन: शनिवार, १९ सप्टेंबर २०२६
* शुभ वेळ: सूर्योदयापासून ते संध्याकाळी ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत (विशेषतः दुपारी ३:१५ पर्यंत) मूळ नक्षत्रात विसर्जन करता येईल.
२. गौरी आगमन व आवाहन विधी (पहिला दिवस)
* आगमनाची पद्धत: आगमनाच्या दिवशी घराच्या मुख्य उंबऱ्यापासून ते बाप्पाच्या बाजूला जिथे गौरी स्थापन करायच्या आहेत, तिथपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवले जातात.
* पावलांचे पूजन: उंबऱ्यात गौरी आणणाऱ्या स्त्रियांचे पाय दूध व पाण्याने धुऊन त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढले जाते.
* प्रवेश करतानाचा संवाद: ताट किंवा घंटेचा आवाज करत, “गौरी आल्या कशाच्या पावली? – सोन्या-चांदीच्या पावली, सुख-समृद्धीच्या पावली, सौभाग्याच्या पावली” असे म्हणत आनندात गौरीला घरात घेतले जाते.
* स्थापना: एका पाटावर लाल वस्त्र अंतरून त्यावर गौरीचे मुखवटे (एक किंवा दोन, ट्रेडिशनल पद्धतीनुसार) मांडले जातात. काही ठिकाणीTerda (तेरड्याची रोपे किंवा खडे) स्वरूपातही गौरी पूजली जाते.
* पहिल्या दिवसाचा नैवेद्य: पहिल्या दिवशी शक्यतो संध्याकाळी गौरीला भाजी व भाकरीचा (विशेषतः शेपूची भाजी आणि ज्वारी/बाजरीची भाकरी) नैवेद्य दाखवला जातो.
३. गौरी पूजन आणि नैवेद्य (दुसरा दिवस – ज्येष्ठा गौरी पूजन)
* पूजाविधी: दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीची षोडशोपचाराने पूजा केली जाते. गौरीला नवीन साडी-चोळी, दागिने आणि पारंपरिक दागिन्यांनी सजवले जाते (सजावट केली जाते).
* हळदी-कुंकू: या दिवशी शेजारील महिलांना, सुवासिनींना हळदी-कुंकू व वाण देण्यासाठी बोलावले जाते. काही ठिकाणी कुमारिका पूजनही केले जाते.
* नैवेद्य: या दिवशी गौरीला पंचपक्वान्नांचा महाप्रसाद केला जातो. यात प्रामुख्याने पुरणपोळी, कटाची आमटी, विविध प्रकारच्या भाज्या, कोशिंबीर, भजी, पापड-लोणचे आणि सोळा वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असतो.
* रात्रीचा उत्सव: या रात्री स्त्रिया पारंपरिक गाणी गाऊन, फुगड्या खेळून जागरण करतात.
४. गौरी विसर्जन विधी (तिसरा दिवस)
* सुत किंवा पोवते बांधणे: विसर्जनाच्या दिवशी सकाळी गौरीच्या पूजेत सुताची किंवा पोवत्याची गाठ बांधली जाते. या सुतामध्ये हळद-कुंकू, सुकामेवा, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल व रेशमी धागा एकत्र करून गाठी मारल्या जातात.
* नैवेद्य: या दिवशी गोड शेवयाची खीर आणि उडीद डाळीचे पापड असा नैवेद्य दाखवला जातो.
* निरोप व विसर्जन: उत्तरपूजा करून, आरत्या झाल्यानंतर “पुढच्या वर्षी लवकर या” अशी भावूक भावनिक विनंती करून गौरींचे विसर्जन केले जाते.
* विसर्जन केल्यानंतर तिथली थोडी वाळू किंवा माती प्रसाद म्हणून घरी आणली जाते आणि ती घरामध्ये सर्व-त्र किंवा झाडांवर टाकली जाते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते अशी धार्मिक मान्यता आहे.

🌹 श्रीमहालक्ष्मी व्रत 🌹

व्रत-नियम

हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे. व्रत करणाराने लवकर उठून स्नान करावे व शरीराने, मनाने निर्मळ होऊन पूजा-विधी करावा.
कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करता येईल, दर गुरुवारी श्रीमहालक्ष्मीव्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. एक महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते. देवीच्या फोटोसमोर बसून श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा व माहात्म्य वाचावे.
उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी-वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्रीमहालक्ष्मीस्वरूप समजून त्यांना हळदी-कुंकू देऊन प्रसाद म्हणून एकेक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री-पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात.
व्रताच्या दिवशी उपवास करावा. फक्त केळी, दूध, फळे खावीत. रात्री भोजन करावे.
पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती-पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात.
हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली, तर पूजा-आरती दुसर्या कुणाकडूनही करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतःच करावा. अशा वेळी तो गुरुवार आठ गुरुवारांमध्ये धरू नये.
एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा-आरती करायला हरकत नाही. रात्री हवे तर भोजन करू नये. काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल, त्यांनी ते रात्री केले तरी चालेल. फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा. फलाहार घ्यावा.
व्रत-पूजा व श्रीमहालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी-पाजारी यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांत चित्ताने माहात्म्य वाचावे. शांतता व एकाग्रता असल्यास पोथीवाचन चालू असताना श्रीमहालक्ष्मीचे अप्रत्यक्षरीत्या अस्तित्व जाणवेल. एकाग्रता व मनाची शुद्धता असणार्यांनी बर्याचदा सुवासाची चांगलीच जाणीव जाणवेल.
व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे.
व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबियांसमवेत भोजन करून उपवास सोडावा.

🌹 गौरीपूजेची पुराणातील गोष्ट 🌹

गणपतीची आई जी गौरीमाता , पार्वती , तिची पूजाहि झालीच पाहिजे . म्हणून गणपती आल्यापासून तिसर्या दिवशीं गौरीहि येते . गणपति हा शंकर -पार्वतीचा मुलगा . त्यामुळें तो घरीं आल्यानंतर त्याची आई गौरी हे देखील माहेरीं येणें स्वाभाविक आहे . या गौरीमातेच्या पूजेमागचा हेतु ही कीं , भरपूर धनधान्य आणि स्वास्थ याचें वरदान तिच्याकडून मिळावें .
त्याचप्रमाणें भरपूर आयुष्यहि तिच्याजवळ मागावें याहि हेतूनें भाविक मग तिची पुजा करतात .
या गौरीपूजेच्या बाबतींत पुराणामध्यें अशी एक गोष्ट सांपडते कीं , पूर्वींच्या काळीं दैत्यांनीं देवांना अतिशय त्रास दिला . त्यामुळें देवांच्या स्त्रियांना आपलें सौभाग्य कसें सुरक्षित राहील याबद्दल धास्ती वाटली . काळजी वाटली . त्या कारणानें सगळ्याजणींनीं एकत्र जमून या संकटामधून आपली मुक्तता करण्यासाठीं महालक्ष्मीस विनविण्याचें ठरविलें . आणि तसें झाल्यावर व महालक्ष्मीची त्यांनी पूजा बांधल्यावर ती त्यांना प्रसन्न झाली . तिनें दैत्यांचा संहार केला . आपल्या भक्तमंडळींना अडचणींतून मुक्त केलें . सुखाची त्यांच्यावर खैरात केली . त्यामुळें या उपकाराची आठवण म्हणून दरवर्षीं गौरीपूजेचा हा उत्सव बायका साजरा करतात . त्या मागची प्रमुख भावना ही कीं , आपणांस अखंड सौभाग्य लाभावें .
परंतु खेडोपाडींच्या सामान्य बायका या सणामागचें कारण विचारतांना ही गोष्ट न सांगतां एवढेंच म्हणतात कीं , “या कारणानें पार्वतीला माहेरीं यायला मिळतें . पार्वती म्हणजे आपलीच पोर . माहेरवाशीण वर्षांतून एकदां येणारी . तिनें कौतुक करायचें . तिला माहेर करायचें . तिला सुखांत ठेवायची .” आणि त्या दृष्टीनेंच सर्वत्र हा सण पार पडतांना दिसतो .

