गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात; शिक्षणासोबत संस्कार व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन
ब्राह्मण सभा, जळगाव येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

जळगाव : ब्राह्मण सभा,जळगाव यांच्या वतीने ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी ब्राह्मण सभा, जळगाव येथे आयोजित करण्यात आला. प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती, दहावी, बारावी, पदवी, डिप्लोमा, इंजीनियरिंग, एमबीए, आर्किटेक्ट, इंजीनियरिंग, डॉक्टर , सीए ,पीएचडी, कला-क्रीडा क्षेत्रात तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून के.सी.ई सोसायटीचे मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा. संजयजी पावडे सर तसेच या जळगावातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व शैक्षणिक तज्ञ सौ. हेमाताई अमळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री. नितीन कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री.अमोल जोशी, कोषाध्यक्ष श्री. संदीप कुळकर्णी, विद्यार्थी गुणगौरव समितीचे निमंत्रक श्री. हेमंत वैद्य यांची मंचावर उपस्थिती होती .

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व दीप प्रज्वलन , सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवर श्री.संजयजी पावडे यांचा परिचय विद्यार्थी गुणगौरव समितीचे निमंत्रक श्री.हेमंत वैद्य यांनी करून दिला तसेच सौ.हेमाताई अमळकर यांचा परिचय ब्राह्मण सभा महिला समिती प्रमुख सौ.वैदही नाखरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अमोल जोशी, उपाध्यक्ष यांनी केले.

प्रा. संजय पावडे यांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास
कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे प्रा. संजय पावडे हे खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव येथे कौशल्य विकास संचालक म्हणून कार्यरत आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रातील अनुभवासोबतच त्यांनी मानव संसाधन व्यवस्थापन विषयात MBA केले आहे. त्यांना २५ वर्षांहून अधिक काळाचा शैक्षणिक क्षेत्राचा अनुभव आहे. MKCLयांच्या वतीने त्यांना NEP Implementation Leadership Award देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

प्रा. पावडे यांनी अमेरिका, इटली, इस्रायल, चीन आणि थायलंड येथे १८ हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन शोधनिबंध सादर केले आहेत.
सौ. हेमाताई अमळकर यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान

कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्या सौ. हेमा भरत अमळकर या मूळच्या कोल्हापूरच्या असून त्यांनी एम.कॉम. (टॅक्सेशन) पर्यंत शिक्षण घेतले आहे.

सन १९८३ ते १९८६ या काळात छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील पहिल्या विद्यार्थिनी पूर्णवेळ कार्यकर्त्या म्हणून त्यांनी काम केले. संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यात विद्यार्थिनींचा सामाजिक कार्यातील सहभाग वाढविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
सध्या त्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. दीपस्तंभ-मनोबल संस्थेच्या कार्यकारिणीतही त्या कार्यरत आहेत. सामाजिक बांधिलकी आणि कुटुंबव्यवस्थेतील मूल्यांचा समतोल साधत त्यांनी आपल्या कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कार्यक्रमाचा मुख्य भाग असलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात मुख्य आकर्षण ठरले ते श्री. संजयजी पावडे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील पुढील भविष्यातील वाटा व एआय क्रांती, तसेच याचा नीती मूल्याधिष्ठित वापर. यावर प्रोजेक्टरच्या आधारे त्यांनी केलेले विस्तृत प्रेझेंटेशन. विविध शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांसह इयत्ता दहावी व बारावीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे, अध्यक्ष-श्री.नितीनजी कुलकर्णी, उपाध्यक्ष- श्री अमोलजी जोशी, कोषाध्यक्ष- श्री संदीपजी कुलकर्णी, तसेच चिटणीस- श्री.संजयजी जोशी, श्री जितेंद्रभाऊ याज्ञिक, कार्यकारणी सदस्य – श्री.उल्हासदादा जोशी, श्री. किरणजी कुलकर्णी, श्री. राजूदादा कुलकर्णी, श्री कमलाकर फडणीस , महिला समिती प्रमुख सौ.वैदही नाखरे, महिला समिती सदस्य सौ.श्रद्धा शुक्ल, विद्यार्थी गुणगौरव समिती सदस्य श्री.आर आर वैद्य सर , श्री.दीपक कुलकर्णी, श्री. महेश कुलकर्णी, सौ.ज्योती देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या यशामागे असलेल्या पालकांचे, शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कारचिन्ह व शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा अनुभव आणि भविष्यातील ध्येयांविषयी मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आवाहन
प्रमुख पाहुणे प्रा. संजय पावडे आणि सौ. हेमाताई अमळकर यांनी आपल्या मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शैक्षणिक यश हे अंतिम ध्येय नसून, त्याचा उपयोग समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन करत विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच संस्कार, कौशल्य, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, असा संदेश दिला.
विद्यार्थ्यांनी बदलत्या काळातील नवीन तंत्रज्ञान, कौशल्ये आणि ज्ञान आत्मसात करून स्वतःच्या क्षमता विकसित कराव्यात. स्पर्धात्मक युगात सातत्य, मेहनत आणि योग्य दिशेने केलेले प्रयत्न यांना पर्याय नसल्याचेही मान्यवरांनी नमूद केले.
त्यानंतर सौ.वैदही नाखरे यांनी उपस्थितांचे आभार मानले व परंपरेनुसार पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना तसेच कार्यकारिणी सदस्यांना समूह छायाचित्रासाठी मंचावर येण्याचे आवाहन करण्यात आले.

ब्राह्मण सभा, जळगावच्या वतीने आयोजित या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाला प्रोत्साहन मिळाले असून, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याची परंपरा अधिक बळकट झाली आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकारणी सदस्य व व्यवस्थापक श्री.सचिन कुलकर्णी, समाज भगिनी सौ.स्वाती सुतावणे तसेच मदतनीस श्री.अभिमान तायडे यांनी विशेष प्रयत्न केले.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











