जळगावात १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान ‘स्पिक मॅके ऑटम कन्व्हेन्शन २०२६’; देशभरातील नामवंत कलावंतांची मांदियाळी
पद्मश्री उस्ताद शाहिद परवेज यांच्या सितारवादनाने होणार उद्घाटन; ४०० विद्यार्थी घेणार कार्यशाळांमध्ये सहभाग
जळगाव : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या (KCES) कान्ह ललित कला केंद्र आणि राष्ट्रीय स्तरावरील ‘स्पिक मॅके’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चार दिवसीय ‘Spic Macay Autumn Convention 2026’ या भव्य सांस्कृतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. खान्देशात स्पिक मॅकेसारख्या राष्ट्रीय संस्थेसोबत अशा स्वरूपाची परिषद आयोजित करण्याचा मान प्रथमच केसीई सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्राला मिळाला आहे.
भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रकला, योग, ध्यान आणि विविध पारंपरिक कलाप्रकारांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा, तसेच देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी नव्या पिढीची नाळ जोडली जावी, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या चार दिवसीय संमेलनात १३ ते २७ वयोगटातील सुमारे ४०० विद्यार्थी सहभागी होणार असून महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर, पुणे, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, बुलढाणा तसेच गुजरातमधील नवसारी व बडोदा, मध्य प्रदेशातील इंदूर व बऱ्हाणपूर आणि कर्नाटकातील गुंटूर आदी भागांतून विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
पद्मश्री उस्ताद शाहिद परवेज यांच्या सितारवादनाने उद्घाटन
परिषदेच्या उद्घाटन सत्रात पद्मश्री सितारवादक उस्ताद शाहिद परवेज यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा), केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, स्वागताध्यक्ष व केसीई सोसायटीच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य भालचंद्र पाटील, स्पिक मॅकेच्या समन्वयक सिम्पी सिंग तसेच कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सत्रात कान्ह ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांकडून ‘सप्तकला’ सादरीकरण करण्यात येणार असून, त्यानंतर उस्ताद शाहिद परवेज यांचे विशेष सितारवादन रसिकांना अनुभवता येणार आहे.
योग, ध्यानापासून चित्रपट निर्मितीपर्यंत मार्गदर्शन
२ ऑक्टोबरपासून सकाळी ४ ते ७ या विशेष सत्रात योगगुरू स्वामी त्यागराजनंदन सहभागी विद्यार्थ्यांना हठयोग व ध्यानसाधनेचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दुपारच्या सत्रात ‘द मेकिंग ऑफ महात्मा’ या चित्रपटाचे सादरीकरण करण्यात येणार असून, चित्रपट निर्मितीच्या प्रवासाबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. या सत्रात जैन उद्योग समूहाचे कार्यकारी अध्यक्ष अशोक जैन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
सायंकाळच्या सत्रात संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यानंतर संगीत नाटक अकादमी युवा पुरस्कारप्राप्त विदुषी कपिला वेणू यांच्या कूडियाट्टम या वैशिष्ट्यपूर्ण नृत्यप्रकाराचे विशेष सादरीकरण होणार आहे.
सुंद्री वाद्यापासून कबीर गायनापर्यंत विविध कलांचा अनुभव
३ ऑक्टोबर रोजी दुपारच्या पहिल्या सत्रात ऑल इंडिया रेडिओ युवा पुरस्कारप्राप्त कलावंत भीमण्णा जाधव पारंपरिक सुंद्री वाद्याचे सादरीकरण करणार आहेत.
यानंतर पद्मश्री पुरस्कारप्राप्त कालूराम बामणिया यांच्या नगाडा व ढोलकाच्या साथीने कबीर गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळच्या सत्रात संगीत कला निधी पुरस्कारप्राप्त लालगुडी विजयालक्ष्मी यांचे व्हायोलिनवादन होणार असून, त्यानंतर सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद राजा मियाँ यांचे गायन सादर केले जाणार आहे.