HTML img Tag Simply Easy Learning

सूर्या समूक माजं घर ग बाई मी लोटीतें घरदार
पायीं साकळ्या तंगभार ग बोटीं जोडवीं झिनकार
कमरीं दाबाला चारी कुलपं ग गळीं पुतबीळ्याची माळ
वर चिताक नक्षीदार ग डाळीं डोरलं पांच फेर
नथ नाकांत डौलदार ग काप कानांत गजबार
डोकीं केवडा मारी ल्ह्यार ग चोळी अंगांत हिरवीगार
नेशी पिवळा पितांबर ग हातीं सोन्याच बिलवर
मी ग निगालें न्हवयीना ग लेक बाबांची तालीवार

अशा प्रकारचे सगळे दागिने -जुन्या काळचे असे – एकत्र गुंफून तयार झालेलें गीत गात घरोघरींच्या पोरीबाळी न्हवणाला जातात . गौर आणायला म्हणून जातात . हातांत पानाफुलांनी सजवलेला तांब्या घेऊन नदीवर नाहींतर आडावर अगर विहिरीवर जावयाचें . त्यावेळीं जातांना केलेला साजशृंगार असा बोलून दाखवायचा . घोळ्यामेळ्यानें जमून ठेक्यांत पावलें टाकीत जातांना एकमेकींचा दिमाख एकमुखानें असा म्हणावयाचा . मग खरोखर घरांत तसें वैभव नांदत नसलें तरी फिकीर नाहीं . मनाचें ऐश्वर्य कायम . कल्पनेची भरारी दांडगी .
पाणवठ्यावर जाऊन ही गौर आणावयाची म्हणजे तांब्यांतील पाण्यांत पांच खडे घेऊन यावयाचे . बरोबर नेलेलें तेरड्याचें पान व फूल त्यास वहावयाचें कोंकणामध्यें गंगेवर तेरडा नेऊन ठेवतात . त्यावेळीं नारळ व कोरें सूप नेऊन तो तेरडा व सात खडे माघारी आणतात . तेरड्यावर मुखवटा बसवतात . त्यावरच सर्व साजशृंगार चढवतात . देशावर फक्त पांच खडे आणतात . ते घेऊन घरी आलेल्या मुलीच्या पायावर गरम पाणी ओतून , तिला हळदकुंकू लावून आणि ओवाळून घरांत घेतात . आणि मग ते पांच खडे एकाद्या गाडग्यांत नाहींतर पितळेच्या भांड्यांत ठेवून गौरी बसवतात . त्या संख्येनें दोन असतात . आणि त्यांची मांडणीहि मोठी अभिनव असते . म्हणजे गाडग्यावर गाडगें उतरंडीसारखें रचावयाचें आणि वरच्या तोंडाला हळदीकुंकवानें माणसाचा चेहरा काढलेल्या लहान टिंगणीचा मुखवटा ठेवायचा . त्यावर खण घालावयाचा . कुणीं कुणीं भांड्यावर भांडें अगर डब्यावर डबे ठेवून त्यावर मातीचा अगर वाटीवर काजळीनें काढलेला मुखवटा ठेवून उंची लुगडीं नेसवतात . क्वचित् प्रसंगीं पितळेचे मुखवटेहि दिसून येतात . मात्र या सगळ्या गोष्टींसाठीं वापरण्यांत येणार्या गाडग्यांत अगर भांड्यांत सवाष्णीची ओटी असते . तांदूळ अगर गहूं , पानसुपारी , लेकुरवाळें हळकुंड , खोबर्याची वाटी वगैरे वगैरे सर्व या गौरीला लागते . त्याचप्रमाणे मुखवटा असेल त्या बेतानें नाकांत व कानांत डाग घालतात . आणि एरव्हीं सर्रास सर्व गौरींना गळ्यांतील ठळक दागिने घालण्याची प्रथा आहे . उंची लुगडें आणि दागदागिने यामुळें ही गौर नक्षत्रासरखी दिसते . तिच्या पुढें घरांतील सुंदर वस्तूंची मांडणी करून दोन्ही बांजूना दोन समया तेवत ठेवायच्या . आणि खणनारळ समोर मांडले म्हणून त्यांना हळदकुंकूं वहायचें . या वेळीं ही सगळी शोभा बघून डोळ्याचें पारणें फिटल्यासारखें वाटतें .

🌹 ज्येष्ठा गौरी 🌹

पुराणात अशी कथा आहे की असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्रीमहालक्ष्मी गौरीला शरण गेल्या. त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. श्रीमहालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले; म्हणून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.
हे तीन दिवसाचे व्रत आहे , प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. पूर्वी महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवत असत . काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. पूजन झाल्यानंतर दुसर्या दिवशी तिची पूजा करून नैवेद्य दाखवतात.
व तिसर्या दिवशी गौरीचे नदीत विसर्जन करतात आणि परत येतांना नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.
सध्या भारतभर कोरोना महामारीमुळे सर्वत्रच लोकांच्या दळणवळणावर अनेक बंधने आली आहेत. काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प असला, तरी तेथे लोकांच्या घराबाहेर पडण्यावर अनेक बंधने आहेतच. या संकटामुळे ज्यांना प्रतिवर्षाप्रमाणे खड्यांच्या स्वरूपात अथवा मुखवट्यांच्या स्वरूपात त्यांची पूजा करणे शक्य नाही, ते आपल्या घरातील एखाद्या देवीच्या मूर्तीची अथवा चित्राची पूजा करू शकतात. किंवा गौरी स्वरूप दोन सुपाऱ्या तांदुळाच्या राशीवर ठेऊन पूजन करता येईल .

महत्वाची सूचना

भाद्रपदातील महालक्ष्मीच्या (गौरीच्या) वेळी अशौच असेल, तर गौरी आवाहन आणि पूजन करू नये. अशौचामुळे तेव्हा गौरीपूजन न करता आल्याने काही जण पुढे आश्विन मासात (महिन्यात) गौरीपूजन करतात, पण तसे करू नये. अशा प्रसंगी त्याचा लोप करणे (म्हणजे ते न करणे) युक्त होय.

दोरकग्रहण

‘ज्येष्ठा गौरीच्या पूजेच्या वेळी दोरक ठेवून विसर्जनानंतर तो दोरक घेतला जातो. दोरक घेण्याच्या विधीस ‘दोरकग्रहण’ असे म्हणतात. दोरक म्हणजे हाताने काढलेल्या सुताचे सोळा पदरी हळदीत भिजवून रंगवलेले सूत्र होय. सोळा ही संख्या लक्ष्मीशी निगडित असल्यामुळे दोरकातही सोळा पदर असतात. हा दोरक अत्यंत शुभकारक आणि लक्ष्मीप्राप्ती करून देणारा असतो. घरातील सर्व स्त्रिया दोरक धारण करतात. काही प्रांतांत पुरुषही आपल्या हातात हा दोरक धारण करतात. काही जण हा दोरक आपल्या धनकोशात, धान्यकोठारात, वास्तूच्या पायात आणि देवघरात ठेवतात.

