जळगावात विकासकामांच्या यादीवरून महासभा तापली! शिंदेसेनेचा भाजपला थेट सवाल
जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) माध्यमातून पालकमंत्र्यांनी दिलेल्या २.७५ कोटी रुपयांच्या निध्यातून शहरात करण्यात येणाऱ्या विकासकामांवरून जळगाव महापालिकेच्या महासभेत जोरदार खडाजंगी झाली.
प्रस्तावित कामांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. विशेष म्हणजे, भाजपचे सभागृह नेते नितीन लढ्ढा यांनीही या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याने सत्ताधारी भाजपची कोंडी झाली.
डीपीडीसीच्या निधीतून कोणती विकासकामे करायची, याबाबत पक्षाच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, महासभेत चर्चेदरम्यान वेगळीच कामे प्रस्तावित करण्यात आल्याने वादाला तोंड फुटले. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी भाजपचे नगरसेवक दीपक सूर्यवंशी यांना जाब विचारत, संबंधित नगरसेवकांना विश्वासात न घेता परस्पर कामे कशी निश्चित करण्यात आली, असा सवाल उपस्थित केला.
शिवसेनेचे सभागृह नेते विष्णू भंगाळे आणि नगरसेवक ललित कोल्हे यांनी या मुद्द्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. विकासकामे निश्चित करताना पालकमंत्र्यांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. शिवसेनेच्या नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नसेल, तर पालकमंत्र्यांकडून शिवसेनेच्या नगरसेवकांसाठी स्वतंत्र निधी मागायचा का, असा सवालही विष्णू भंगाळे यांनी उपस्थित केला.
या प्रकरणावरून सभागृहात बराच वेळ वादविवाद सुरू होता. भाजपचे सभागृह नेते नितीन लढ्ढा यांनीही नाराजी व्यक्त केल्याने या विषयावर सत्ताधारी भाजपची अडचण वाढली. अखेर, संबंधित विषयाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली असून, कामांबाबतच्या सूचना नंतर मांडण्याचे ठरल्याची माहिती आहे.
स्वच्छता कंपनीचा ठेका रद्द करण्याची मागणी
दरम्यान, महापालिका क्षेत्रातील स्वच्छता आणि कचरा संकलन करणाऱ्या कंपनीच्या कामकाजावरूनही महासभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधित कंपनीच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करत तिचा ठेका रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यामुळे विकासकामांच्या निधीबरोबरच शहरातील स्वच्छतेचा मुद्दाही महासभेत चर्चेचा विषय ठरला.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











