मुंबई : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांना स्थान मिळणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र या सर्व चर्चांना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांना केंद्रात जाण्याच्या शक्यतेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “जे दिलंय ते उत्तम आहे, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं,” अशी सूचक प्रतिक्रिया देत आपण सध्याच्या जबाबदारीत पूर्णपणे समाधानी असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर केंद्रात जाण्याबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना पुन्हा एकदा विराम मिळाला आहे.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेतृत्व मानले जाते. राज्यात पक्षाचा विस्तार, निवडणुकांमधील रणनीती आणि प्रशासनातील निर्णयक्षम नेतृत्वामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह राज्यातील अनेक महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने मार्गी लागले असून, त्यामुळे त्यांची “इन्फ्रास्ट्रक्चर मॅन” अशी प्रतिमा तयार झाली आहे.
दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. विरोधी पक्षांनी या घडामोडीला विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा आणि लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राजकीय वातावरण तापले असून, मुंबईत ठाकरे बंधूंनी जल्लोष सभेचे आयोजन केले. राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील या घडामोडींमुळे पुढील काही दिवस राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मी महाराष्ट्रातच राहणार” हा स्पष्ट संदेश देत राज्याच्या नेतृत्वाबाबत कोणतीही संदिग्धता नसल्याचे अधोरेखित केले आहे.
दिल्लीत फडणवीस नेमके कुणाला भेटले याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र, ‘फडणवीसच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील,’ असा दावा फडणवीसांच्या अत्यंत विश्वासू कोअर टीमने केला. त्यांचे म्हणणे आहे की, दिल्ली दौरा पूर्वनियोजित होता. प्रधानांच्या जागी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंची वर्णी लागू शकते. मंत्री आशिष शेलारांवर केंद्रीय संघटनेत मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यावर चर्चेसाठी हा दौरा होता.
फडणवीस उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना शिक्षणमंत्रिपदाची संधी : राऊत
संजय राऊत म्हणाले की, देशाचे नवे शिक्षणमंत्री म्हणून फडणवीसांना संधी मिळू शकते. ते उच्चशिक्षित आणि वकील आहेत. ते विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत असतात. त्यांना केंद्रात नेण्याबाबत सातत्याने चर्चा सुरू असते. त्यामुळे योगायोगाने किंवा त्यांच्या दुर्दैवाने, त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“पांडुरंगाची इच्छा असेपर्यंत मी या पदावर राहणार- देवेंद्र फडणवीस
दिल्लीतील संभाव्य केंद्रीय जबाबदारीविषयीच्या थेट प्रश्नावर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत फडणवीस म्हणाले, “जे दिलं, ते उत्तम आहे… तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधानी... तसा मी पूर्णपणे समाधानी आहे. पांडुरंगाची इच्छा असेपर्यंत मी या पदावर काम करत राहणार आहे. आपण किती काळ पदावर राहिलो यापेक्षा मिळालेल्या वेळेचा नेमका काय उपयोग केला आणि जनतेच्या हितासाठी काय ठोस काम केले, हेच जास्त महत्त्वाचे आहे.”
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











