
चाळीसगावला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला आमदार किशोर पाटील यांनी तीव्र विरोध केला आहे. तर मंगेश चव्हाण हे कार्यालय चाळीसगावात व्हावे यासाठी आग्रही आहेत. यामुळे आता महायुतीच्या दोन्ही आमदारांमध्ये संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या मतदारसंघात चाळीसगाव येथे अप जिल्हाधिकारी कार्यालय होत आहे. पण याला पाचोरा भडगावचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी शुक्रवारी पक्षाच्या बैठकीत तीव्र विरोध दर्शला आहे. यासाठी त्यांनी आंदोलन छेडण्याचे जाहीर केले आहे. एकंदरीत दोघांच्याही वर्चस्वाच्या लढाईत महायुती आता वाद निर्माण झाला आहे. पाचोरा येथे शुक्रवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार किशोर पाटील यांनी सरकारला आणि प्रशासनाला हा इशारा दिला. कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय खपवून घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.

“पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील नागरिकांसाठी जळगाव येथील जिल्हास्तरीय कार्यालये अधिक सोयीची आहेत. चाळीसगाव हे भौगोलिकदृष्ट्या दूर असल्याने तेथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय झाल्यास नागरिकांची प्रचंड गैरसोय होईल. त्यामुळे पाचोरा आणि भडगाव तालुक्यांची प्रशासकीयदृष्ट्या जोडणी कोणत्याही परिस्थितीत चाळीसगावशी होऊ देणार नाही”, असा पवित्रा किशोर पाटील यांनी घेतला आहे.
“अपर जिल्हाधिकारी कार्यालय चाळीसगावला करण्याचा निर्णय झाल्यास याविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आयुक्त तसेच संबंधित सचिव यांना निवेदने सादर केली जाणार”, असे त्यांनी सांगितले.
आमदार किशोर पाटलांना भीती कसली ?
शेजारच्या मतदारसंघात एवढे मोठे शासकीय कार्यालय गेल्याने आणि आपल्या भागातील जनतेला तिथे चकरा माराव्या लागल्यास, त्यांच्या स्वतःच्या राजकीय वर्चस्वाला आणि प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो, याची पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांना पूर्ण जाणीव आहे.

स्थानिक पातळीवरचं राजकारण
या वादाला स्थानिक राजकीय संघर्षाचीही पार्श्वभूमी लाभली आहे. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने हे कार्यालय चाळीसगावला नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. आगामी नगरपालिका आणि इतर स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मतदारसंघांतील आमदारांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. यापूर्वीही स्थानिक निवडणुकांमध्ये दोन्ही बाजूंचे नेते आमने-सामने आले होते, आणि आता या शासकीय कार्यालयाच्या मुद्द्यावरून महायुतीमधील हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. या पूर्वीही मंगेश चव्हाणांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगावला नेल्याने आमदार किशोर पाटील चांगलेच संतप्त झाले आहेत .
मंगेश चव्हाण आग्रही
जिल्हाधिकारी कार्यालय चाळीसगावला मंजूर करून आणण्यासाठी भाजप आमदार मंगेश चव्हाण हे आग्रही आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच या हालचालींना वेग आला आहे. जर हे कार्यालय तिथे झाले, तर त्याचे मोठे श्रेय मंगेश चव्हाण यांना मिळेल, ज्यामुळे त्यांची राजकीय पकड अधिक मजबूत होईल.

कोण यशस्वी होणार?
आमदार मंगेश चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे नेते आहेत. तर आमदार किशोर पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत. दोघेही आमदार मंत्र्यांच्या जवळचे असल्याने आता नेमके चाळीसगावला मंगेश चव्हाण यांची ताकद लागते की, आमदार किशोर पाटील यांचे आंदोलन यशस्वी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










