जळगावात पावसाचा महाकहर! १५ पैकी १४ तालुक्यांत अतिवृष्टी; २४ तासांत १०३ मिमी पाऊस, २०१५ नंतरची विक्रमी नोंद
जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अवघ्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०३ मिमी पावसाची नोंद झाली असून, २०१५ नंतर एकाच दिवसात झालेला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. या धुवांधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, रस्ते, पूल, शेतशिवार आणि सखल वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
विशेष म्हणजे, एका दिवसात झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील पावसाची जवळपास २५ टक्के तूट भरून निघाली असून, हंगामी पावसाची सरासरी १०६ टक्क्यांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील १५ पैकी चाळीसगाव वगळता उर्वरित १४ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
अमळनेरमध्ये सर्वाधिक १५२ मिमी पाऊस
जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस अमळनेर तालुक्यात १५२ मिमी इतका झाला. मुसळधार पावसामुळे कळमसरे गावाला चारही बाजूंनी पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून गावाचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रात शिरले पुराचे पाणी
कळमसरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुराचे पाणी शिरल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. औषधसाठा, वैद्यकीय साहित्य आणि रुग्णसेवेवर त्याचा परिणाम झाला असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एसटी सेवा बंद, शाळांना ऐनवेळी सुट्टी
अमळनेर–कळमसरे मार्गावर पुराचे पाणी आल्याने एसटी महामंडळाने बससेवा तात्पुरती बंद केली आहे. अमळनेर शहरातील अनेक सखल भाग जलमय झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक शाळांनी ऐनवेळी सुट्टी जाहीर केली.
अनेर धरणाचे सर्व १० दरवाजे उघडले
चोपडा तालुक्यातील वेळोदे परिसर आणि अनेर नदीच्या उगमस्थानी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेर धरणाचे सर्व १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने अनेर नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

घरांमध्ये पाणी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
देवगाव (ता. पारोळा) येथे अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. गिरणा नदी पट्ट्यातील शेतशिवार पाण्याखाली गेल्याने कापूस, मका, सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, वडजी (ता. भडगाव) येथे स्थानिक नाल्याला आलेल्या पुरामुळे गुरांचे गोठे वाहून गेले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रशासन सतर्क; नागरिकांना खबरदारीचे आवाहन
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नदी-नाले, ओढे आणि पूरग्रस्त भागांपासून सुरक्षित अंतर राखावे, विनाकारण प्रवास टाळावा तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागानेही पुढील काही तास जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त केल्याने प्रशासनाने नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










