एअर मार्शल आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख; अमर प्रीत सिंग यांच्या निवृत्तीनंतर स्वीकारली सूत्रे

नवी दिल्ली : हवाई दल प्रमुख, एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांना तीन अधिकृत निरोप समारंभांद्वारे निरोप देण्यात आला. ज्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आयोजित केलेल्या समारंभाचाही समावेश होता.
त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या दिवशी म्हणजे आज (31 ऑक्टोबर) त्यांना औपचारिक ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन निरोप देण्यात आला. यानतंर एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांची जागा घेतली आहे, जे 25 महिन्यांच्या कार्यकाळानंतर आज निवृत्त झाले आहेत.
एअर मार्शल आशुतोष दीक्षित हे भारतीय हवाई दलात स्वदेशी विमाने आणि संरक्षण उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी ‘लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (LCA) तेजससह हवाई दलाच्या अनेक स्वदेशी विमान प्रकल्पांना पुढे नेण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
संरक्षण क्षेत्रात सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला ते अधिक बळकट करतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्याबद्दल अधिक सांगायचे झाले तर, 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमान विभागात (फायटर स्ट्रीम) नियुक्त झालेले एअर मार्शल दीक्षित हे नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA), डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (बांगलादेश) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना 3,500 तासांहून अधिक काळ विमान उडवण्याचा अनुभव आहे.
दीक्षित यांनी हवाई दलात अनेक महत्त्वाच्या पदांवर केले काम
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, आशुतोष दीक्षित यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण कार्यात्मक आणि प्रशासकीय पदे भूषवली आहेत. कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांनी ‘नंबर 9 स्क्वॉड्रन’चे नेतृत्व केले, ज्यामध्ये ‘मिराज-2000’ लढाऊ विमानांचा समावेश होता.
त्यानंतर, त्यांनी पश्चिम क्षेत्रातील एका ‘फॉरवर्ड फायटर एअरबेस’ची आणि दक्षिण क्षेत्रातील एका प्रमुख लढाऊ प्रशिक्षण तळाची धुरा सांभाळली.
तसेच दीक्षित यांनी ‘सदर्न एअर कमांड’मध्ये ‘एअर डिफेन्स कमांडर’ म्हणूनही काम केले आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी हवाई मुख्यालय (वायू भवन) येथे ‘सहायक हवाई दल प्रमुख (प्रकल्प)’ आणि ‘सहायक हवाई दल प्रमुख (नियोजन)’ यांसारखी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
देशाला दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल एअर मार्शल दीक्षित यांना अनेक लष्करी सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये 2006 मधील वायु सेना पदक, 2011 मधील विशिष्ट सेवा पदक, 2023 मधील अति विशिष्ट सेवा पदक आणि 2026 मधील परम विशिष्ट सेवा पदक यांचा समावेश आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