नामवंत कलाकारांच्या कार्यशाळा ठरणार आकर्षण
या संमेलनाचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध कलाप्रकारांच्या कार्यशाळा. संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना प्रेरणा श्रीमली, सुप्रसिद्ध तबलावादक उमेश बॅनर्जी तसेच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गुजरातमधील चित्रकार संजय चित्रे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
चित्रकार संजय चित्रे यांच्याकडून ‘माता नी पेचडी’ अर्थात दुर्गामातेतील मातृत्व या चित्रशैलीचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ येथील नक्षीया शामा या गौण चित्रकला शैलीबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.
देशभरातील कलाकारांची उपस्थिती
या सांस्कृतिक संमेलनात देशातील विविध भागांतील अनेक नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत. यामध्ये हार्मोनियमवादक दीपक कासारवल, घट्टमवादक शिवराम कृष्णन, तबलावादक विवेक क्षीरसागर, कूडियाट्टम कलावंत ए. हरिहरन, राजीव पदिमरल, पी. उन्नीकृष्णन, तालवादक मास्टर वेंकटेश कुमार, कलाश्री जाधव, नगाडा वादक संजयसिंह परमार, ढोलकवादक देविदास बैरागी, व्हायोलिनवादक एच. श्रीनिवासन, मृदंगवादक बी.सी. मंजुनाथ, तालवादक रूपक पवार आणि विनोद पगडे यांचा समावेश आहे.
कार्यशाळांच्या दालनांना दिग्गज कलाकारांची नावे
स्पिक मॅकेच्या या विशेष संमेलनात कार्यशाळांसाठी स्वतंत्र दालने तयार करण्यात आली आहेत. नृत्य दालनाला दिवंगत कथक सम्राट पंडित बिरजू महाराज, संगीत दालनाला पंडित पलुस्कर-पंडित भातखंडे, तबलावादन दालनाला दिवंगत तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन, तर चित्रकला दालनाला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याचे सुप्रसिद्ध चित्रकार के.के. मूस यांच्या नावाने संबोधण्यात येणार आहे.
कालिदास सभागृहात रंगणार सांस्कृतिक कार्यक्रम
दुपार आणि सायंकाळच्या सत्रातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम कान्ह ललित कला केंद्राच्या नव्याने सुरू झालेल्या कालिदास सभागृहात आयोजित करण्यात आले आहेत. चार दिवस जळगावच्या सांस्कृतिक विश्वात देशभरातील विविध कला आणि कलाकारांचा संगम अनुभवायला मिळणार असल्याने रसिकांसाठी हे संमेलन विशेष पर्व ठरणार आहे.
४ ऑक्टोबरला होणार समारोप
चार दिवसीय या सांस्कृतिक परिषदेची ४ ऑक्टोबर रोजी सांगता होणार असून, प्रमुख अतिथी योगगुरू स्वामी त्यागराजनंदन यांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.
केसीई सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली व्यापक आयोजन
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या संमेलनाची तयारी सुरू आहे. स्वागत समितीत केसीई सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस, सचिव प्रमोद पाटील, सहसचिव अॅड. प्रवीणचंद्र जंगले, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य शिल्पा बेंडाळे, प्राचार्य अनिल राव, प्राचार्य संजय भारंबे, प्राचार्य डॉ. अशोक राणे, प्रा. डॉ. जुगलकिशोर दुबे, प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य मिलन भामरे, कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, समन्वयक प्रसाद देसाई यांच्यासह विविध समित्यांमधील सुमारे १०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आयोजनासाठी सहकार्य करीत आहेत.
भारतीय पारंपरिक कला, संगीत, नृत्य, चित्रकला, योग आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील संमेलनामुळे जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवी ओळख मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांना देशातील दिग्गज कलाकारांकडून थेट शिकण्याची अनोखी संधी मिळणार आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