विभक्त कुटुंबातील महालक्ष्मी

ज्येष्ठा गौरीपूजन हा एक कुळाचार आहे. त्यामुळे कोश (मिळकतीचे साधन) आणि चुली (स्वयंपाकघर) निराळे होताच प्रत्येक स्वतंत्र कुटुंबात हे व्रत करणे अत्यावश्यक असते.’ परंतु बरेच ठिकाणी एकाच भावाकडे महालक्ष्मी स्थापना करून सर्वजण एकत्र येऊन पूजन करतात . सर्व भाऊ एकत्र पूजन करत असतील तर मात्र एकच ठिकाणी महालक्ष्मी बसवाव्यात .

 🌹 आरती ( गौरी ) महालक्ष्मीची 🌹

भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा
अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा
गणेशा सहित गौरी धनिष्ठा
बैसली येउनि सकळिया निष्ठा II१||
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।
ज्येष्ठा नक्षत्र पुजेचा महिमा
षडरस पक्वान्ने होती सुखधामा
सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा
तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।।
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।
उत्थापन मूळावर होता अगजाई
वर देती झाली देवी विप्राचे गृही
रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी
वर देती झाली देवी सकळांचे गृही ।।३।।
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।

 🌹 करवीर महालक्ष्मी 🌹

गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णू चे भेटीस आले, विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला, बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णू जवळ जावून बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याचे तोंडाची होशील असा शाप दिला.हर ऐकून क्रोधीत झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तू हत्तीण होशील असा शाप दिला. हत्तीण रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्ती साठी तपचर्या सुरु केली. ब्रह्मदेवानी तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले. या स्थाना विषयी कोल्हासूर वधाची कथा प्रचलित आहे.
पुरातनकाळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते. देवही त्याचे पुढे हतबल झाले होते देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. शेवटी महालक्ष्मीने बह्मास्त्राने त्याचं मस्तक उडवलं. अश्विन पंचमीस त्याचा वध झाला. मृत्यू समयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं. त्याचे नावा वरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले.कोल्हासूराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता,ऋषीमुनी सर्वजण आले पण त्र्यंबुली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले. हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबुलीस पूवेर्कडच्या टेकडीवर भेटायला गेली. त्र्यंबुली रुसली होती. तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली. तेव्हा तू करवीरक्षेत्री जा. माझा राग गेला, पण मी येणार नाही. असं तिने सांगितलं. व तिने तेथेच वास केला
तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा ही सांगितली जाते.
भृगु ऋषी एकदा भगवान विष्णूंकडे आले. त्यावेळी विष्णू शेषशाई असून निद्रा घेत होते, तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपीत होती. भगवान विष्णूंनी आपले स्वागत केले नाही ह्याचा राग येऊन महर्षी भृगु ह्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर जोराने लत्ताप्रहार केला. भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली, आणि भृगुंचे पाय चेपण्यास सुरुवात केली. ह्याद्वारे त्यांना भगवान भृगुंच्या प्रती आदरभावना व्यक्त करावयाची होती. भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मींना क्रोध अनावर झाला. ह्या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली. देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नसून, आज ही कोल्हापूर मधील भव्य देवस्थानामध्ये महालक्ष्मींचा वास आहे अशी आख्यायिका आहे.
ही आख्यायिका जरी भाविकांच्या तोंडून ऐकायला मिळत असली, तरी ह्याचा पुराणांमध्ये किंवा इतर कोणत्याही धार्मिक ग्रंथामध्ये स्पष्ट उल्लेख सापडत नसल्याने ही आख्यायिका कितपत खरी आहे, हे नक्की सांगता येणार नाही. पण मंदिरामध्ये पाळल्या जाणऱ्या परंपरा विचारात घेतल्या तर महालक्ष्मी देवस्थान हे आदी शक्तीचे देवस्थान असल्याचे लक्षात येते.

 🌹 ज्येष्ठागौरीची कहाणी 🌹

आटपाट नगर होते, तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनीं गौरी आणल्या. रस्तोरस्तीं बायका दृष्टीला पडूं लागल्या. घंटा वाजूं लागल्या. हें त्या ब्राह्मणाच्या मुलांनीं पाहिलं. मुलं घरी आलीं. आईला सांगितलं, “आई, आई, आपल्या घरी गौरी आण.
आई म्हणाली, “बाळांनो गौर आणून काय करूं? तिची पुजापत्री केली पाहिजे, घावन-घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरांत तर कांहीं नाहीं. तुम्हीं बाबांजवळ जा, बाजारांतलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन.” मुलें तिथून उठलीं, बापाकडे आलीं “बाबा, बाबा, बाजारांत जा. घावन-घाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणील.” बाबानं घरांत चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनांत फार दुःखी झाला
सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांच हट्ट पुरवत नाहीं. गरिबीपुढं उपाय नाहीं. मागायला जावं तर मिळत नाहीं. त्यापेक्षा मरण बरं. म्हणून उठला, देवाचा धंवा केला. तळ्याच्या पाळीं गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला, अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यांत संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीणं भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या.
ब्राह्मणानं म्हातारीला घरीं आणलं. बायकोनं दिवा लावला, चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरांत गेली. आंबिलीकरितां कण्या पाहूं लागली, तो मडकं आपलं कण्यांनीं भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनीं पोटभर खाल्ली. सगळींजणं आनंदानं निजलीं.
सकाळ झाली, तशी म्हातारीनं ब्राह्मणास हांक मारली, “मुला मुला, मला न्हाऊ घालायला सांग.” म्हणून म्हणाली, “घावनघाटलं देवाला कर नाहीं कांहीं म्हणूं नको. रड काही गाऊ नको.” ब्राम्हण तसाच उठला,घरात गेला. बायकोला हांक मारली, “अग अग ऐकलसं का? आजीबाईला न्हाऊं घाल” असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला.
बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलांबाळांसुद्धां पोटभर जेवलीं. म्हातारीनं ब्राह्मणाला हांक मारली. “उद्यां जेवायला खीर कर” म्हणून सांगितलं, ब्राह्मण म्हणाला, “आजी, आजी, दूध कोठून आणू?” तशी म्हातारी म्हणालीं, “तूं कांहीं काळजी करूं नको. आतां उठ, आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर. तितक्यांना दावीं बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई-म्हशींची नांवं घेऊन हांकां मार, म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ.” ब्राह्मणानं तसं केलं.
गाईम्हशींना हांका मारल्या त्या वांसरांसुद्धां धांवत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनीं भरून गेला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं, दुसर्या दिवशीं खीर केली. संध्याकाळ झाली, तशी म्हातारी म्हणाली,“ मुला मुला, मला आतां पोंचती कर.” ब्राह्मण म्हणूं लागला, “आजी आजी, तुमच्या कृपेनं मला सगळ प्राप्त झालं, आतां तुम्हांला पोंचत्या कशा करूं? तुम्ही गेलां म्हणजे हें सर्व नाहीसं होईल.”
म्हातारी म्हणाली. “तूं कांहीं घाबरूं नको, माझ्या आशीर्वादानं तुला कांहीं कमी पडणार नाहीं. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच. आज मला पोंचती कर.” ब्राह्मण म्हणाला, “हें दिलेलं असंच वाढावं असा कांहीं उपाय सांगा.” गौरीनं सांगितलें, “तुला येतांना वाळू देईन. ती सार्या घरभर टाक. हांड्यावर टाक, मडक्यावर टांक, पेटींत टाक, फडताळांत टाक, गोठ्यांत टाक. असं केलं म्हणजे कधीं कमी होणार नाहीं” ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली.
गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं, भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळीं जावं, दोन खडे घरीं आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशीं घावनगोडं, तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवूं घालावं. संध्याकाळीं हळदकुंकू वाहून बोळवण करावी. म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. संतत संपत मिळेल.
ही सांठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं, देवाच्या दारीं, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारीं, सुफळ संपूर्ण.

