जळगावात भीषण अपघात! भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला
आकाशवाणी चौकाजवळील उड्डाणपुलावर दुर्दैवी घटना; मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनीत शाखाधिकारी म्हणून होते कार्यरत
जळगाव | प्रतिनिधी-
जळगाव शहरात रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून, गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी आकाशवाणी चौकाजवळील उड्डाणपुलावर भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र छकुलाल चौधरी (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कामावर जात असताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात गुरुवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास घडला. रवींद्र चौधरी हे मोतीलाल ओसवाल या खासगी वित्तीय कंपनीत शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. ते सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने कामावर जाण्यासाठी निघाले होते.
ते एमएच १९ डीएन १२८२ क्रमांकाच्या एचएफ डिलक्स दुचाकीवरून जात असताना आकाशवाणी चौकाजवळील उड्डाणपुलावर आरजे ५० जीए ९२३४ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या रवींद्र यांच्यावर काळाने अचानक घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह परिचितांना मोठा धक्का बसला आहे.
एरंडोल तालुक्यातील रहिवासी; जळगावात होते वास्तव्यास
रवींद्र छकुलाल चौधरी हे मूळचे एरंडोल तालुक्यातील उतराण गावचे रहिवासी होते. नोकरीनिमित्त ते सध्या जळगाव शहरातील चंदू अण्णा नगर परिसरात पत्नीसोबत राहत होते. खासगी वित्तीय कंपनीत शाखाधिकारी म्हणून ते काम करत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई असा परिवार आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या रवींद्र यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबाचा मोठा आधार हरपला आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव; दोन्ही वाहने ताब्यात
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर बेनाम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी अपघातातील ट्रक आणि दुचाकी ताब्यात घेतली असून, घटनेबाबत पुढील तपासाची कार्यवाही करण्यात येत आहे.
महामार्गावरील अपघातांची मालिका थांबणार कधी?
जळगाव शहर आणि परिसरातील महामार्गांवर होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः अवजड वाहनांची वाहतूक, भरधाव वेग आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या घटनेच्या निमित्ताने चर्चेत आला आहे.
तरसोद बायपासवरील वाहतूक वळविल्यानंतर शहरातील विविध मार्गांवर वाहतुकीचा ताण आणि अवजड वाहनांच्या हालचालींबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. नवीन महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे महामार्गावरील वाहतूक ही शहरातून वळवल्याने शहरातील पूर्वीची वाहतूक समस्या ही पूर्वत झालेले असल्याकारणाने तसेच शहरांमध्ये अवजड वाहतुकीचे नियंत्रण न राहिल्याने अशा अपघातांची मालिका ही सातत्याने सुरू आहे आणि त्यातूनच निष्पाप जीवांना आपले जीव गमावले लागत आहेत.
आकाशवाणी चौकाजवळील उड्डाणपुलावर घडलेल्या या दुर्घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी वाहतूक व्यवस्थेचा आढावा घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सुरक्षित वाहतुकीसाठी ठोस उपाययोजनांची गरज
शहरातील प्रमुख चौक, उड्डाणपूल आणि महामार्गांवर अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे, आवश्यक ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे आणि अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करणे गरजेचे आहे.
एका अपघातामुळे संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, याची जाणीव प्रत्येक वाहनचालकाने ठेवणे आवश्यक आहे. रवींद्र चौधरी यांच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे समोर आला आहे.
जळगावातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासन कधी ठोस पावले उचलणार?
आणखी किती कुटुंबांना आपल्या प्रिय व्यक्तीला गमावण्याचे दुःख सहन करावे लागणार? हे प्रश्न या दुर्दैवी घटनेनंतर उपस्थित होत आहेत.
दैनिक मार्केट स्पेशल
विचारांपासून आश्वासक प्रतिसादापर्यंत
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











