मुंबई | प्रतिनिधी : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिवंगत देव आनंद यांचे पुत्र सुनील आनंद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना सोमवारी सकाळी लंडनमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेतील सर्वाधिक भावनिक बाब म्हणजे, २०११ मध्ये देव आनंद यांनी ज्या लंडनमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता, त्याच रुग्णालयात आता त्यांचे पुत्र सुनील आनंद यांचेही निधन झाले. या योगायोगामुळे चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुतणीने दिली निधनाची माहिती
सुनील आनंद यांच्या पुतणी जीना नारंग यांनी त्यांच्या निधनाची माहिती देत कुटुंबाच्या वतीने भावनिक निवेदन प्रसिद्ध केले. त्यांनी म्हटले, “सुनील आनंद यांच्या निधनामुळे आमचे संपूर्ण कुटुंब अत्यंत दुःखात आहे. या कठीण काळात आम्हाला मिळणारे प्रेम, प्रार्थना आणि पाठिंबा आमच्यासाठी मोठा आधार ठरत आहे. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करावा.”
प्रसिद्ध लेखिका अनीता पद्दा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, सुनील आनंद यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. देव आनंद यांच्या निधनानंतर ते लंडनमध्ये वास्तव्यास होते.
चित्रपटसृष्टीशी घट्ट नाते
सुनील आनंद यांचा जन्म दिग्गज अभिनेते देव आनंद आणि अभिनेत्री कल्पना कार्तिक यांच्या घरी झाला. लहानपणापासूनच त्यांचे संगोपन चित्रपटसृष्टीच्या वातावरणात झाले. त्यांचे काका चेतन आनंद आणि विजय आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक होते.
याशिवाय त्यांच्या कुटुंबात दिग्दर्शक केतन आनंद, विवेक आनंद, अभिनेते-दिग्दर्शक शेखर कपूर, तसेच नीलू आणि अरुणा यांचाही समावेश आहे. नीलू यांचा विवाह अभिनेते नवीन निश्चल यांच्याशी, तर अरुणा यांचा विवाह अभिनेते परीक्षित साहनी यांच्याशी झाला होता.
अभिनयात वडिलांसारखे यश मिळाले नाही
सुनील आनंद यांनी अमेरिकेतील अमेरिकन युनिव्हर्सिटी, वॉशिंग्टन डी.सी. येथून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत १९८४ मध्ये ‘आनंद और आनंद’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
या चित्रपटात राखी, स्मिता पाटील आणि बिस्वजित चॅटर्जी यांसारखे दिग्गज कलाकार होते. मात्र चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी ‘कार थीफ’, ‘मैं तेरे लिए’ आणि ‘मास्टर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तरीही ते आपल्या वडिलांप्रमाणे लोकप्रियता आणि यश मिळवू शकले नाहीत.
सुनील आनंद यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीने आणखी एक महत्त्वाचा वारसदार गमावला असून, अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