 🌹 महालक्ष्मीची लोककथा 🌹

पुराणात उल्लेख आढळत नसला तरी महालक्ष्मीची लोककथा प्रसिद्ध आहे. एका राजाला दोन राण्या असतात. एक आवडती आणि दुसरी नावडती. अर्थात, आवडती राणी राजासोबत राजवाडयात राहत असते, तर नावडती गावाबाहेर राहत असते. एके दिवशी त्या राजाच्या दोन मावश्या त्याला भेटण्यासाठी येतात. अर्थात, पहिल्यांदा त्या राजवाडयात जातात. मात्र आवडती राणी त्यांना आपल्या घरात घेत नाही. त्या दोघी पुन्हा नावडत्या राणीकडे जातात. तिची गरिबी असते तरी ती त्या दोघींचंही ती छान प्रकारे आदरातिथ्य करते. त्या दोघीही तिच्यावर खूश होतात आणि तिला महालक्ष्मीचं व्रत करायला सांगतात. नावडती राणी महालक्ष्मीचं व्रत करते आणि त्यातून तिच्या घरी ऐश्वर्य येतं. तर आवडतीच्या घरी दारिद्रय येतं. पुढे राजाही त्या नावडत्या राणीकडे येतो. समृद्धी आणि सुख देणारं असं हे व्रत म्हणून महालक्ष्मीचं पूजन केलं जातं.

 🌹 गौराई 🌹

भाग १

माहेरवाशीण म्हणून बऱ्याच ठिकाणी पूजली जाणारी गौर, काही घरांत गणपतीची आई म्हणून येते ती आपल्या बाळाचं होणारं कौतुक डोळे भरून पाहण्यासाठी…! तर कधी ही जगन्माता ‘ज्येष्ठा-कनिष्ठा’ अशा बहिणींच्या रूपात आगमन करते.
महाराष्ट्रात आणि कर्नाटकात भाद्रपद महिन्यात गणेशाच्या आगमनानंतर गौरीपूजनाची परंपरा आहे. ज्ञातीनुसार,
प्रदेशानुसार पूजापध्दतीत फरक आहे मात्र कायम देवलोकात वास करणाऱ्या या लेकीबद्दलचा जिव्हाळा,
आपुलकी सगळीकडे सारखी!
‘लेक’ बनून आलेल्या या माऊलीची ‘यथाशक्ती,
यथामिलितं सेवा करणं,’ हाच भाव प्रत्येक गृहलक्ष्मीच्या मनी वसत असतो.
महाराष्ट्रातही गौरीपूजनाची विविध रूपं पाहायला मिळतात. प्रदेशानुसार पूजेची पध्दत बदलते, गौरीचं रूप बदलतं..

कोकणस्थ व कऱ्हाडे

कोकणस्थ आणि कऱ्हाडे ब्राह्मणांकडे खडयांच्या गौरी असतात. सकाळी शुचिर्भूत होऊन, पंचोपचारी पूजेचं सामान बरोबर घेऊन नदीकाठी जायचं. तिथले गोलाकार, गुळगुळीत असे पाच किंवा सात खडे कोऱ्या वस्त्रावर ताम्हनांत किंवा चांदीच्या छोटया वाटीत ठेवायचे. त्यासोबत हळकुंड,
सुपारी ठेवायची , खडयांना कापसाचं वस्त्र घालायचं, दूध-साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि ही गौर घरी आणायची. गौर माहेरवाशीण म्हणून येत असल्याने तिला घरी आणायचा मान माहेरवाशिणीचा किंवा कुमारिकेचा.(हल्ली घरात माहेरवाशीण असतेच असं नाही आणि असली तरी सहजी येण्याच्या अंतरावर असते असंही नाही. मग अशा वेळी घरातली सासुरवाशीणच गौर घेऊन येते.) कोकणस्थांमध्ये गौर घेऊन येणारीनं तोंडात पाण्याची चूळ ठेवायची असते(याच्यामागचं कारणही मोठं मार्मिक आहे. पूर्वीच्या काळी माहेरवाशिणीचं माहेरी येणं सणावारालाच घडायचं. कधी एकदा आई भेटते आणि तिच्याजवळ आपलं मन मोकळं करतोय, असं तिला झालेलं असे. पण गौरी आणायच्या वेळी तिनं सासरची गाऱ्हाणी गाऊ नयेत, मन:स्वास्थ्य घालविणारे विचारही तिच्या मनात येऊ नयेत, ती साक्षात गौरीचं रूप म्हणून माहेरी आली आहे, याचं भान तिला राहावं यासाठी तिच्या तोंडात पाणी ठेवलं जाई. आजही ती परंपरा चालू आहे) .पाणवठयावरून वाजत-गाजत मिरवत आणलेल्या गौरीला घराच्या उंबऱ्याबाहेर पायावर दूध-पाणी घालून ओवाळलं जातं . घरात आतल्या दिशेने जाणारी रांगोळीची पावलं रेखलेली असतात, त्या पावलांवरून गौर आत येते. जागेवर स्थानापन्न होण्याआधी तिला प्रत्येक खोलीत नेऊन घरची गृहलक्ष्मी तिला घराच्या समृध्दीचं दर्शन घडवते… स्वयंपाकघर, पैशांची तिजोरी, दागदागिने दाखवते.’इथे काय आहे?’ असा प्रश्न तिला विचारते. यावर तिनं (मनातल्या मनात)’उदंड आहे’,
असं त्रिवार उच्चारायचं असतं . त्यानंतर गणपतीजवळ ठेवलेल्या आसनावर गौरींची स्थापना होते. मगच माहेरवाशीण तोंडातलं पाणी टाकून घरच्यांशी बोलू शकते.
आगमनाच्या दिवशी गौरीला खिरीचा नैवेद्य असतो.तर दुसऱ्या दिवशी घावन-घाटल्याचा नैवेद्य असतो.कऱ्हाडे ब्राह्मणांकडे दुसऱ्या दिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक असतो. गौरी घरी परतण्याच्या म्हणजे तिसऱ्या दिवशी ओल्या नारळाच्या (मुरडीच्या) करंज्या केल्या जातात. तीनही दिवस गौरीची खण-नारळ अन् तांदळाने ओटी भरण्यात येते. निरोपाच्या वेळी तिच्यासोबत दही-पोहे दिले जातात.(लांबच्या प्रवासाला निघालेली माहेरवाशीण असते ना ती…
‘असं रिकाम्या हाती कसं पाठवायचं तिला?’ अशी भावना त्यामागे असते.) अक्षता टाकून तिला स्थानावरून हलविल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण घरातून तिला फिरविण्यात येतं… तिची कृपादृष्टी सगळीकडे फिरावी हा हेतू त्यामागे असतो.

