दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या CJP (कॉक्रोच जनता पार्टी) च्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलनाचे प्रमुख नेतृत्व करणारे अभिजीत दिपके यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिपके यांची प्रकृती पुन्हा खालावली असून, वैद्यकीय तपासणीत त्यांना टायफॉईड झाल्याचे निदान झाले आहे. ही माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर व्हिडिओद्वारे दिली.
प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे काही काळ आंदोलनापासून दूर राहावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी आंदोलन थांबणार नसल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले आहे. व्हिडिओतून त्यांनी आंदोलनकर्त्यांना संयम राखत लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले. तसेच, प्रकृती सुधारल्यानंतर पुन्हा सक्रियपणे आंदोलनात सहभागी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सोनम वांगचुक यांच्या सल्ल्यानंतर उपोषण मागे
नीट-यूजी परीक्षा गैरव्यवहाराच्या निषेधार्थ अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.

मात्र, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला वांगचुक यांनी दिला होता. उपोषण संपल्यानंतर काही दिवसांतच दिपके यांची प्रकृती बिघडल्याचे समोर आले आणि आता त्यांना टायफॉईडचे निदान झाले आहे.
३६ दिवसांपासून आंदोलन सुरू
CJP चे धरणे आंदोलन आता ३६व्या दिवसात दाखल झाले आहे. आंदोलनकर्ते आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असल्या, तरी अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यावर ते ठाम आहेत.
यापूर्वी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी आंदोलनाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. सरकारकडून लवकरच पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप निर्णय न झाल्याने आंदोलन सुरूच असून विद्यार्थ्यांमध्ये केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत उत्सुकता कायम आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










