चोपडा तालुक्यातील वडती गाव हादरले; आरोपी वडिलांना जंगलातून अटक, हल्ल्यामागील कारणाचा पोलिसांकडून शोध
जळगाव | प्रतिनिधी : चोपडा तालुक्यातील वडती गावात रविवारी पहाटे घडलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलांवर ते गाढ झोपेत असताना कुऱ्हाडीने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या अमानुष हल्ल्यात १३ वर्षीय मीरा सुभाष भिलाला हिचा जागीच मृत्यू झाला, तर ११ वर्षीय रामू सुभाष भिलाला गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर आरोपी सुभाष गोपाळ भिलाला (वय ५०) हा जंगलाच्या दिशेने पसार झाला होता. माहिती मिळताच अडावद पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत आरोपीला जंगल परिसरातून ताब्यात घेतले.
झोपेत असतानाच केला जीवघेणा हल्ला
प्राथमिक माहितीनुसार, रविवारी पहाटे दोन्ही मुले घरात गाढ झोपेत असताना आरोपीने कुऱ्हाड उचलून त्यांच्या मानेवर व शरीरावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेतील मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
हल्ल्यामागील कारण अद्याप गूढ
या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपीला दारूचे व्यसन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कौटुंबिक वाद, मानसिक अस्थिरता किंवा इतर कोणत्या कारणातून हे कृत्य घडले का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
गावात शोककळा, पोलिसांचा तपास सुरू
या घटनेमुळे वडती गावासह संपूर्ण चोपडा तालुक्यात शोककळा पसरली आहे. अडावद पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुरावे संकलित केले असून आरोपीविरुद्ध हत्या व खुनाचा प्रयत्न यांसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून सर्व शक्य बाबींची चौकशी केली जात आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