: 🌹 गौराई 🌹

भाग २

देशस्थांच्या घरी उभ्याच्या गौरी असतात, विदर्भात गौरींना ‘महालक्ष्मी’ म्हटलं जातं. यांचे मुखवटे पितळयाचे,
प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे किंवा चांदीचेही असतात.(या मुखवटयांची, महालक्ष्मी उभी करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या साहित्याची वर्षानुवर्षंजपणूक केली जाते.
त्यासाठी लोखंडी पेटारे बनविलेले असतात.) घरातल्या दोन माहेरवाशिणी, त्या नसल्यास सासू-सून सवाष्णी दोन सुपांमध्ये धान्याच्या राशींवर ‘महालक्ष्मी’चे मुखवटे ठेवून घरात आणतात. त्यापैकी ‘ज्येष्ठा’ जी असते तिला देवघरापासून अंगणातल्या तुळशीवृंदावनापर्यंत मिरवत नेलं जातं. तिथे तिची अन् कनिष्ठेची भेट होते.तुळशीला हळदीकुंकू वाहून आणि ज्येष्ठा-कनिष्ठेलाही हळदीकुंकू लावून दोघींना वाजतगाजत घराच्या उंबऱ्यापर्यंत आणतात. उंबऱ्यावर ठेवलेलं माप ओलांडून महालक्ष्मी गृहप्रवेश करते. घरभर काढलेल्या लक्ष्मीच्या पावलांवरून, मुखवटे संपूर्ण घरात फिरविले जातात.
लक्ष्मी कोणत्या पावलांनी आली ? यावर, ”सोन्याच्या,
चांदीच्या, रुप्याच्या पावलांनी… धनधान्य,
समृध्दीच्या सुखाच्या पावलांनी” असं संपन्नतेचं दर्शन घडविणारं उत्तर दिलं जातं. सगळं घर फिरून आल्यावर महालक्ष्मींची स्थापना करण्यात येते. गणेशमूर्ती शेजारी ठेवताना,
ज्या सवाष्णींनी त्यांना मिरवत आणलेलं असतं त्या एकमेकींना हळदीकुंकू लावतात, हातावर साखर ठेवतात. मग लक्ष्मीला तयार करण्यासाठी, खास बनविलेल्या लोखंडी पेटाऱ्यात ज्वारी, गहू असं धान्य भरलं जातं. पैसे ठेवण्यात येतात आणि मुलाबाळांसहित आलेल्या या माहेरवाशिणींना नटविण्याचं काम मोठया उत्साहात करण्यात येतं. खास त्यांच्यासाठी किमती साडयांची खरेदी करण्यात येते, एखादी स्त्री जशी नटेल तसा या देवींचा साजशृंगार केला जातो. आणि सरतेशेवटी त्यावर मुखवटे बसविण्यात येतात. घरागणिक मुखवटयांचं रूप बदललं तरी पंचोपचारे पूजा केलेल्या देवीचं तेज मात्र सगळीकडे तेच असतं. आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीला भाजी-भाकरीचा साधासुधा नैवेद्य असतो… दुसऱ्या दिवशी असते लक्ष्मीची महापूजा.
सोळा प्रकारच्या पत्री आणि फुले वाहून षोडशोपचारे पूजा करून तिची प्रतिष्ठापना केली जाते. यावेळी ज्येष्ठा आणि कनिष्ठेला हळद आणि अत्तरामध्ये भिजवून तयार केलेल्या तातूने सोळा वेळा सुतवतात तर त्यांच्या बाळांना आठ वेळा सुतवतात;
मोदक, करंज्या, पात्या यांचा फुलोरा महालक्ष्मीच्या डोक्यावर बांधला जातो, पुरणाची आरती केली जाते. वडा आणि पुरणपोळीबरोबरच पंचपक्वानांचा नैवेद्यही दाखवला जातो. विदर्भात या नैवेद्यात समावेश असतो तो ज्वारीपासून तयार करण्यात आलेल्या आंबिलीचा. सोळा भाज्या आणि विविध प्रकारच्या चटण्या, कोशिंबिरी असा माहेरवाशिणीचा थाट असतो. तिसरा दिवस हा महालक्ष्मीच्या परतण्याचा दिवस. या दिवशी, मूळ नक्षत्राच्या मुहूर्तावर त्यांची पुन्हा पूजा होते. दहीभात, मुरडीचे कानवले असा नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी अक्षता टाकून विसर्जन होतं, यावेळी *’मम गृहे स्थिरा भव’* असं मागणं देवीकडे मागितलं जातं. विदर्भाप्रमाणेच मराठवाडयातही उभ्या महालक्ष्मींची पूजा होते.
कोल्हापूर परिसरातल्या देशस्थांकडे मात्र तांब्यावरच्या गौरी असतात. पूर्वी मातीच्या सुगडाचा वापर होत असे. आता बहुतेक घरांमधून तांब्याचे तांब्ये वापरले जातात. या तांब्याला वरून गेरू लावतात. त्याच्या एका बाजूला गौरीचा चेहरा, तिचे दागदागिने, हात काढले जातात. तर मागच्या बाजूला गोपद्म, चंद्र, सूर्य, शंख, गदा, चुडा, फणी, करंडा इ. शुभचिन्हे काढण्यात येतात. श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी ‘ज्येष्ठा’ गौर येते. तिच्या पोटात तांदळाची ओटी घालून घरातल्या मुख्य देव्हाऱ्याजवळ तिची स्थापना होते. पंचामृती पूजा करून, खणाने ओटी भरली जाते. दर शुक्रवारी तिची आणि सवाष्णीची पुरणाची आरती करण्यात येते.
‘कनिष्ठे’चं आगमन गणपतीनंतर होतं. तिच्या पोटात गव्हाची ओटी असते, तर तिच्या पाठीवरच्या शुभचिन्हांमध्ये पालखीचा समावेश असतो. या कनिष्ठेबरोबरच ‘तेरडा’ गौर आणि खडयांची ‘गंगा’ गौरही येते. तेरडा आणि गंगागौर पाणवठयावरून वाजतगाजत आणली जाते. कनिष्ठेसह या गौरींचं घराच्या उंबरठयावर ओवाळून स्वागत केलं जातं. ही गंगागौर घेऊन येण्याचा मान माहेरवाशिणीचा. आगमन झाल्यानंतर गंगागौरीला आणि तेरडागौरीला संपूर्ण घरात फिरवलं जातं. त्यानंतर चांदीच्या तांब्यात तेरडा गौर आणि या काळात उपलब्ध असणारा फुलोरा;
तसंच गंगागौर ठेवण्यात येते आणि त्यानंतर एका चौरंगावर तिघींचीही विधिवत स्थापना होते. आगमनाच्या दिवशी दशमी, लोणी, शेपूची भाजी, कारल्याची चटणी असा बेत असतो; तर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीसह पंचपक्वान्नं, सोळा प्रकारच्या भाज्या आणि कढी-गोळे असा थाट असतो. अक्षता टाकून गणपतीबरोबर गंगागौरीचं आणि तेरडा गौरीचं विसर्जन करण्यात येतं. माहेरपणाला आलेल्या जगन्मातेची पाठवणी करताना तिच्यासोबत शिदोरीचा नैवेद्य अर्थात पाटवडी, कानवले, शेवयांची खीर आणि दोघींसाठी दोन मुदी दहीभात असा शिधा दिला जातो.

🌹 गौराई🌹

भाग ३

कोकणात वेंगुर्ले परिसरातल्या सारस्वतांकडे गणपतीची ‘आई’ म्हणून गौरी पूजली जात असल्याने, लेकाच्या आगमनाच्या एक दिवस आधीच येते आणि तीही महादेवासह . सुपात तांदूळ घेऊन त्यात पाच झाडांच्या फांद्या ठेवतात आणि त्याभोवती महादेव-पार्वतीचं चित्र असलेला कागद गुंडाळला जातो. गणपतीच्याही आधी त्याच्या आईवडिलांची पूजा होते. हळदीच्या पानातल्या पातोळया आणि पाच प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. आगमनानंतर आणि विसर्जनाआधीही काकडी,
नारळ, खण, तांदळाने गौरीची ओटी भरली जाते. या गौरीचं विसर्जनही तिसऱ्या दिवशी गणपतीच्या आधी झाडाखाली करण्यात येतं.
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच सी.के.पी. लोकांकडे तेरडा आणि खडयांच्या गौरी पूजल्या जातात. माहेरवाशीण ही गौर घरात आणते. तेरडा आणि सात खडे सुपात घेऊन आलेल्या माहेरवाशिणीच्या पायावर दूध-पाणी घालून, तिला ओवाळून घरात घेतलं जातं. कुंकवाचं पाणी केलेल्या परातीत पावलं बुडवून मगच तिनं घरात यायचं असतं. संपूर्ण घरात काढलेल्या रांगोळीच्या पावलांवरून लाल पावलांचे ठसे उमटवत माहेरवाशीण चालू लागते. गृहलक्ष्मी प्रत्येक खोलीत तिचं औक्षण करते, हातावर साखर ठेवून विचारते, ”गौरी,
गौरी कुठे आलीस?” मग गौर उत्तरते, ”दिवाणखान्यात…” ”दिवाणखान्यात तुला काय दिसलं?” यावर गौर घेतलेली माहेरवाशीण यजमानाच्या वैभवाचं, प्रगतीचं वर्णन करणारी उत्तरं देते.अशा रीतीने सगळं घर पाहून झालं की मग गणरायाच्या शेजारी गौर बसवली जाते. मग तिला मुखवटा लावून साडीचोळी नेसवून शृंगारण्यात येतं. सौभाग्यवाणासह खणानारळाने गौरीची ओटी भरण्यात येते. पहिल्या दिवशी खीर, भाजी, भाकरीचा नैवेद्य असतो, दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. तिसऱ्या दिवशी खीर आणि मुरड घातलेला कान्होला नैवेद्याला असतो. ‘पुन: पुन्हा मुरडून आमच्या घरात ये’, असं मागणं गौरीकडे मागितलं जातं.
कोकणातील शेतकरीवर्गात गौरीचा सण महत्त्वाचा असतो. तेरडयाची पाने एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात.
महाराष्ट्रातील बहुजन समाजात गौरीपूजनाची निराळी पध्दत आहे. मातीची नवीन पाच लहान मडकी आणून त्यात हळदीने रंगवलेला दोरा,
पाच खोबऱ्याच्या वाटया व खारका घालून त्याची उतरंड रचतात आणि त्याच्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवितात. गौरीच्या अशा दोन प्रतिमा तयार करून मग त्यांची पूजा करतात. तिसऱ्या दिवशी ती मडकी उतरवून त्यातील दोरे व खारीक-खोबरे काढून घेतात. मग त्या खारीक-खोबऱ्याचे तुकडे त्या दोऱ्यात बांधून घरातील सुवासिनी व मुले तो दोरा गळयात बांधतात. पुढे एखादा चांगला दिवस पाहून ते दोरे काढतात व ते दह्यादुधात भिजवून शेतात पुरतात.
कोकणस्थ मराठा समाजात हळदीचा खांब आणि गौरीचा मुखवटा घेऊन घरातल्या मुली अन् सवाष्णी विहिरीवर जातात. विहिरीच्या बाजूला सारवण करून रांगोळी काढतात, त्यावर मुखवटा अन् हळदीचा खांब ठेवून पूजा करतात. त्यानंतर वाजतगाजत गौर घरी आणतात. गणपतीजवळ तिची स्थापना करून तिला साडीचोळी नेसवली जाते, नटवलं जातं. तिच्या मागे हळदीचा खांब उभा केला जातो. या दिवसांत मिळणाऱ्या फुलोऱ्याचीही गौर म्हणून पूजा होते. पहिल्या दिवशी गौरीला तांदळाची भाकरी अन् भाजीचा नैवेद्य असतो आणि दुसऱ्या दिवशी गोडाचा. तिसऱ्या दिवशी हळदीच्या खांबाचं गणपतीसोबत विसर्जन केलं जातं.
गौरींच्या स्वागताची मोठया उत्साहात तयारी करणारी, तिच्या स्वागतात कोणतीही कसूर राहू नये यासाठी प्रत्येक घरातली गृहलक्ष्मी झटत असते. ”हे सगळं करताना अंगात दहा हत्तींचं बळ येतं. आपण करत नाही तर कुठली तरी शक्ती हे सारं करवून घेते!” सर्वत्र व्यक्त होणारी ही भावना खूप काही सांगून जाते. साक्षात गौरी आपल्या घरी
‘माहेरपणा’ला आली, या आनंदापुढे सारे कष्ट फिके ठरतात.आणि माहेरी आलेल्या लेकीचं कोडकौतुक करताना कुठली आई दमल्याचं कधी ऐकलंय का ?
:

🌹 ज्येष्ठा गौरीची कहाणी 🌹

आटपाट नगर होते, तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनीं गौरी आणल्या. रस्तोरस्तीं बायका दृष्टीला पडूं लागल्या. घंटा वाजूं लागल्या. हें त्या ब्राह्मणाच्या मुलांनीं पाहिलं. मुलं घरी आलीं. आईला सांगितलं, “आई, आई, आपल्या घरी गौरी आण.”

आई म्हणाली, “बाळांनो गौर आणून काय करूं? तिची पुजापत्री केली पाहिजे, घावन-घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरांत तर कांहीं नाहीं. तुम्हीं बाबांजवळ जा, बाजारांतलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन.” मुलें तिथून उठलीं, बापाकडे आलीं “बाबा, बाबा, बाजारांत जा. घावन-घाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणील.” बाबानं घरांत चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनांत फार दुःखी झाला.
सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांच हट्ट पुरवत नाहीं. गरिबीपुढं उपाय नाहीं. मागायला जावं तर मिळत नाहीं. त्यापेक्षा मरण बरं. म्हणून उठला, देवाचा धंवा केला. तळ्याच्या पाळीं गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला, अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यांत संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीणं भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या.
ब्राह्मणानं म्हातारीला घरीं आणलं. बायकोनं दिवा लावला, चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्‍यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरांत गेली. आंबिलीकरितां कण्या पाहूं लागली, तो मडकं आपलं कण्यांनीं भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्‍याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनीं पोटभर खाल्ली. सगळींजणं आनंदानं निजलीं.
सकाळ झाली, तशी म्हातारीनं ब्राह्मणास हांक मारली, “मुला मुला, मला न्हाऊ घालायला सांग.” म्हणून म्हणाली, “घावनघाटलं देवाला कर नाहीं कांहीं म्हणूं नको. रड काही गाऊ नको.” ब्राम्हण तसाच उठला,घरात गेला. बायकोला हांक मारली, “अग अग ऐकलसं का? आजीबाईला न्हाऊं घाल” असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला.
बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलांबाळांसुद्धां पोटभर जेवलीं. म्हातारीनं ब्राह्मणाला हांक मारली. “उद्यां जेवायला खीर कर” म्हणून सांगितलं, ब्राह्मण म्हणाला, “आजी, आजी, दूध कोठून आणू?” तशी म्हातारी म्हणालीं, “तूं कांहीं काळजी करूं नको. आतां उठ, आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर. तितक्यांना दावीं बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई-म्हशींची नांवं घेऊन हांकां मार, म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ.” ब्राह्मणानं तसं केलं.
गाईम्हशींना हांका मारल्या त्या वांसरांसुद्धां धांवत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनीं भरून गेला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं, दुसर्‍या दिवशीं खीर केली. संध्याकाळ झाली, तशी म्हातारी म्हणाली,“ मुला मुला, मला आतां पोंचती कर.” ब्राह्मण म्हणूं लागला, “आजी आजी, तुमच्या कृपेनं मला सगळ प्राप्त झालं, आतां तुम्हांला पोंचत्या कशा करूं? तुम्ही गेलां म्हणजे हें सर्व नाहीसं होईल.”
म्हातारी म्हणाली. “तूं कांहीं घाबरूं नको, माझ्या आशीर्वादानं तुला कांहीं कमी पडणार नाहीं. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच. आज मला पोंचती कर.” ब्राह्मण म्हणाला, “हें दिलेलं असंच वाढावं असा कांहीं उपाय सांगा.” गौरीनं सांगितलें, “तुला येतांना वाळू देईन. ती सार्‍या घरभर टाक. हांड्यावर टाक, मडक्यावर टांक, पेटींत टाक, फडताळांत टाक, गोठ्यांत टाक. असं केलं म्हणजे कधीं कमी होणार नाहीं” ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली.
गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं, भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळीं जावं, दोन खडे घरीं आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशीं घावनगोडं, तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवूं घालावं. संध्याकाळीं हळदकुंकू वाहून बोळवण करावी. म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. संतत संपत मिळेल.
ही सांठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं, देवाच्या दारीं, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारीं, सुफळ संपूर्ण.

🌹 ज्येष्ठा देवी व महालक्ष्मी 🌹

भाग १

ज्येष्ठा गौरी व महालक्ष्मी पूजन अशी दोन वेगवेगळी व्रते आहेत . त्या दोन्ही व्रतांचे एकत्रीकरण करून आजचे ज्येष्ठा गौरी व्रत प्रचलित झालेली आहे . भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर ज्येष्ठा देवी पूजन केले जाते . हे नक्षत्र प्रधान व्रत आहे . भविष्यपुराणात या व्रताच्या अनुषंगाने जेष्ठा देवीचे स्वरूप व कार्य याविषयी माहिती मिळते . त्यानुसार ज्येष्ठा देवीची उत्पत्ती सागर मंथनातून बाराव्या रत्नाच्या रूपाने झाली असल्याने ही लक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी ठरते . ती देव दानवांना वंदनीय असून सत्य न्याय व धर्म या तत्त्वांची ती अधिष्ठाती देवता आहे . या देवीच्या ध्यानमंत्रामध्ये ही तिचे वर्णन तीन नेत्र असलेली , रक्त वर्णी व शुभ्र दंत असलेली , शुभ्र वस्त्रे व अलंकार धारण करणारी , शुभ्र सिंहासनावर विराजमान होणारी , तसेच धर्मनिष्ठ सत्यभाषणी व विरक्त वृत्तीची असे आलेले आहे . ही चतुर्भुजा असून तिने एका हातात पोथी धारण केलेली आहे व दुसऱ्या हाताची वरमुद्रा केलेली आहे . अन्य दोन हातांमध्ये तिने विनाशकारी पाश धारण केलेला आहे .
*पुत्रदारविवृध्यर्थ लक्ष्म्याश्चापि विवृद्धये | अलक्ष्म्याश्च विनाशाय सर्वकालं भजेत ताम् ||*
यावरून जेष्ठा देवीचे प्रमुख कार्य अलक्ष्मीचे नि:सारण करणे , असे दिसून येते . ज्याप्रमाणे दैवत शास्त्रामध्ये दुष्कर्मास मानसिक व शारीरिक शासन देणारे शनिदेव व आर्थिक शासन देणारी जेष्ठादेवी या दोन न्यायप्रिय तितक्याच न्याय कठोर देवतांची कल्पना असते . म्हणूनच शनि देवांच्या साडेसातीस व जेष्ठा देवीच्या न्यायदानास प्रजाजन सर्वजण वचकून असतात . बहुतेक कुटुंबामध्ये उपजीविकेसाठी होणाऱ्या अर्थव्यवहारातून कळत नकळत अलक्ष्मीचा प्रवेश होत असतो . अलक्ष्मीचा प्रादुर्भाव जितका अधिक , तितक्या अधिक प्रमाणात विविध भौतिक , शारीरिक , सामाजिक , आर्थिक आपत्तींना ते कुटुंब ग्रस्त होते . याच कारणास्तव अलक्ष्मी नि:स्सारार्थ विहित असणाऱ्या विविध व्रतामध्ये जेष्ठादेवी व्रताचा अंतर्भाव होतो .
या व्रताच्या आरंभी म्हणजेच भाद्रपद शुद्ध अष्टमीला महालक्ष्मी पूजन या व्रताची सुरुवात होऊन ते वद्य अष्टमी पर्यंत सोळा दिवस केले जाते . महालक्ष्मी पूजन हे तिथी प्रधान होत असून ते कोल्हासूर मर्दिनी महालक्ष्मीस उद्देशून केले जाते . कोल्हासुरासी झालेला संग्राम सोळा दिवस चाललेला होता . म्हणून या व्रतामध्ये सोळा या संख्येला विशेष स्थान आहे . तसेच या व्रतामध्ये सोळा गाठींचा दोरक मनगटामध्ये बांधून , महालक्ष्मीच्या प्रतिमेची षोडश उपचारे सोळा दिवस पूजा करण्याचा विधी असतो .
सोळा ही संख्या विविध प्रकारे लक्ष्मी व मानवी जीवनाशी निगडित आहे . उदा: लक्ष्मीचा भाऊ चंद्राच्या सोळा कला . श्रीसुक्ताच्या सोळा ऋचा , लक्ष्मीची सोळा प्रतिके १) श्री , २) भूती , ३) श्रद्धा , ४) मेधा , ५) सन्नती , ६) विजिती , ७) स्थिती , ८) धृती, ९) सिद्धी , १०) कांती , ११) समृद्धी , १२) स्वाहा , १३) स्वधा , १४) संस्तुती , १५) नियती , १६) स्मृती . तसेच मानवांच्या सोळा सहज प्रवृत्ती , सोळा विद्या , सुवासिनींचे सोळा शृंगार , अशा विविध प्रकारे सोळा या संख्येला महत्त्व असल्यामुळे दोरकांच्या पदराची संख्या ही सोळाच असते .

🌹 ज्येष्ठा गौरी व महालक्ष्मी 🌹

भाग २

सध्या प्रचलित असणारे तीन दिवसांचे जेष्ठा गौरी हे व्रत म्हणजे उपरोक्त जेष्ठादेवी पूजन व महालक्ष्मी पूजन यांचा समन्वय होय . त्यानुसार या ज्येष्ठा गौरी व्रता मध्ये ज्येष्ठा देवी पूजनातील अनुराधा नक्षत्रावर आवाहन , जेष्ठा नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर विसर्जन , ज्येष्ठा हे देवता नाम , ध्यान व पूजा मंत्र या गोष्टीचा समाविष्ट झालेला आहे . तर महालक्ष्मी पूजनात येणाऱ्या दोरकाचे , दोरक ग्रहण विधी मध्ये रूपांतर झाले आहे .
तथापि काही प्रांतात हे व्रत जेष्ठा देवी प्रधान असते तर काही प्रांतामध्ये ते महालक्ष्मी प्रधान असते . जेष्ठा देवी प्रधान व्रता मध्ये जेष्ठादेवी पूजेतील देवी प्रतीके म्हणून पूजा समुच्चय या ग्रंथातील
*पूजादिना पूर्वेद्युर्यथाचारं पट भित्तिलिखितमूर्तिषु हेमादिप्रतिमासु पुस्तकेषु नद्याद्याहृतसिकतासु वा ज्येष्ठावाहणादि कृत्वा . . . ॥*
ह्या वचनानुसार भिंतीवरील चित्रे , मूर्ती , सुवर्णादी धातूंच्या प्रतिमा , पोथ्या , तसेच नदी किंवा जलाशयातून आणलेल्या वाळूच्या खड्यावर जेष्ठा देवीचे आवाहन केले जाते .
महालक्ष्मी प्रधान व्रतामध्ये सुघट , मुखवटे इत्यादी स्वरूपात जेष्ठा देवीची आवाहन केले जाते . याबाबतीमध्ये आपला आपला देशाचार व कुलाचार यानुसार अनुसरून देवीचे आवाहन करणे योग्य ठरते .
जेष्ठा गौरी या व्रतातील ज्येष्ठा या पदाची उकल वरील प्रमाणे होते .पण गौरी म्हणजे पार्वती हे पद या तिथीला करण्यात येणाऱ्या दुर्वाष्टमी या आणखी एका व्रतातील गौरी या देवतेस प्रधान मानुन केलेले असावे . तसेच या व्रताचे स्मरण म्हणून काही प्रांतात जेष्ठा गौरी व्रतात दुर्वाष्टमीतील गौरी ( गौरी नावाची वनस्पती ) शिव (शंकरोबा नावाची वनस्पती ) व गणेश ( दुर्वा किंवा पार्थिव गणेश ) यांचा समावेश केला जातो .

दोरक ग्रहण

सद्यकालीन ज्येष्ठा गौरी व्रतामध्ये दोरक ग्रहण या विधीला विशेष महत्त्व असते . यातील दोरक म्हणजे स्वहस्ते तयार केलेली व हळदीमध्ये रंगवलेले सोळापदरी कार्पास सूत्र होय . कार्पाससूत्र हे अखंडत्वाचे व हळद हे सौभाग्याचे प्रतीक आहे . हा दोरक पूजेच्या वेळी देवीसमोर ठेवला जातो व विसर्जनाच्या दिवशी तो विधिपूर्वक ग्रहण केला जातो . हा दोरक अत्यंत शुभदायक व लक्ष्मी प्राप्तिकारक असल्यामुळे घरातील सर्व स्त्रिया हा दोरक धारण करतात . त्याचप्रमाणे सुख समृद्धी प्राप्तीसाठी हा दोरक आपल्या धनकोषात , धान्य कोठारात व घराच्या पायाभरणीत व शेतामध्ये ठेवतात .

 🌹 जेष्ठा गौरी व महालक्ष्मी 🌹

भाग ३

ज्येष्ठा गौरी पूजन वास्तविक कुळाचाराचा भाग असल्यामुळे प्रत्येक स्वतंत्र कुटुंबात प्रथेनुसार हे व्रत करणे अत्यावश्यक असते . तथापि काही जणांच्या बाबतीत नव्याने हे व्रत सुरू करण्याची मनापासून इच्छा असूनही आपल्याकडे ते होत नाही किंवा कुणी महालक्ष्मी घेवून दिल्या तरच हे व्रत करता येते अशी अंधश्रद्धा असते . आपल्याला व्रत करून त्या व्रताचे पुण्य पाहिजे असते परंतु कोणीतरी दिले तरच हे व्रत करावे हा मात्र पूर्णपणे गैरसमजातून आलेला निष्कर्ष असतो . या गैरसमजामुळे नव्याने जेष्ठा गौरीचे व्रत चालू करण्याचे टाळले जाते , हे पूर्णपणे चुकीचे आहे . अशावेळी सारासार विवेक बुद्धीने विचार केला तर असे लक्षात येईल की या व्रतामुळे लाभ खचितच होईल . पण हानीमात्र मुळीच होणार नाही . म्हणून हे व्रत आचरणाची इच्छा असेल तर या जेष्ठा गौरी या व्रताचा मंत्रासह विधी मी तयार करून गृपवर पाठवला आहे . त्या पीडीएफ नुसार आपण हे व्रत पुजन करावे . नवीन सदस्यांनी अवश्य या व्रताचा प्रारंभ करावा . अलक्ष्मी निःसारक जेष्ठादेवी पूजन पुत्र , पौत्रादी , वैभव प्राप्तिकारक महालक्ष्मी पूजन , वंध्यत्व दोष निवारक दुर्वाष्टमी व्रत , हि तिन्ही व्रते एकाच दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध अष्टमीला येतात . याच दिवशी जवळपास येणारे जेष्ठागौरी व्रत हे प्रस्तुत तिन्ही व्रतांचा समन्वय ठरतो . जेष्ठा गौरी व्रताच्या निमित्ताने साकल्याने बहुतांश व्रतांचे आचरण होत असल्यामुळे या व्रताचा अंतर्भाव कुलाचारामध्ये झालेला आहे .
आपल्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती मृत्यू झाला म्हणजे अशौच आले किंवा सोयर आले , म्हणजे वृद्धी आली तर मात्र त्या कालावधीत हे व्रत करता येत नाही . ते पुढील वर्षीच करावे .
बरेच जण नवरात्र मध्ये गौरी स्थापना करतात . त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही .
एखाद्या कुटुंबातील अशौच जर स्थापनेच्या दिवशी संपत असेल तर दुसऱ्या कोणाकडून स्थापना करून घेऊन दुसऱ्या दिवशी स्वतः नैवेद्य व आरती करावी .

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

उपोषण सोडताच मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय, बीड सोडून थेट संभाजीनगरला रवाना; कारण काय ?

Next Post

सुप्रीम कोर्टाचा एक सवाल अन् एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलं, सुनावणीत काय घडलं ?

Next Post
सुप्रीम कोर्टाचा एक सवाल अन् एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलं, सुनावणीत काय घडलं ?

सुप्रीम कोर्टाचा एक सवाल अन् एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलं, सुनावणीत काय घडलं ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697